आपला समाज, आजू बाजूचं वातावरण, आपला परिवार, ऑफिस, या सगळ्याचा आपल्यावर किती प्रभाव असतो नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा निर्णय घेण्याअगोदर आपण या सगळ्यांचा एकदा का होईना पण विचार करतोच. मात्र कधी कधी काही निर्णय हे या सगळ्याच्या पलीकडे जावून घ्यावे लागतात. कदाचित तो नाईलाज असतो, कदाचित तेव्हा दुसरं काही करण्यासारखं नसतं. पण जेव्हा प्रश्न एका लहान जीवाचा असतो, तेव्हा जीव हत्या करावी का समाजाच्या चौकटीच्या बाहेर जावून आपल्याला योग्य वाटतं ते करावं हा निर्णय धाडसाचा असतो. असंच काहीसं दाखवलं आहे 'पीनट बटर' या लघुपटात.
वरचं वाचून जरा कन्फ्यूजन वाढलं असेल ना.. थांबा लगेच क्लिअर करते. पीनट बटर हा लघुपट कुमारी माता, अबॉर्शन, कॉर्पोरेट लाईफ आणि सिंगल पेरेंटहुड वर आधारित आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस विजेची गौहर खान यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. एका चांगल्या कंपनीच एका चांगल्या हुद्द्यावर ती काम करत असते. चांगला पगार, मान सन्मान सगळं मिळत असतं. ऑफिसात एका कलीगशी खूप चांगली मैत्री असते आणि एका बेसावध क्षणी ते एकमेकांच्या जवळ येतात. त्यांच्यात व्हायचं ते होतं आणि 'ती' 'प्रेगनंट' होते. ज्या क्षणी तिला हे कळतं तिची खूप चिडचिड होते. ती लगेच डॉक्टरांना फोन करते आणि निघते, 'अबॉर्शन' साठी.
पण दरवाजा उघडून बाहेर जाईल तितक्यात तिच्याकडे कुणी तरी येतं. आणि जोड्यांना चिकटलेलं चुईंगम काढण्यासाठी पीनट बटर मागतं. त्याच्या सोबत झालेल्या त्या संवादामुळे 'ती'चं आयुष्यचं बदलतं. कोण असतो तो? ज्याला हिच्या बद्दल सगळं माहीत असतं, इतकं की ती गरोदर आहे हे ही त्याला माहीत असतं. कोण होता कोण तो? जेणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा.
या लघुपटात बदलत्या काळासोबत घडणाऱ्या गोष्टींवर वेगळ्या पद्धतीने प्रकाश पाडण्यात आला आहे. आता हे सगळं योग्य आहे का चूक ते मात्र प्रेक्षकांनी ठरवायचं. प्ले ग्राऊंड अॅण्ड डिजिटल सिनेमा प्रदर्शित आणि मनु चौबे दिग्दर्शित या लघुपटात मुख्य भूमिकेत आहेत गौहर खान आणि धीरज तोलानी. आयटम गर्लच्या रुपात नेहमी समोर आलेली गौहर खान या लघुपटात मात्र एकदम वेगळी भासली आहे, तिच्या अभिनयानं प्रेक्षकांना खरंच भुरळ पाडली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गोड, निरागस मात्र वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या लघुपटाचा समावेश नुकताच 'सिलिकॉन व्हॅली इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल' करण्यात आला आहे.
तिला भेटलेला 'तो' कोण होता हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा....