नुकतीच प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू ह्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी वाचली आणि धक्काच बसला. १९५८ मध्ये जन्मलेल्या रीमा लागू ह्यांनी वयाची साठीदेखील ओलांडली नव्हती. एक दर्जेदार, विविध माध्यमांवर सारखीच पकड असलेली, विलक्षण ताकदीची अभिनेत्री म्हणून देशभरातले नाट्य-सिने रसिक रीमा लागू ह्यांना ओळखतात. त्यांच्या अभिनयाचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आहेत.
राजश्री प्रॉडक्शनचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला. भाग्यश्री पटवर्धनने साकार केलेली एक साधी-भोळी नवथर नायिका आणि सलमान खान चा नायक म्हणून अभिनय केलेला हा पहिलाच चित्रपट उदंड लोकप्रिय झाला. मराठी प्रेक्षकांसाठी तर हा चित्रपट खास जिव्हाळ्याचा होता. भाग्यश्री पटवर्धन पासून ते लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत अनेक दिग्गज मराठी कलाकार ह्या चित्रपटात होते, पण नायक नायिके इतकीच ह्या चित्रपटात भाव खाऊन गेली होती नायकाची आई - रीमा लागू. सहसा हिंदी चित्रपटात दिसणारी दुःखी, मुलाच्या चिंतेने खंगलेली, आपल्या ताडमाड वाढलेल्या लेकरांसाठी 'गाजर का हलुआ' वगैरे बनवणारी, निळ्या काठाच्या पांढऱ्या साड्या नेसून सदोदित आसवे गाळणारी ही आई नव्हती. रीमा लागूंनी रंगवलेली आई देखणी होती, तरुण होती, लाडिक होती, स्वतःचा आब राखून नटणारी होती. आपल्या वयात आलेल्या मुलाबरोबर थट्टाविनोद करणारी, त्याच्या नुकत्याच उमलणाऱ्या प्रेमाला मनापासून साथ देणारी आणि शेवटी नवऱ्याचा निर्णय चूक आहे हे कळताच ठामपणे मुलाच्या बाजूने उभी रहाणारी, करारी, तरीही खेळकर अशी आई रीमा लागूंनी फार सुरेख रंगवली होती.
'मैने प्यार किया' प्रदर्शित होण्यापूर्वी हिंदी चित्रपटातली आई म्हटलं की निरुपा रॉय डोळ्यांसमोर यायची, पण ह्या चित्रपटानंतर मात्र हिंदी चित्रपटातली आई म्हटलं की रीमा लागू डोळ्यांसमोर यायला लागली. राजश्री प्रॉडक्शनच्या पुढच्या काही चित्रपटांमधूनदेखील रीमा लागूंनी आई रंगवली. रीमा लागूंची आई गाणी-बिणी म्हणत मस्त नाच करायची. सदोदित शिवणाच्या मशीनवर बसून रडायची नाही. त्यांच्या त्या किंचित घाऱ्या डोळ्यांमध्ये कायम एक खोडकर लाघव वस्तीला असायचं. राजश्रीच्याच 'हम आपके हैं कौन' ह्या चित्रपटात रीमा लागू तिचे व्याही अलोकनाथ ह्यांना गाण्याचा आग्रह करते, त्या 'सुना दिजीये ना' ह्या वाक्यात अत्यंत मोहक असा एक विभ्रम आहे. त्यानंतर ती लाजून मानेला जो हलकासा झटका देते त्या नखऱ्याला जवाब नाही. चित्रपटात तिची लेक बनलेल्या माधुरी दीक्षितला देखील कदाचित तो झटका बघून रीमा लागूचा हेवा वाटला असेल.
रीमा लागूंच्या व्यक्तिमत्वातच ते विलक्षण लाघव ठासून भरलेलं होतं. त्यांनी आणि सुप्रिया सबनीस ह्यांनी सासू-सुनेची भूमिका केलेली 'तू तू मैं मैं' ही मालिका एके काळी छोट्या पडद्यावर खूप गाजली होती. एकमेकांवर कुरघोडी करू पहाणारी आणि तरीही एकमेकींवर जीव असलेली सासू-सुनेची जोडी दोघीनींही जीव ओतून रंगवली होती. ह्या मालिकेतली सासू दुष्ट नव्हती, कजाग नव्हती, कारस्थानी नव्हती पण खोडकर होती. अश्या हलक्या फुलक्या भूमिका रीमा लागू फार सुंदर रंगवायच्या. पण केवळ अशा लाडिक, डोक्याला ताण न देणाऱ्या भूमिका करणारी अभिनेत्री अशीच केवळ त्यांची ओळख नव्हती. 'पुरुष' सारख्या जयवंत दळवींच्या अत्यंत विस्फोटक नाटकात त्यांनी केलेली भूमिका खूप गाजली होती. विकृत पुरुषी मनोवृत्तीला आणि वासनेला बळी पडलेल्या आणि रागाने पेटून त्याचा सूड घेणाऱ्या एका स्त्रीची भूमिका रीमा लागू ह्यांनी त्या नाटकात केली होती. नाना पाटेकर, उषा नाडकर्णी आणि रीमा लागू ह्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांमुळे हे नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा खूप गाजलं होतं. सविता दामोदर परांजपे हे त्यांचे दुसरे गाजलेले नाटक. प्रेमात धोका देणाऱ्या पुरुषाला धडा शिकवणाऱ्या एका काहीश्या गूढ वाटणाऱ्या बाईची भूमिका रीमा लागूंनी ह्या नाटकात केली होती. अजूनही ह्या नाटकाची चित्रफीत प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
रीमा लागू ह्यांचे मूळचे नाव नयना भडभडे. त्या मूळच्या पुण्याच्या. हुजूरपागा शाळेत शिकत असतानाच त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरवात केली होती. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. अभिनेते विवेक लागू ह्यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी नाव बदलले आणि पुढे रीमा लागू ह्याच नावाने त्या भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी आणि छोटा पडदा अश्या तिन्ही माध्यमांवर त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. गोल देखणा चेहेरा, अत्यंत बोलके, लाघवी, किंचित घारे डोळे, मनमोकळे, उत्फुल्ल हास्य आणि विलक्षण प्रभावी देहबोली ह्या सगळ्याच्या जोरावर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचे असे मानाचे स्थान निर्माण केले. ’आक्रोश, ‘कलयुग’ यासारख्या 'कलात्मक' वास्तववादी चित्रपटांपासून ते ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’ 'कल हो ना हो' ह्यासारख्या तद्दन कमर्शियल चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. विनोदी, खेळकर भूमिका त्यांनी चांगल्या रंगवल्याच पण धीट, धीरगंभीर अश्या व्यक्तिरेखाही त्यांनी तितक्याच ताकदीने रंगवल्या.
अमोल पालेकर ह्यांनी अल्झायमर ह्या स्मृतिभ्रंशाच्या रोगावर 'धूसर' नावाचा चित्रपट काढायला सुरवात केली होती. त्यात रीमा लागूंची प्रमुख भूमिका होती. तो चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित झाला की नाही माहित नाही पण युट्यूबवर त्याचे जे दोन-तीन प्रोमोज उपलब्ध आहेत, त्यात रीमा लागूंचे नुसते निर्विकार, कोरे करकरीत डोळे पाहीले तरी त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो. हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नसेल तर तो लवकर प्रदर्शित करणे ही रीमा लागू यांना एक चांगली श्रद्धांजली होऊ शकेल. रीमा लागू काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे रुपेरी पडद्यावरचे ते देखणे, परिपक्व लाघव आता कायमचे लोपले आहे.
- शेफाली वैद्य