स्तन्य दुष्टी व उपाय

16 May 2017 12:40:37
 
 
 
 
मागील काही लेखांमधून स्तन्याबद्दलच्या विविध पैलूंची माहिती आपण जाणून घेतली. स्तन्यनिर्मिती, त्याची बालकाला (नवजात) गरज, उत्तम स्तन्याची लक्षणे आणि दुष्टीची / बिघडण्याची कारणे, हे सर्व मुद्दे आपण वाचले. तेव्हा आजच्या लेखातून त्या दुष्टींवर उपाय बघूयात.
 
बाळाचे आरोग्य, ताकद, रंग, स्वभाव, प्रकृती, गुण-अवगुण तसेच अनारोग्य या सर्व गोष्टींवर माता-पित्याच्या बलाबलत्वाचे पडसाद उमटतात. जन्माला आल्यानंतरही ते नवजात बालक भरण-पोषणार्थ संपूर्णत: आईवर अवलंबून असते. स्तन्याद्वारे त्याचे फक्त पोटच भरत नाही, तर शरीराची, बुद्धीची, मनाचीही वाढ व तृप्ती होत असते. प्रतिकारशक्ती वाढत असते. परावलंबी स्थितीतून स्वावलंबी होण्याच्या प्रक्रियेतील पहिले सहा महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. शुद्ध स्तन्याने बालकाची वाढ उत्तम होते, पण अशुद्ध स्तन्यामुळे वाढ खुंटते आणि विविध आजार उत्पन्न होतात. (मूल वारंवार आजारी पडू लागते.) गर्भिणी आणि प्रसूतावस्थेत जर यथायोग्य आहार-विहार आणि आचार असला, अवलंबला, तर मातेसही कुठले आजार होत नाहीत. स्तन्यनिर्मिती उत्तम (निर्दोष व प्रमाणात) होते, पण जर आहार-विहार योग्य नसला, चुकीचा असला, तर स्तन्य दुष्टी (विकृत स्तन्य) उत्पन्न होते. हा बिघाड वा विकृती तीन प्रकारची असते. वातज, पित्तज आणि कफज.
 
वातज स्तन्य दुष्टी
परीक्षण- काचेच्या भांड्यात पाणी (स्वच्छ) घ्यावे. त्यात ज्या स्तन्याचे परीक्षण करायचे आहे, त्याचे थेंब हळूहळू सोडावेत. शुद्ध स्तन्य चटकन पाण्यात मिसळते, एकरूप होते, पण जर ते दूध/स्तन्य पाण्यात न मिसळता पाण्यावर तरंगले, तर ते स्तन्य वातज दुष्टीचे आहे, हे जाणावे.
 
अन्य लक्षणे
असे स्तन्य चवीला तुरट-कडू असते. शुद्ध स्तन्य पांढरेशुभ्र (शिंपल्यासारखे) असते, पण वात दूषित स्तन्य हे अरुण वर्णी असते, तसेच त्याला फेसाळपणा अधिक असतो. त्याला विशेष वेगळा गंध नसतो आणि रुक्ष गुणाचे असते. असे वात दूषित स्तन्य प्यायल्याने नवजात शिशूचे समाधान होत नाही, तृप्ती मिळत नाही.
बाळावर परिणाम - अशा वात दूषित स्तन्यामुळे बाळाला लघवी साफ होत नाही आणि शौचासही फेसाळ, कोरडे होते. पोट वारंवार फुगते, गुबारा धरतो.
 
उपाय 
यावर उपाय म्हणजे, स्तन्यातील रूक्षता, कोरडेपणा कमी व्हावा यासाठी औषधी वापरावीत. वातशामक, वातघ्न औषधांनी सिद्ध तूप रोज मातेला पिण्यास द्यावे. सौम्य स्वरूपात विधीपूर्वक पंचकर्म करावे (जसे विरेचन , बस्ती इ.) चिकित्सेची पहिली पायरी नेहमी निदान परिवर्तन हीच असते. त्यामुळे वातकर, वातूळ, वातवर्धक खाणे टाळावे. तसेच अतिशीत-वार्‍याच्या संपर्कात बसू नये, रात्री जागरण करू नये, दशमूलारिष्ट औषधाचा उत्तम उपयोग होतो. एरंडेलाचाही फायदा होतो, पण औषधी चिकित्सा तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच अवलंबावी. वातशामक औषधांनी सिद्ध तेलाने अंग चोळावे (मालीश करावी) अभ्यंगपूर्वक बाष्प स्वेद (वाफारा) घ्यावा. म्हणजेच, तेल लावून कोमट किंवा गरम पाण्याने आंघोळ आणि धुरी या गोष्टी प्रसूतेने पाळाव्यात.
आहारातून वेखंड, सुंठ, पिंपळी, ओवा, काळीमिरी इ. चा वापर करावा. शोक-चिंता करू नये.
 
पित्तज स्तन्य दुष्टी
परीक्षण- काचेच्या भांड्यातील स्वच्छ पाण्यात जर स्तन्याचे थेंब सोडल्यावर पिवळ्या रंगाच्या छटा, रेषा दिसल्या, ते स्तन्य जर पाण्यात एकरूप झाले नाही, तर ते स्तन्य पित्तदोषयुक्त समजावे.
 
अन्य लक्षणे
हे स्तन्य पांढरेशुभ्र नसते. काळसर, पिवळसर तांबूस रंगाच्या रेषांयुक्त/छटायुक्त असते. ते चवीला तिखट, आंबट, खारट असते आणि नंतर तोंडाची चव कडू होते. अशा स्तन्याला दुर्गंध असतो (कुणप म्हणजेच शवगंधी) किंवा रक्ताच्या वासासारखा गंध असतो. स्पर्शाला ही गरम वा उष्ण जाणवते.
 
बाळावर परिणाम
असे पित्तदूषित स्तन्य जर बाळ प्यायले, तर ते चवीलाही तीक्ष्ण असते आणि शरीरात परिणामही तीक्ष्णच होतो. खूप उष्ण पडते. विदाह (आग-धाग) उत्पन्न होतो. त्या बाळाला वारंवार तोंड येते आणि आतून तोंड लाल होते. त्याला शीत संपर्क आवडतो, सहन होतो (थंड जागी राहणे, थंड हवा आवडते) कुठलीच गरम गोष्ट त्या बाळाला सहन होत नाही.
 
उपाय
पित्ताची उष्ण-आंबट आणि तिखट या गुणांनी वाढ झाल्यास स्तन्यात विकृती उत्पन्न होते. ती कमी करण्यासाठी या गुणांवर उपाय करावेत, यांना कमी करावे. सौम्य स्वरूपातील विधीपूर्वक विरेचन करावे. याने पित्ताचे शरीरातून निष्कासन होत (बाहेर काढले जाते आणि पित्तदुष्टी कमी होते. चंदन, वाळा, गुलकंद इत्यादीचा वापर करावा. वाळ्याचे सरबत, आवळ्याचे सरबत, मोरांबा खावा. गुळवेल, शतावरी, कडुनिंब, चंदन यांचा वापर करावा. पित्तशामक औषधांनी युक्त तेलाने अभ्यंग (मृदू) करावे आणि अंगावर काढा शिंपडावा. द्राक्ष, मनुकांचा लेप करावा. बाळाला पित्तज स्तन्यामुळे जुलाब होत असल्यास, उल्टी-मळमळ होत असल्यास कोहळा वापरावा (पाणी प्यावे) जेष्ठमध, द्राक्ष यांचा उत्तम फायदा होतो. आहारात तुपाचा वापर करावा, दूधभात (मीठ न घालता) खावा, थंडावा येईल असा आहार विहार असावा.
 
कफज स्तन्य दुष्टी
परीक्षण - काचेच्या भांड्यातील स्वच्छ पाण्यात जर स्तन्याचे थेंब पाण्यात तळाशी जाऊन बसले, तर ते कफाने दूषित आहे, असे समजावे.
 
अन्य लक्षणे
कफाने दूषित स्तन्य अधिक दाट असते, थोडे स्निग्धांशाचे प्रमाण अधिक असते, रंगाला पांढरे असते, चवीला अधिक गोड असते आणि नंतर तोंडाला खारट चव येते. कफाने दूषित स्तन्याचा वास हा तेल-तुपासारखा किंवा मांसासारखा असतो. हे दूध बुळबुळीत असते, चिकट असते आणि तंतुयुक्त असते. कफदुष्टी स्तन्यप्रमाणातही जास्त असते आणि पचायलाही जड असते म्हणजे यात घनता आणि क्षारता अधिक असते.
 
बाळावर परिणाम
पचायला जड असल्याने हे स्तन्य एकदा प्यायल्यावर लगेच पचन होत नाही. भूक लागत नाही, तसेच ते बाळ खूप झोपते, आळशी होते, त्याच्या हालचाली मंदावतात. नुसते पडून राहते. वजनही झपाट्याने (प्रमाणापेक्षा अधिक) वाढते. शौचास चिकट आणि आंबूस होते. तसेच प्रमाणही अधिक असते. कफामुळे लाळ अधिक तयार होते आणि सुटते. कृमीही (जंत) होण्याची शक्यता वाढते.
 
उपाय
अतिरिक्त वाढलेला कफ मातेच्या शरीरातून काढावा यासाठी मृदुवमन (विधीपूर्वक) द्यावे. त्रिफळा-नागरमोथा इत्यादीचा काढा प्यावा, सैंधव जेष्ठमध वापरावे, कफशामक आणि कफघ्न औषधांनी युक्त काढे प्यावेत. कफशामक औषधांनी तयार केलेले तूप नाकात घालावे (नस्य), तोंडात धरावे, वाफ-धूर घ्यावी तसेच शेकावे. सगळे उपाय प्रथम मातेवर करावेत आणि गरज पडल्यास थोड्या मात्रेत बालकांसही द्यावे. घरगुती उपाय सुरुवातीस काही दिवस (१०-१५ दिवस) करून बघावेत; अन्यथा वैद्यांना दाखवून औषधी चिकित्सा करावी.
 
स्तन्याचे फक्त प्रमाण नीट असून उपयोगाचे नाही (Only Quantity not to be relied upon)त्याची गुणवता, शुद्धीही तितकीच महत्त्वाची आहे. स्तन्य शुद्ध असणे आणि ते तसे टिकविणे हे दोन्हीही मातेच्या हातात आहे. पोषक आहार, संपूर्ण विश्रांती (झोपून राहणे नव्हे) आणि शारीरिक-मानसिक भावनिक सुुस्थिती जपणे यावर नवजात बालकाचे भावी आयुष्य अवलंबून आहे.
 
- वैद्य कीर्ती देव
Powered By Sangraha 9.0