२९ एप्रिल रोजी पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, रावत नेचर अकॅडमी आणि द सेंटर फॉर इंटरनेट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेतील ज्ञान विकिपिडीयावर वाढवण्याकरिता एक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये, जेष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ श्री. माधवराव गाडगीळ, मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर, श्री. प्रदिप रावत आणि श्री. सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे, आणि ज्ञान भाषा देखील आहे. यामुळे मराठी भाषेमध्ये लिहिलेले आणि खुप दिवसांपासून प्रकाशात न आलेले असे सर्व विषय मराठी विकिपिडीयावर लिहिलेले जावेत, याकरिता श्री. सुबोध कुलकर्णी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जगामध्ये असलेले सर्व ज्ञान त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध व्हावे, याकरिता इंटरनेटच्या या युगात इतर सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांनी पुढाकार घेतलेला असताना, मराठी भाषेतील लिखित ज्ञान मराठी विकिपिडीयावर आणण्यासाठी प्रयत्न म्हणून या चर्चासत्रात मान्यवरांनी अनेक मुद्दे मांडले.
यावेळी बोलताना श्री. माधवराव गाडगीळ म्हणाले,“इंटरनेटच्या या बदलत्या युगात, मराठी भाषेत लिहिले गेलेले परंतु खुप दिवसांपासून पोथ्या-पुराणांमधून, ग्रंथांमधून लिखित स्वरुपात असलेले ज्ञान सर्वांना वाचण्यासाठी मराठी विकिपिडीयावर टाकले जावे.” यावेळी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी मराठी विकिपिडीयावर लिखाण करून, मराठी लिखाणाची एक चळवळ उभी करावी असे श्री. प्रदिप रावत म्हणाले. मराठी विश्वकोष आणि मराठी विकिपीडिया यांच्यामध्ये योग्यरीतीने साधर्म्य साधण्यात येईल असे मत मराठी विश्कोशाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर यांनी मांडले. श्री. सुबोध कुलकर्णी यांनी चर्चासत्रामध्ये मराठी विकिपिडीयावर लिखाण कसे करावे याचे अल्पसे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या अधिकाधिक लोकांनी मराठी विकिपिडीयावर लिखाण करावे असे आवाहन केले.
मराठीमध्ये लिखित स्वरुपात असलेल्या साहित्याचे स्कॅनिंग मोठ्या प्रमाणावर अनेक संस्थांतून चालू आहे. अनेक शासकीय संस्थानमधून या साहित्याचे डिजीटलायजेशन केले जात असून लवकरच हे साहित्य सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरिता मराठी विकिपीडियावर आणले जाणार आहे. अग्रक्रमाने कोणते साहित्य स्कॅनिंग, ओसीआर करून विकिस्रोत माध्यमातून उपलब्ध करून द्यावयाचे ह्याचा काळजीपूर्वक विचार केला जात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.