शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "झायका"

25 Apr 2017 15:43:00

म्हातारपण हे अनेकांसाठी त्रासदायक असतं. म्हातारपणात अनेक इच्छा माराव्या लागतात. आरोग्यासाठी, तब्येतीसाठी आपल्या अनेक इच्छांवर पाणी सोडावं लागतं. आणि बरेचदा घरातील इतर मंडळी म्हणजेच मुलगा, सून, नातवंड यांच्या नकळत असं काही होतं, ज्यानी या म्हातारपणाची जाणीव आणखीनच जास्त होते. त्यातून वय काही असू देत पण सासू सुनेचं नातं म्हटलं की खटपट ही आलीच. मात्र याच म्हातारपणात एखादी सून आपल्या सासूला समजून घेत तिच्यासाठी स्वत: देखील त्या त्रासातून जायला तयार असेल तर?

नेमका विषय कळला नाही ना?... झायका ही कहाणी आहे अशाच एका आज्जींची. वयामुळे आवडत असून सुद्धाही चविष्ट खाण्याशी नातं तुटलं. मुलगा सून चविष्ट जेवण जेवत असताना आपल्याला मात्र तीच गिळगिळीत खिचडी रोज खावी लागते. याचं दु:ख वेगळंच. त्यातून आपल्या मनासारखं करायला गेलं तर.. मुलगा रागवणार हे नक्कीच.. मात्र अशा वेळी समजून घेते ती सून. कदाचित ती त्यांच्या वेदना कमी करु शकत नाही.. पण त्या वेदना समजू मात्र नक्कीच शकते. 

या लघुपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे दिग्दर्शन केले आहे हर्षिता जोशी यांनी आणि यामध्ये अभिनय केला आहे त्यांच्या सासू आणि आजे सासू म्हणजेच आभा जोशी आणि पुष्पा जोशी यांनी. एकाच लघुपटात तीन पिढ्यांचं कौशल्य दिसून आलं आह. इंडी रूट्स फिल्म्स यांनी प्रदर्शित केलेल्या या लघुपटात सर्वांचं मन जिंकून घेतो तो म्हणजे आज्जींचा अभिनय.
 
नक्की बघावा असा हा लघुपट आहे. 

 

- निहारिका पोळ

Powered By Sangraha 9.0