मोदी-शाह यांच्या कृतीचा अर्थ

30 Mar 2017 17:10:00

एका गावात नदीच्या काठी रोज रामकथा सुरू असते. गावातून अनेक भाविक कथेला दररोज न चुकता येतात. एक दिवस कथा सुरू होण्यापूर्वी जोरात पाऊस येऊन नदीला पूर येतो. कथाकार विचार करायला लागतो, ’आज कथा सांगण्याचा कार्यक्रम करणे शक्य दिसत नाही, कारण ऐकायला कोणीच पोहोचू शकणार नाही.’ इतक्यात भिजल्या अंगाने एक भाविक तिथे येऊन पोहोचला आणि आशेने हात जोडून कथाकाराकडे पाहू लागला. कथाकाराला त्याला या अवस्थेत पाहून थोडासा धक्का बसला. त्या विस्मयातून स्वत:ला सावरत त्याने भाविकाला एक प्रश्न विचारला, ’’एवढा पूर आलेला असताना तू नदी पार करून आलास कसा?’’ भाविकाने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले,’’महाराज, आपणच रामकथेत सांगितले होते की, कितीही मोठे संकट आले तरीही न डगमगता रामाचे नाव घ्यायचे आणि प्रवासाला सुरुवात करायची. मी तसेच केले आणि नदीच्या पलीकडे पोहोचलो.’’ भारतीय राजकारण ज्याप्रकारे कूस बदलत आहे त्यामागे मोदी- शाह या जोडीने आत्मसात केलेला भावच आहे. आपल्या विचारसरणीच्या माध्यमातून विश्वाचे जे दर्शन आपल्याला घडले, त्याच दृष्टिकोनावर ठामराहून या द्वयीने आपले काम चालविले आहे. त्यांनी कुणाचीही हयगय केलेली नाही. कोण काय म्हणते? मीडियाला काय वाटते? आपल्याकडील तथाकथित बुद्धिवंतांना काय वाटेल, याचा फारसा विचार करताना ही दोन्ही मंडळी दिसत नाहीत आणि हाच त्यांचा वेगळेपणा आहे. ’लखनौ करार’ हा भारतातल्या मुस्लीम तुष्टीकरणाचा प्रारंभ. मात्र, ज्या उत्तर प्रदेशात हा ‘लखनौ करार’ झाला त्याच उत्तर प्रदेशात मोदी-शाह जोडीने तुष्टीकरणाचा डाव मोडून काढला. आपल्याकडे अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणे म्हणजेच ’सेक्युलॅरिजम’ असा अर्थ कॉंग्रेसने रूढ केला होता. डाव्या विचारांच्या मंडळींनी याला मूक संमती दिली. याचा परिणाम म्हणून मुस्लीम मतांची किंमत वसूल करणारे मतांचे दलाल ठिकठिकाणी उभे राहिले. मोदी व शाह यांनी हे तुष्टीकरणाचे चक्र भेदले आणि आज उत्तर प्रदेशात ’राममंदिर झाले पाहिजे,’ अशा आशयाची मुसलमानांनी लावलेली मोठमोठाली होर्डिंग्ज दिसायला लागली आहेत. अर्थात यामुळे राममंदिर उभे राहील, असा अर्थ लावणे भाबडेपणाचे ठरेल. पण नव्वदीच्या दशकात कुठल्याही मुस्लिमाने असे होर्डिंग्ज लावण्याचे धाडस केले नसते.

तुष्टीकरणाचा हा डाव मोडणे कुठलेही शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड होते. या जोडीने शिवधनुष्य पेललेही आणि त्यावर विजयाची प्रत्यंचाही चढविली. त्यातून जे यश मिळाले त्याचे आज अनेक अर्थ लावले जात आहेत. जे आज हे यश उच्चरवाने साजरे करीत आहेत, त्यांनाही हा विजय इतका शानदार असेल याची कल्पना नसावी. जे यश आज या जोडीने मिळविले त्यामागे भाजपचे पूर्वसंचित नक्कीच आहे. मात्र, जे धाडस भाजपची मागची पिढी करू शकली नाही, ते या पिढीने करून दाखविले आहे. माध्यमे काय म्हणतील? राष्ट्रीय वाहिन्यांवर काय झळकेल याची फिकीर मोदींनीही कधी केली नाही. अमित शाह यांनी तर नाहीच नाही; किंबहुना या दोघांनाही खलनायक ठरविण्याचे इतके प्रयत्न मागील काही वर्षांत केले गेले की, त्यांनीही माध्यमांची चिंता करणे सोडून दिले. ’विकास’ हा मोदींचा मंत्र त्यांनी सोडलेला नाही. ’’या विजयाचे श्रेय मोदींच्या विकासान्मुख नेतृत्वाला आहे,’’ असे विश्र्लेषण दिल्लीतील माध्यम पंडितांनी करून झाल्यानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले. इथे सगळ्या छद्मी सेक्युलरांना खरा धक्का बसला. हाच खरा मोदींचा चेहरा आहे, अशी ओरडदेखील काहींनी सुरू केली. ज्यांच्या विचारसरणींचे तारू कुठल्या कुठे भटकले आहे, त्यांनी लगेचच ’ध्रुवीकरण ध्रुवीकरण’ असा कांगावा करायला सुरुवात केली. खरंतर हे ध्रुवीकरणच होते. ठामविचार विरुद्ध असंबद्ध ढोंगी द्वेषपूर्ण पत्रकार. सश्रद्ध कर्ता विरुद्ध निधर्मीवादाची पोपटपंची करणारे विचारवंत. दिल्लीत बसून देशाच्या भवितव्यावर भाकीत करणारे पंडित विरुद्ध प्रचाराच्या रणांगणात झोकून देऊन उतरलेले मोदी. ज्या ध्रुवीकरणाच्या कपोलकल्पित कथा पसरवल्या गेल्या त्या ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ यातील कितीतरी मुसलमानांनी मोदींना भरभरून मते दिली. या जोडीची पुढची वाटचालही तशीच असणार आहे, यात काही शंका नाही. मोदींनी आपल्या दमदार वाटचालीने तसे संकेत देऊन टाकले आहेत. ते ज्यांना समजले आहे ते वेळीच शहाणे होतील आणि ज्यांना समजत नाही ते मोदीद्वेषाच्या अफूत घुमत राहतील.

या दोघांच्या कार्यपद्धतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण नेमकी दहा पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१. हिंदू समाजावर विश्वास ठेवा.

२. अन्य समाजांचे तुष्टीकरण करू नका किंवा द्वेषही करू नका.

३. आपल्या कार्यपद्धतीत सर्वांना सहभागी करून घ्या.

४. आपला विश्वास ठामअसेल तर जग काय म्हणेल याची चिंता करू नका.

५. आपले कामहे निरंतर करण्याचे कामआहे.

६. यशाने अहंकारी होऊ नका आणि पुढचे टप्पे विसरू नका.

७. राष्ट्रीय वृत्तीचा हिंदू समाज हाच या देशात काही बदल घडवून आणू शकतो.

८. आपल्या समाजात बदल क्रांतीने नव्हे तरी उत्क्रांतीने होतो. ९. प्रत्येक परिवार क्षेत्राला मूलभूत ध्येय न बदलता आपली कार्यपद्धती ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे.

१०. आपले ध्येय असीम, अनंत आहे. छोट्या यशाने तृप्त होऊ नका.

 

किरण शेलार

९५९४९६९६३७

Powered By Sangraha 9.0