आकाशाशी जडले नाते- प्रकाशसूत

29 Mar 2017 08:31:00

 


दुर्गाबाईंनी सुमितला तहानलाडू, भूकलाडू बांधून दिले. “जपून रहा बरे सुमित! आणि फोटो पाठवायला विसरू नकोस!”, दुर्गाबाईंनी पुन्हा एकदा आठवण केली.

“भरपूर फोटो पाठवीन आजी, व्हीडीओ पण पाठवीन! माझ्या कॅमेरा मधून तू मस्त घर बसल्या जपान बघ!”, सुमित म्हणाला.

“मागचे १० महिने आपण शंकररावांबरोबर घर बसल्या सूर्याबरोबर प्रवास केला तसे!”, दुर्गाबाई म्हणाल्या.

“आबा, आपण अवकाशातून आणि पृथ्वीवरून सूर्याचा मार्ग पहिला. त्याच्या मंदिरांची यात्रा केली. त्याच्या गती प्रमाणे कालमापन केले. आपल्या जीवनावरील त्याचा प्रभाव पहिला. आणि अनेक संस्कृतींना लाभलेला त्याचा भक्कम पाया पहिला. मला या गोष्टींमधून खूप काही शिकायला मिळाले!”, सुमित म्हणाला.

“आणि सुमित, तुझ्यासारख्या रसिक श्रोत्यामुळे आपला प्रवास सुंदर झाला! आज या प्रवासाच्या शेवटच्या पानावर, तुझ्यासाठी आशीर्वाद आणि तुझ्यातील सूर्याला हे अर्ध्य अर्पण.”, आबांनी खिशातून त्यांनी लिहिलेली एक लहानशी कविता काढून वाचायला सुरवात केली -  

ग्रह - तारे तुजपाठी उभे रे,

नक्षत्रे उजळती मार्ग तुझा!

तेजबिंदू तू, प्रकाशपूत रे,

उठ, उठ हो प्रकाशमान!

 

हो भास्कर, हो दीपस्तंभ तू,

वा तीमिरातिल, हो काजवा तू!

तेजाची ती ठिणगी आतली

व्यक्त करी, हो प्रकाशमान!

 

नभाहुनी दूर असा जो,     

ध्येयतारा तुज खुणावतो!

शंका कुशंकांचा नाद  

मन कुपित घुमतो!

 

ज्योत तू, अंगार तू,

तेजाचा दिव्य अंश तू,

पूस काजळी स्व-अश्रद्धेची,

मग होसी तू प्रकाशमान!

 

चाल वाट निस्संशय रे,

विश्वाचा तू बाळ रे,

प्रकाशसूता, अग्निरूपा,

विश्वशक्ती तुज पाठी रे!

 

“आबा, आता मी परत आलो की आपण पूर्वेकडील इंडोनेशिया, चीन, जपान आणि पश्चिमेकडील आफ्रिका आणि अमेरिका, येथील सूर्योपासना पाहायला जाऊ!”, आजी - आबांच्या पाया पडून सुमित म्हणाला.

“निश्चित! तुझा प्रवास सुखरूप होऊ दे! आणि अधून मधून फोन कर.”, आबांनी सुमितला  निरोप दिला.

- दिपाली पाटवदकर

 

Powered By Sangraha 9.0