विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग- १०

24 Mar 2017 10:10:00


अवंती: मेधाकाकू... आज माझी गाडी तुझ्यापुढे गेल्ये... हे लक्षात आलाय का तुझ्या......!! म्हणजे तुझ्या आधीच, मी तुझ्याच पुस्तकातल्या दोन-तीन म्हणी निवडल्या आहेत आणि आज त्यावर बोलायची तयारीही मी केली आहे......!! आणि याला तूच कारण आहेस......! अग, त्याचे झाले असे की तूच मला रोज आग्रह करत असतेस... रोजची वर्तमानपत्र वाचत जा म्हणून.... आणि मलाही पटले होते आणि गेले दोन आठवडे मी घरी येणारी दोन्ही वर्तमानपत्रे वाचते आहे आणि त्यामुळेच आजच्या म्हणी मीच निवडून काढल्या..!!

मेधाकाकू: अरे वा.... अवंती गाडी जोरात निघालीये पुढे... एकदम सही..!!.. मग सांग पाहू तुझी पहिली म्हण काय सांगतीये ते..!!  

अवंती: हो... मेधाकाकू..... त्या आधी थोडेसे ऐक !! अग, अजूनही होळी आणि शिमग्यातून मलाही बाहेर पडता येत नाहीये. मी अलीकडे वाचले की, उत्तर प्रदेशात आता योगी आदित्यनाथ नावाचे गृहस्थ मुख्यमंत्री झाले आहेत. भगव्या रंगाचे कपडे परिधान करणारे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या सत्तर वर्षातले पहिलेच मुख्यमंत्री अशी चर्चा मी वाचते आहे. आणि लगेचच टवाळपणे केलेले विनोदही ऐकते आहे. निर्णय घेऊन काम सादर करण्याआधीच त्यांच्याबद्दल कोणी असे लिहिणे मला पटत नाहीये.... म्हणूनच ही एक म्हण लक्षात राहीलीये माझ्या. 

अपमानाची मोळी सर्वांगाची होळी.

निवडणुकीतला आपला पराभव आणि चुकलेले अंदाज म्हणजे आपला अपमान आहे या भ्रमातून काही राजकीय नेते आणि पत्रकार अजूनही बाहेर पडू शकलेले दिसत नाहीयेत आणि तूच सांग..... हा वाकप्रचार, या परिस्थितीचे किती अचूक वर्णन करतोय  ते. काय काकू.... बरोबर आहे का ... मी काय म्हणत्ये ते ..!!

मेधाकाकू: क्या बात है... अवंती.... फारच मस्त आणि तुझे विश्लेषण अगदी छान जुळतय इथे आणि लाकडाच्या मोळीसारखे, यांचे अपमान यांनी जसे काही आपल्या डोक्यावर घेतलेत आणि जणू होळीचा दाह त्यांच्या उभ्या शरीराला जाणवतोय. होलिकोत्सव साजरा होऊन आठवडा होऊन गेला तरीही जाणवणारा हा अपमानाचा दाह आणि आता पुढचा वाकप्रचार...!!    

होळी नि शिमगा चैत्र नि पाडवा.

अवंती, कुठल्याही समाजात - कुठल्याही व्यवसायात, दिशाभूल करून-शब्दांचा खेळ करून पापभीरू प्रजेला फसवणारी लबाड माणसे असतातच. कोकणातला समाज पापभीरू आहेच पण तसाच हा कोकणातला देवभोळा-श्रद्धाळू माणूस फार शिकलेला ही नसतो, त्यामुळे सहज प्रवृत्तीने याचा कोणावरही पटकन विश्वास बसतो. या समाजात होळी-शिमगा-पाडवा हे सण आणि चैत्र महिना याचे महत्व फार असते आणि याचाच फायदा करून घेणारे लबाड सावकारही असतात. भरमसाठ व्याज दराने कर्जाऊ रक्कम घेण्याची अनिष्ठ प्रथा-पद्धत आजही या समाजात प्रचलित आहे. वाकप्रचारात वर्णन केल्याप्रमाणे “होळी नि शिमगा असे दोन महीने आणि चैत्र नि पाडवा असे दोन महीने”... एकूण चार महिने तू कर्जाऊ रक्कम घेतलीस असे फसवे हिशेब या गरीब अशिक्षितला अनेक पिढ्यानपासून सांगितले गेले आहेत. प्रत्यक्षात फाल्गुन हा शिमग्याचा महिना आणि चैत्र हा त्यापुढचा दुसरा महिना. मात्र सावकारी पाश अवळलेला असल्याने दोनाचे चार करून जे संगितले जाते, त्याचे वर्णन करणारा हा वाकप्रचार. आपल्या निष्ठा बदलून सामान्य समाजाची दिशाभूल करणारे आणि ‘मी कणकवलीचो’ असे सांगणारे सत्तेचे सावकारही कोकणात आजही आहेतच. हा वाकप्रचार म्हणजे नेहमीप्रमाणेच समाजाला दिलेला सावधानतेचा इशारा... !!

अवंती: मेधाकाकू मेधाकाकू....थांब जरा.. तू म्हणत्येस त्याप्रमाणे मी विचार केला तर देवभोळा-श्रद्धाळू आणि पापभीरू माणूससुद्धा फसवला जातो. म्हणजे त्याच्या असे सज्जन असण्याचा काहीच फायदा नसतो का...??

मेधाकाकू: अवंती... तसेच अगदी असते असे म्हणता येणार नाही मात्र जाणीवपूर्वक केलेली फसवणूक कोणालाही टाळता आली पाहिजे. याला दुसरे एक उदाहरण देते मी. फसव्या-लबाड व्यक्ती आणि स्वभावधर्मानेच वाचाळ व्यक्ती... यातला फरक आपल्याला समजला पाहिजे आणि करता आला पाहिजे. आता हा वाकप्रचार आणि त्यातली वाचाळ व्यक्ती... बघूया आपण...!!


गढीचा पाडवा आणि नीट बोल गाढवा. (गढी म्हणजेच गुढी).

अवंती: मेधाकाकू... नाही गं. लक्षात येत काही.... तूच सांग ना फोड करून....!!

मेधाकाकू: अवंती, आताचे दिवस म्हणजे चैत्र महिन्याचे आगमन. या दिवसात आंब्याच्या झाडाला मोहोर आलेला असतो, हवा शुद्ध ठेवणारे कडूलिंबाचे झाड बहरलेले असते, शेतातील पिकांची कापणी होऊन धान्याची साठवणी झालेली असते, म्हणजेच शेतीप्रधान समाजात सुगीचे दिवस आलेले असतात. याचा आनंद साजरा करण्यासाठी, आंब्याचे डहाळे, कडूलिंबाची पाने, साखरेचे बत्तासे, झेंडूच्या फुलांचा हार आणि भगवा रेशमी शेला आणि त्यावर चांदीचा गडू असे सगळे एकत्र करून ऊंच काठीवर आपल्या घरावर जो ध्वज उभारला जातो त्यालाच गुढी म्हणतात. चैत्र महिन्यातील प्रतिपदेला वर्षप्रतिपदा आणि गुढी पाडवा असे संबोधन वापरले जाते. तर घराघरातून अशी लगबग होत असते आणि शिमग्यातील सोंगे विसरून आपण स्वच्छ भाषेचा वापर करण्याची सर्वांची अपेक्षा असते. मात्र या लगबगीत शिमाग्याचा प्रभाव टिकून राहिलेला एखादा वाचाळ उगाचच सर्वांवर डाफरत असतो.... अरे पोरांनो आज ‘गढीचा पाडवा आणि म्हणून नीट बोल गाढवा…!! याच्या मनात काही नाहीये, मात्र दुसर्‍यांना उपदेश करताना मात्र अशा वाचाळ व्यक्तिला स्वत:चे बोलणे मात्र ऐकू येत नसते.

गुढी पाडव्याचा-आनंदाचा दिवस असूनही आणि याची जाणीव असूनही, सवयीचे गुलाम असलेल्या मात्र बुद्धी आणि मनाने स्वच्छ – स्पष्ट असलेल्या वाचाळ व्यक्तीचे वर्णन काही शतकांपासून आपल्या अभ्यासू – जागृत समाजाने केले आहे हे  या वाकप्रचारात लक्षात येते..!!  

अवंती: आता छान समजलं. मेधाकाकू.... 

मेधाकाकू: अवंती... तुझी गाडी पुढच्या आठवड्यातही, माझ्यापुढे अशीच सुसाट जाऊ दे. तुला आणि सर्व कुटुंबीयांना गुढी पाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा....!!

- अरुण फडके

Powered By Sangraha 9.0