योगी आदित्यनाथ आणि पुरोगामी राग विलापकल्याण 

20 Mar 2017 14:51:00

 

 

११ मार्चला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब ह्या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि स्वघोषित पुरोगाम्यांची दोन दिवस आधीच होळी झाली. त्यात गोवा आणि मणिपूर मध्ये भाजपने दुसऱ्या क्रमांकावर असूनदेखील काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा फायदा घेत काँग्रेसच्या नाकावर टिच्चून सरकार बनवलं. तिकडे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग स्वतंत्र संस्थानिक असल्यामुळे त्यांनी राहूल गांधींच्या लाडक्या सिद्धूला 'पंचायत संस्था आणि पुरातत्व' ही चिल्लर मंत्रिपदं देऊन काँग्रेस हायकमांडला चांगलाच हात दाखवला. उत्तराखंड मध्ये संघाचे जुने-जाणते स्वयंसेवक त्रिवेंद्र सिंग रावत हे मुख्यमंत्री झाले, आणि हे सगळे कमी म्हणून की काय, गोरखपूर इथल्या गोरक्ष पीठाचे अधिपती, योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. साहजिकच मीडिया आणि सोशल मीडियामध्ये गेले दोन-तीन दिवस पुरोगामी शिमगा सातत्याने साजरा होतोय. 

 

योगी आदित्यनाथांच्या नावाने इतके खडे फोडले गेले आहेत की सगळे प्रत्यक्षात वापरता आले असते तर काश्मीर ते कन्याकुमारी असा आठ पदरी महामार्ग तयार झाला असता. योगी आदित्यनाथ राजपूत कुटुंबात जन्मले, त्यांचे मूळचे नाव अजयसिंग बिश्त आहे वगैरे गैरलागू माहिती मोठ्या उत्साहाने 'शोध पत्रकारितेच्या' नावाखाली पुरवणाऱ्या ह्या नवपत्रकारांना हेही माहित नाही की भारतीय धर्मपरंपरेनुसार संन्यासी हा जीवनमुक्त असतो. पूर्वायुष्याचे, नात्या-गोत्यांचे, जाती-पातीचे, संस्कारांचे सगळे पाश तोडून, स्वतःचाच अंत्यविधी आणि श्राद्धविधी करूनच संन्यास घेता येतो. योगी आदित्यनाथ हे पूर्वी कोण होते ह्याने काहीही फरक पडत नाही. आयुष्यभर फक्त दलितांचे राजकारण खेळत आलेल्या मायावती आता म्हणतात की भाजपने राजपूत मुख्यमंत्री देऊन ब्राह्मणांचा आणि इतर मागासवर्गीयांचा विश्वासघात केलाय. हे निर्लज्ज, जातीयवादी वक्तव्य करताना ना मायावतीना  कसली लाज वाटली ना ह्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांच्या मीडियामधल्या भाट-चारणांना. म्हणजे जात हा शब्द वापरून भारतात राजरोसपणे राजकारण करायला कुठल्याच पुरोगाम्यांची हरकत नाही. 'निधर्मी' राजकारणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे रीतसर लांगूलचलन करायलाही कुणा विचारवंतांची हरकत नाही पण त्या लांगूलचालनाची प्रतिक्रिया म्हणून हिंदू समाज जाती-पातीची बंधने तोडून एकत्र आला, आपली राजकीय ताकद दाखवायचा प्रयत्न करू लागला तर मात्र जणू काही ह्या स्वघोषित पुरोगाम्यांवर आभाळच कोसळते. 

 

गेल्या काही दिवसात मीडिया आणि सोशल मीडियावर सतत चालू असलेला 'पुरोगामी' आक्रस्ताळेपणा आणि चडफडाट खरं तर खूपच विनोदी आहे. ह्या जळफळाटयुक्त प्रतिक्रिया वाचताना मला तरी अंगावर मीठ पडल्यावर जळवा कश्या तडफडून सैरावैरा पळू पाहतात त्याची आठवण झाली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा सगळा चडफडाट आणि तळतळाट हा प्रतिक्रियात्मक स्वरूपाचाच आहे. ह्या स्वघोषित पुरोगाम्यांनी सत्तर वर्षे त्यांच्या हातात सत्ता असूनदेखील आज देशात भाजपचा आलेख सतत वर जाताना का दिसतोय ह्याचे परखड विश्लेषण करण्याचा प्रयत्न केल्याचे फार क्वचित दिसते. कारण आपण कुठे चुकलो हे शोधायला मुळात स्वतःकडे एक बौद्धिक प्रामाणिकपणा असावा लागतो, तो ह्या दांभिक वर्गात मुळातच नाहीये. सध्याचे बहुतेक स्वयंघोषित पुरोगामी म्हणजे डाव्या, काँग्रेस किंवा समाजवादी ह्यापैकी कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले, वर्षानुवर्षे सरकार कृपेचा मलिदा खाऊन लठ्ठ झालेले मठ्ठ लोक आहेत. 


वैचारिक बद्धकोष्ठ, बौद्धिक अजीर्ण आणि शाब्दिक जुलाब ह्या तिन्ही रोगांनी एकाच वेळेला ग्रस्त असलेले हे स्वयंघोषित पुरोगामी लोक कसलं आत्मपरीक्षण करणार? ह्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था यांनी देशोधडीला लावल्या, सहकारासकट सगळ्या हाती असलेल्या चळवळींचे मातेरे केले आणि वेगवेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्याना ह्यांनी बौद्धिक टिळे लावून पावन करून घेतले. अर्थात हा पुरोगाम्यांना झालेला पक्षाघात भाजपच्या आणि 'उजव्या' विचारसरणीच्या लोकांच्या पथ्यावरच पडला. जनताही ह्या आक्रस्ताळेपणाला कंटाळलेलीच होती आणि योग्य पर्यायाच्या शोधात होती. तो पर्याय मोदींच्या स्वरूपात भारताच्या जनतेला सापडला आणि त्याचे फळ सध्या दिसतेच आहे. 

 

आज योगी आदित्यनाथांच्या नावाने जो मीडिया आणि सोशल मीडियावर जळफळाट व्यक्त होतोय त्यात तथ्य काहीच नाही. योगी आदित्यनाथ ह्यांना मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार करायची संधीही न देता त्यांचं अत्यंत आक्रस्ताळेपणाने मूल्यमापन केलं जातंय. हा आक्रस्ताळा जळफळाटच जनमानसातले योगी आदित्यनाथ ह्यांचे स्थान अजून पक्के करणार आहे हे जगजाहीर आहे. खुद्द नरेंद्र मोदी २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही असाच घाऊक जळफळाट मीडियातून व्यक्त झाला होता. त्या जळफळाटाचा मांजासारखा उपयोग करून मोदींचा पतंग उंच भरारी पंतप्रधानपदापर्यंत पोचला हा इतिहास आहे. पण इतिहासातून धडे घेता येतात हा विचारच जर ह्या तथाकथित पुरोगामी विचारवंतांना मान्य नाही तर काय करायचं?  

 

जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा मीडियाच्या दृष्टीने ते कम्युनल होते. पुढे अडवाणी जसजसे भाजप अंतर्गत शक्तिशाली व्हायला लागले, तसतसे अडवाणी 'कम्युनल' झाले आणि वाजपेयी त्यांच्या तुलनेत कसे 'सेक्युलर आणि उदारमतवादी' आहेत ह्याचा मीडियामधल्या स्वघोषित पुरोगाम्यांना साक्षात्कार झाला. भाजपमध्ये मोदी सत्तेवर आले तेव्हा मोदी 'नवे कम्युनल' झाले आणि अडवाणींचे सेक्युलरीकरण झाले. आता योगी आदित्यनाथ ह्या नव्या ताऱ्याचा उत्तरप्रदेश मध्ये उदय होतोय. आता हळूहळू पण निश्चितपणे मोदींच्या सेक्युलरीकरणाला सुरवात होईल. सेक्युलर आणि कम्युनल ह्या दोन शब्दांपलीकडे ह्या तथाकथित पुरोगाम्यांची धाव जातच नाही त्याला देशाने तरी काय करावे?   

 

- शेफाली वैद्य   

Powered By Sangraha 9.0