सध्या पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे. एकूणच ह्या ममताबाईंचं मुस्लिम अनुनयाचं राजकारण बघता ह्या पक्षाला तृण-मुल्ला काँग्रेस हे नाव देणंच योग्य होईल. 'पोरीबॉर्तन' ह्या गोंडस नावाखाली हा पक्ष सत्तेवर आला. डाव्या पक्षांच्या झुंडशाहीला कंटाळलेल्या बंगाली जनतेने ह्या प्रादेशिक पक्षाला भरभरून मतदान केलं. पण आता परिस्थिती बघता बंगाली हिंदूंना तरी आगीतून फुफाट्यात आल्यासारखंच वाटत असेल. धुलागढ चे दंगे असोत वा मालदा मधले हिंदूंचे स्थलांतर, ममता बॅनर्जी सरकारने नेहमीच मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचे राजकारण केले आहे. इंद्रधनुष्याचे बंगाली राम धनु हे नाव बदलून त्याचे रोंग धनु असे नवीन 'सेक्युलर' नामकरण करणे, दुर्गा पूजा ह्या बंगालमधल्या सर्वाधिक लोकप्रिय उत्सवाला 'शरद उत्सव' हे नाव देणे. मुहर्रम आणि दुर्गा विसर्जन एकाच दिवशी आले म्हणून दुर्गा विसर्जनाला बंदी घालणे. खुद्द पंतप्रधानांवर फतवा काढणाऱ्या एका तांबड्या दाढीच्या मुल्ला बरोबर फिरणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोलकाता येथे होणाऱ्या मेळाव्यावर शेवटच्या क्षणाला बंदी घालण्याचा वटहुकूम काढणे आणि मतांसाठी बांगलादेशी घुसखोरांची हांजी हांजी करणे हे ममता बॅनर्जी सरकारचे अधिकृत धोरण आहे. २०१६ मध्ये कोलकाता हायकोर्टाने तृणमुल्ला सरकारच्या ह्या अल्पसंख्यांकांचे सतत तुष्टीकरण करणाऱ्या धोरणावर कडक ताशेरे झोडले होते. पण सत्तेचा माज ममता बॅनर्जी ह्यांच्या डोक्यात इतका शिरलाय की त्या ऐकायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्री आणि बंगालचे खासदार भाजपचे बाबूल सुप्रियो आणि भाजपच्या नेत्या रूपा गांगुली ह्यांच्यावर देखील जिथे हल्ले होतात तिथे सामान्य हिंदू नागरिक किती असुरक्षित भावनेने जगत असेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
पश्चिम बंगाल सरकारचा सगळ्यात ताजा हल्ला सरस्वती पूजेवरचा आहे. आज वसंत पंचमी. बंगाली संस्कृतीमध्ये हा दिवस सरस्वती पूजा म्हणून साजरा केला जातो. शाळांमधून विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र जमून सरस्वतीची पूजा करतात. विद्येची देवता जी सरस्वती, तिचा आशिर्वाद विद्यार्थ्यांवर सतत राहू दे अशी प्रार्थना ह्या दिवशी बंगाल मधल्या प्रत्येक शाळेतून केली जाते. ही सरस्वती पूजनाची परंपरा फार जुनी आहे. आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की सरस्वती पूजनाच्या दिवशी नवीन संकल्पांची आणि शैक्षणिक संस्थांची सुरवात करायची. ह्याच संकेताला अनुसरून पंडित मदन मोहन मालवीय ह्यांनी बनारस हिंदू विश्व विद्यालयाची स्थापना १९१६ मध्ये ह्याच दिवशी केली होती. गुरुदेव टागोरांच्या शांतीनिकेतन मध्ये देखील वसंत पंचमी फार उत्साहाने साजरी केली जाते. मुलं-मुली पिवळ्या वेशभूषेत सरस्वतीची पूजा करतात, गाणी म्हणतात, नृत्य करतात.
उलूबेरिया नावाच्या गावातल्या तेहत्ता ह्या शाळेत गेली ६५ वर्षे वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा अखंडित चालू आहे. अगदी डाव्यांच्या निधर्मी राजवटीत देखील ह्या परंपरेत कधी खंड पडला नाही, पण ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यापासून ह्या शाळेवर मुसलमानी कट्टरपंथीयांचा डोळा आहे. काही स्थानिक मुसलमानांनी आक्षेप घेतल्यामुळे प्रशासनाने ह्या शाळेत मुलांना सरस्वती पूजा करण्यापासून रोखले व शाळेला टाळे लावले. ह्या निर्णयाचा विरोध म्हणून शाळकरी मुलांनी उत्स्फूर्तपणे सकाळपासून रस्त्यावर ठाण मांडून शांततामय मार्गाने रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पश्चिम बंगाल पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काही विद्यार्थी जबर जखमी झाले आहेत. २७ जानेवारी पासूनच ही शाळा धुमसत आहे. शाळेतली मुलं बसंत पंचमीची तयारी करायला लागल्यापासूनच ह्या शाळेवर इस्लामी कट्टरपंथीयांनी हल्ले सुरु केले. १ फेब्रुवारीला शाळेची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना पकडायचे सोडून पश्चिम बंगाल सरकार सरस्वती पूजा करू इच्छिणाऱ्या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर लाठ्या चालवत आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी की सोशल मीडिया वगळता ह्या प्रकरणाची माहिती मीडियामध्ये कुठेच नाही. अल्पसंखियांच्या बाबतीत कुठे खुट्ट झाले की महिनोनमहिने त्याचेच चर्वितचर्वण करणाऱ्या मीडियाला पश्चिम बंगाल मध्ये होणाऱ्या हिंदू जनतेच्या गळचेपीशी काहीही देणेघेणे नाही. हे असेच घडत राहिले तर पश्चिम बंगालचा पश्चिम बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. भन्साळी नावाच्या दिग्दर्शकाला थप्पड मारली म्हणून अस्वस्थ झालेले केंद्र सरकारचे मंत्री देखील ह्या प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे की हा दुटप्पीपणा कुणालाच संतापजनक वाटत नाही.
शेफाली वैद्य