आकाशाशी जडले नाते- एका ईश्वराचा उदय

01 Feb 2017 14:43:00

सुमित आला तेंव्हा आजी छान तयार होऊन बाहेर निघाली होती.

“काय आजी, देवीला चाललीस का?”, सुमितने विचारले.

“देवीला मंगळवारी! आज शनिवार आहे न, मारुतीला जाऊन येते! रोज एकेका देवाला visit देऊन यायची.”, दुर्गाबाई म्हणाल्या.

“सुम्या, मला सोमवार, मंगळवार काही नाही. कोणताही वार असो, मी आपलं एकाच देवतेची पूजा करतो. माझ्या दुर्गामातेला खुश ठेवलं की माझा दिवस मस्त जातो!”, आबा थट्टेने म्हणाले.

“हं! पूजा म्हणे! दुर्गामाताच या भक्ताला रोज नैवेद्याचं ताट वाढून जेवायला बोलावते!”, दुर्गाबाई जाता जाता म्हणाल्या.

“हा! हा! हे बरोबर आहे!”, सुमित हसत म्हणाला, “आबा, आता आपण कोणती सूर्य मंदिरे पहायची?”, सुमितने विचारले.

“आपल्याला आता दोन दीर्घ यात्रा करायच्या आहेत. इजिप्त आणि अरेबियाच्या मंदिरांची. आज इजिप्तने सुरवात करू.

“आधी थोडा इजिप्तचा इतिहास पाहू – ७,००० BCE पासून नाईल नदीच्या काठावर या संस्कृतीची सुरवात झाली. ७०० BCE पर्यंत २३ राजघराण्यांनी इजिप्त वर राज्य केले. त्यानंतर २०० वर्ष Assyrians नी राज्य केले. मग ३०० वर्ष पर्शियन लोकांनी राज्य केले. Alexander ने इजिप्त जिंकल्यावर, ३०० वर्ष ग्रीक लोकांनी राज्य केले. शेवटची ग्रीक सम्राज्ञी, क्लीओपात्राच्या मृत्युनंतर ७०० वर्ष रोमन राज्यकर्त्यांनी इजिप्तवर राज्य केले. या काळात इजिप्त मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आणि ६४० CE मध्ये अरबांच्या ताब्यात गेल्यावर इस्लामचा प्रसार झाला. १७९९ मध्ये फ्रेंच नेपोलियनने इजिप्तवर हल्ला केला होता. आणि शेवटी १८८२ पासून १९५० पर्यंत, इंग्रजांनी इजिप्त वर राज्य केले.

“आपण जाणार आहोत ते १५०० BCE च्या इजिप्त मध्ये. त्या काळात इजिप्त मध्ये अनेक देवतांची उपासना करत असत. युद्ध देवता, न्याय देवता, प्रेम देवता, वायू देवता, विद्या देवता, आदि माता, नाईल नदी, बैल, साप, सूर्य, चंद्र इत्यादी.”, आबा म्हणाले.

“इजिप्त मधली सूर्य देवता आणि भारतातली सूर्य देवता, यांच्यात काही साम्य आहे का?”, सुमितने विचारले.

“आहेत, काही साम्य आहेत. जसे – इजिपशियन सूर्य देवता ‘रा’ चा मुलगा ओसायरीस्, हा न्यायी आहे आणि मृत्यूची देवता आहे. अगदी आपल्या सूर्यपुत्र यमासारखा. भारता प्रमाणेच इजिप्त मधली धारणा अशी की सूर्य आकाशातील सर्वसाक्षी डोळा आहे.

“तर इजिप्त मध्ये अनेक देव सुखाने नांदत असतांना, १३७० BCE दरम्यान १८व्या राजघराण्यातील अखेनातेन गादीवर बसला.

“या काळात, इजिप्त जवळच्या Assyria मधील मितान्नी राजे – इंद्र, वरूण, अग्नी व मित्राची पूजा करत. या राजांची नावे देखील संस्कृत आहेत – सुतर्ण (मंगल सूर्य), परातर्ण (परम सूर्य), परशु-क्षत्र (परशु धारी क्षत्रिय), सुक्षत्र इत्यादी. यांच्या राजधानी होती – वसुखाणी (सोन्याची खाण). अंक देखील – ऐक, त्रे, पंज, सत्त, नव अशी संस्कृतशी मिळती जुळती. यांच्या पैकी एक राजा होता – दशरथ / त्वेशरथ. या सूर्योपासक राजाची अतिशय सुंदर मुलगी होती - नेफेर्तीती.

“नेफेर्तीती ही अखेनातेनची पट्ट राणी!


“राज्यारूढ होताच अखेनातेनने सर्व देव बाद केले, आणि एकाच देवाची पूजा करण्याचा प्रघात पाडला. सूर्यदेव - अटेन हा एकच देव. सम्राट अखेनातेन हा अटेनचा प्रेषित. नेफेर्तीती आणि अखेनातेनने त्यांच्या हयातीत ‘एक ईश्वर’ ही कल्पना चालवली.

“त्याने अखेतातेन नावाचे नवीन गाव वसवले. तेथे अटेनची मंदिरे बांधली. पूजा-अर्चा सुरु केली.


Model of Great Temple of Aten, City of Akhetaten, modern city of Amarna, Egypt

“पण, केवळ एकच देव पूज्य, ही कल्पना जनतेच्या गळी उतरली नाही.

“अखेनातेन आणि नेफेर्तीतीच्या मृत्यू पश्चात पुन्हा अनेक देव पूजले जाऊ लागले. हळूहळू अटेनची मंदिरे व तेथील पूजारींवर गदा आली. अखेनातेनने बांधलेली अटेन मंदिरे तोडली गेली.

“अखेनातेन नंतर १०० एक वर्षांनी, एका अटेनच्या पुजाऱ्याने इजिप्त मधून पलायन केले. पण तो लवकरच परत आला आणि इजिप्त मधील ज्यू दासांना समुद्रातून पलीकडे इस्रायीलला घेऊन गेला!”, आबा सांगत होते.

“ओह! म्हणजे मोसेस!”, सुमित म्हणाला.  

“Sigmond Freud च्या मते, मोसेस अटेनचा पुजारी होता. अखेनातेन प्रमाणे मोसेस हा देवाचा प्रेषित होता. मोसेसच्या ज्यू धर्मात देखील एकच देव. पहिल्या शतकात उदय पावलेल्या ख्रिश्चन धर्मात हेच दिसते – येशू हा देवाचा पुत्र / प्रेषित, आणि एकच देव. त्या नंतरच्या इस्लाम धर्मात देखील प्रेषित मुहम्मद, आणि एक देव हीच संकल्पना दिसते.

“इजिप्त मधील जनते प्रमाणेच, युरोप व मध्य पूर्व देशातील, अनेक देवतांची उपासना करणाऱ्या लोकांना हा ‘एक ईश्वर वाद’, monotheism पटला नाही. त्यामुळे वादविवादाने नाही, तर बळाने monotheism चा प्रसार झाला.”, आबा म्हणाले.

हे बोलणे चालू असतांनाच दुर्गाबाई आल्या. सुमितने आजीच्या हातातली भाजीची पिशवी स्वयपाकघरात ठेवली आणि चहासाठी आदण ठेवले.

“दुर्गाबाई, आज वेळ लागला ते?”, आबा म्हणाले.

दुर्गाबाई म्हणाल्या, “वाटेत वीणा ताई भेटली. तिच्या साडेसाती चालू आहे न, मग बरोबर शनीला पण जाऊन आले! आज तुम्ही दोघे कुठे फिरून आलात?”

आबा म्हणाले, “आज इजिप्तचे एक सूर्य मंदिर पहिले, पुढच्या वेळी इजिप्त मधली आणखीन काही सूर्य मंदिरे पाहू.”  

-दिपाली पाटवदकर

Powered By Sangraha 9.0