'म्युचुअल फंड' हा एकत्रित गुंतवणुकीचा प्रकार असून यामध्ये भाग घेणारा प्रत्येक गुंतवणूकदार आपली रक्कम म्युचुअल फंडमध्ये गुंतवीत असतो व संबंधीत म्युचुअल फंड गुंतवणूकदार ज्या प्रमाणात जोखीम (रिस्क) घेऊ इच्छितो त्या नुसार गुंतवणूक करत असतो व अशी गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारास त्याने केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात युनिट देऊ केले जातात. एका युनिटची दर्शनी किंमत जरी रु.१० इतकी असली तरी युनिटची खरेदी बाजार भावाने होत असल्याने गुंतविलेली रक्कम भागिले युनिटची बाजारातील किंमत एवढे युनिट गुंतवणूकदारास देऊ केले जातात.
म्युचुअल फंडात एक रकमी तसेच दरमहा पद्धतीने ठराविक रक्कम गुंतविता येते. एक रकमी किमान रु.५,००० गुंतवावे लागतात. याउलट दरमहा पद्धतीने किमान रु.१,००० (काही फंड रु.५०० सुद्धा स्वीकारतात) एवढी रक्कम गुंतवावी लागते. सामन्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीने दरमहाची गुंतवणूक फायदेशीर असल्याचे दिसून येते. यालाच 'एस. आय. पी.' असे म्हणतात. या योजनेचा फायदा लोक मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे दिसून येते.
थोडक्यात असे म्हणता येईल की, गुंतवणूकदार आपल्या जोखीम घेण्याचा क्षमतेनुसार पर्याय निवडू शकतो मात्र म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील चढ उतारावर कमी जास्त होत असते आणि त्यादृष्टीने गुंतवणुकदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी यातील जोखीम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे एव्हढे मात्र खरे कि सध्याच्या कमी होत असलेल्या व्याज दरांच्या पार्श्वभूमीवर म्युचुअल फंड हा एक निश्चितच फायदेशीर पर्याय आहे.