गोंदिया जिल्हा आढावा बैठक
गोंदिया: जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प आणि वाहतूकीची चांगली सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनातील सभागृहात गोंदिया जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतांना ते बोलत होते.
भात पिकाला विमा देण्याबाबतचे निकष केंद्र सरकारकडून शिथिल करुन घेण्यात येईल, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यातील दरेकसा ते मुरकुटडोह हा अतिदुर्गम भागातील रस्ता तयार करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. रस्त्यांच्या सुविधेमुळे दुर्गम भागातील गावे तालुक्याशी जोडल्यास मदत होईल. रस्त्यांची कामे करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घ्यावे. पोलिसांसाठी गृह निर्माण योजनेतून तातडीने शासकीय निवासस्थाने तसेच पोलीस स्टेशन व सशस्त्र दूर क्षेत्रच्या इमारती बांधण्याचे काम हाती घ्यावे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ९१ हजार लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आधी त्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामासाठी पहिला हप्ता राज्य सरकार देणार आहे. घरकुलांची कामे वेळीच पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक ते अभियंते देखील देण्यात येतील. गोंदिया शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देवून यासाठी नगरपालिकेला सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवावे. जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या शौचालयाची कामे रोहयोतून पूर्ण करण्यात यावी यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्याला व तालुक्याला जोडणारी महत्वाच्या रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी चांगली सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.