शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : डोर

19 Dec 2017 15:47:55

 
 
डोर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती आएशा टाकिया आणि तिचा प्रसिद्ध झालेला चित्रपट. मात्र हा 'डोर' एक वेगळा लघुपट आहे. यामध्ये देखील एक प्रसिद्ध तारका आहे, आणि ती म्हणजे परिणीती चोप्रा. डोर ही कहाणी खूप वेगळी आहे. एक माणूस एका मुलीला 'लिफ्ट' देतो. तिची आई सारखी तिला फोन करत असते, आणि ती मुलगी घर सोडून आल्यामुळे फोन उचलत नाही. मात्र तो तिला काही तरी सांगतो आणि चित्र बदलतं.
 
 
 
 
 
आता तुम्ही म्हणाल यात उत्सुकता वाढवणारे, किंवा मनोरंजन करणारे असे काय आहे? तर ते तुम्हाला लघुपट बघितल्यावरच लक्षात येईल. ही कहाणी आई आणि तिच्या लेकराच्या नात्यावर आहे. अनेकदा आपण आपल्या स्वप्नांसाठी आपल्या आई वडीलांना दुखावतो, त्यांना गृहीत धरतो, आणि आपल्याला हवे आहे तसे ते वागले नाहीत तर आपल्याला त्रास होतो. मात्र त्यांच्याही आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, ते आपल्या स्वप्नांच्या विरोधात नाहीत, केवळ आपण त्यांच्या पासून लांब जावू या भितीने त्यांना पोखरलेले असते, हे आपण समजून घेवू शकत नाही.
 
 
गाडी चालवणारा माणूस त्या मुलीला आपल्या आयुष्याच्या अनुभवावरुन तेच सांगतो आणि शेवटी पुन्हा एकदा तिच्या आईचा फोन येतो. यावेळी ती काय करते? फोन घेते? का पुन्हा कट करते? जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट. खरं तर यामध्ये फार वेगळे संवाद, किंवा वेगळे काही असे नाही, पण कधीकधी सामान्यातील सामान्य गोष्टी आपल्या मनाला स्पर्ष करून जातात. काही ठिकाणी परिणीतीचा अभिनय अपेक्षेपेक्षा अधिक वाटू शकतो, मात्र कथेचे सौंदर्य बघता याकडे दुर्लक्ष देखील होते. या लघुपटाला यूट्यूबवर १ लाख १ हजार ६५५ व्ह्यूज आहेत. एकदा तरी नक्की बघावा असा हा लघुपट आहे.
 
 
- निहारिका पोळ  
Powered By Sangraha 9.0