नवी दिल्ली : स्वत: संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, आपल्या देशाचे संविधान प्रत्येक परिस्थितीत लागू होते, शांतीचा कालखंड असो अथवा युद्धाचा हे नेहमीच देशाला एकजूट करून ठेवेल, काळाप्रमाणे हे लागू होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संविधान दिनानिमित्त ते बोलत होते.
असा कोणताच विषय नाही, ज्याची व्याख्या, निर्देश संविधानात आढळणार नाही, संविधानाची ताकत ओळखून संविधान सभेचे संचालक सच्चिदानंद सिन्हा म्हटले होते की, भारतीय संविधान मानवाद्वारे रचली गेलेली अमर रचना आहे, अशी आठवण नरेंद्र मोदींनी यावेळी करून दिली.
भारतीय संविधान जेवढे जिवंत आहे, तेवढेच संवेदनशील आहे, आणि तेवढेच सक्षम देखील आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले. पुढे ते बोलले की, ज्या देशात डझनहून अधिक पंथ आहेत, १०० पेक्षा जास्त भाषा आहेत, सतराशे पेक्षा जास्त बोलीभाषा बोलल्या जातात, खेडेगाव-शहर-झोपडी ते जंगलात देखील लोक राहतात त्या सर्वांसाठी आपले संविधान समानरीतीने लागू होते. सर्वांच्या श्रद्धा, आस्था, यांचा सन्मान करून देखील समान रीतीने लागू होणारे दस्ताऐवज तयार करणे सोपे काम नव्हते.