दिवाळी पाडवा

20 Oct 2017 17:20:03



भारतातील विविधता प्रत्येक क्षेत्रात बहरलेली दिसते. वेशभूषा असो, भाषा असो, लिपी असो, शिल्प, चित्र, स्थापत्य असो, नृत्य किंवा संगीत असो, वस्त्र असोत किंवा आहार असो. अशी विविधता भारतातील कालगणेत सुद्धा दिसते. काळ मोजायचे साधन आहे – सूर्य, चंद्र, ग्रह आणि नक्षत्रे. त्यानुसार भारतात – सौर वर्ष, चांद्र वर्ष, सौर-चांद्र (Luni-Solar) वर्ष, नक्षत्र वर्ष, बार्हस्पत्य वर्ष असे अनेक प्रकार दिसतात.


सूर्याचा १२ राशीतून प्रवास म्हणजे एक सौर वर्ष होते. यामध्ये सूर्याचा नवीन राशीत प्रवेश झाला की, नवीन महिना सुरु होतो. चांद्र वर्ष म्हणजे १२ पौर्णिमा किंवा १२ अमावास्यांचा काळ. चांद्र वर्षात यामुळे दोन प्रकार असतात - पौर्णिमांत म्हणजे पौर्णिमेला संपणारा महिना, किंवा अमांत म्हणजे अमावास्येला संपणारा महिना.


शुद्ध चांद्र वर्ष सौर वर्षापेक्षा साधारण ११ दिवसांनी लहान असते. त्यामुळे शुद्ध चांद्र वर्षात कधी उन्हाळ्यात वैशाख महिना येऊ शकतो, तर काही वर्षांनी थंडीत वैशाख महिना असेल. ही गडबड दूर करायला, चांद्र वर्ष साधारण ३० दिवस मागे पडले, की चांद्र वर्षात एक अधिक महिना घातला जातो. अशा कालगणनेला सौर-चांद्र पद्धत म्हटले जाते.


ग्रहावर आधारित वर्ष आहे गुरुचे. गुरु ग्रहाची रास बदलली की एक वर्ष, असे ३६१ दिवसांचे बार्हस्पत्य वर्ष होते. २७ नक्षत्रांचा प्रत्येकी एक दिवस, असे २७ दिवसांच्या १२ महिन्यांचे नक्षत्र वर्ष मानले जाते. या गणने प्रमाणे ३२४ दिवसांचे एक वर्ष होते.

 

यापैकी चंद्र-सौर व सौर कालगणना पद्धती भारतात वापरल्या जातात. उत्तर भारतात पौर्णिमांत, मध्य भारतात अमांत, तर पूर्वेला आणि दक्षिणेला सौर कालगणना प्रचलित आहे. प्रामुख्याने वापरली जाणारे कॅलेंडर्स आहेत – कलियुगाब्द, विक्रम संवत्, शालिवाहन शक आणि बंगाली सन. या शिवाय मौर्य संवत्, गुप्त संवत्, हर्ष संवत् (सम्राट हर्ष वर्धनच्या राज्याभिषेकापासून सुरुवात), राज्याभिषेक संवत् (शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून सुरुवात) आदी ३० हून अधिक कॅलेंडर्स भारतात आहेत. त्या शिवाय स्वातंत्र्यानंतर निर्माण केलेले एक राष्ट्रीय सौर कॅलेंडर पण आहे.


यापैकी विक्रम संवत् कॅलेंडरच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे - कार्तिक शुद्ध प्रतिपदा. अर्थात दिवाळीतील पाडावा. दोन हजार वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी उज्जैनच्या विक्रमादित्य राजाने ही कालगणना सुरु केली होती.


इस. पूर्व पहिल्या शतकात, मध्य एशिया मधून शकांच्या टोळ्या पश्चिम भारतात ठिकठिकाणी स्थायिक झाल्या होत्या. या परकीयांना विक्रमादित्याने हरवले होते. विक्रमादित्याने परकीय शकांचा पराभव करून त्यांना माळवा प्रांतातून हाकलून लावले. विक्रमादित्याला शकांचा नाश करणारा म्हणून “शकारी” हे बिरूद मिळाले. इस. पूर्व ५७ मध्ये, या युद्धातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी त्याने विक्रम संवत् ही कालगणना सुरु केली. परकीयांवरील हा विजय आपण गेली दोन हजार वर्ष साजरा करत आहोत. दर वर्षी, नवीन कपडे घालून, गोडधोड करून, एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो!


विक्रमादित्य नंतर सुमारे १३० वर्षांनी, शकांचा उपद्रव पुन्हा सुरु झाला. यावेळी प्रतिष्ठानचे शालिवाहन राजे त्यांच्याशी लढले. इस. ७८ मध्ये शालिवाहनने शकांना पुन्हा हरवले. तेंव्हा त्याने शालिवाहन शक सुरु केला. या विजयाचा उत्सव आपण चैत्रातील पाडव्याला, गुढी उभारून साजरा करतो.


पाडवा हा सण, परकीयांवरील विजयाचे द्योतकच नाही तर, पूर्वी परकीयांवर मात केल्याचे स्मरण व भविष्यात आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काय करायाला हवे, याचा धडा आहे.

 

टीप –
विक्रमादित्य हे बिरूद अनेक राजांनी धारण केल्यामुळे, त्या बद्दल अनेक मते मतांतरे आहेत. इथे दिलेली विक्रमादित्याची कथा पारंपारिक वृत्तानुसार आहे.


References -
Regional Varieties of the Indian Calendars - Helmer Aslaksen and Akshay Regulagedda

 

- दिपाली पाटवदकर

Powered By Sangraha 9.0