कोणे एके काळी, देवांनी आणि असुरांनी समुद्र मंथन करायचे ठरवले. त्यासाठी मंदार पर्वताची रवी केली. ती समुद्रात ठेवताच बुडायला लागली. तेंव्हा विष्णूने महाकाय कूर्म रूप धारण करून त्या पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. त्या पर्वताला वासुकी नागाची दोरी बांधली. असुरांनी वासुकीची फण्याची बाजू धरली, आणि देवांनी शेपटीची. मग देव आणि असुर समुद्राचे मंथन करायला लागले. वासुकीच्या तोंडातून फुत्कार निघू लागले. समुद्रात खळबळ माजली. आणि समुद्रातून एक एक रत्न बाहेर पडू लागले. चंद्र, ऐरावत, उच्चैश्रवा, कामधेनु, कल्पतरू, पारिजातक, कौस्तुभमणी, अलक्ष्मी, लक्ष्मी, धनवंतरी, अमृत आदी प्रकट झाले.
चंद्रला देवांमध्ये स्थान मिळाले. ऐरावत आणि पारिजातक इंद्राने घेतले. उच्चैश्रवा असुरांनी घेतला. कौस्तुभमणी विष्णूने कंठात घातला. अमृताचे वाटप मोहिनी रूपातील विष्णूने, देवांना केले. तर लक्ष्मीने विष्णूला वरले.
या वाटणीत अलक्ष्मीला कोणीच ठेवून घेईना. ना देव. ना असुर. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहिण. दुर्भाग्याची देवता. तिला कोण जवळ ठेवेल? तिने देवाला प्रश्न केला, “मी कुठे जाऊ? कुठे राहू?”. तेंव्हा देवाने तिला सांगितले – ज्या घरातले लोक कष्ट करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, आळशी आहेत, एकमेकात भांडतात, एकमेकांचा हेवा करतात त्या घरात तू जा. ज्या घरात अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे, अंधार आहे तिथे तू रहायला जा! ज्या परिसरात अस्वच्छता आहे, बकालपणा आहे तिथे तू राहायला जा! ज्या राज्यातील लोक कोणत्याही प्रकारचे संशोधन करत नाहीत, अध्ययन करत नाहीत, जिथे ज्ञानाचा प्रकाश नाही, तिथे तू जा! ज्या देशातील लोक आपापसात भांडतात, केवळ स्वार्थ साधतात, सामाजिक गट सुद्धा केवळ स्वत:च्याच हिताचा विचार करतात, तिथे तू राहायला जा!
अलक्ष्मी घरात आली की घरात दारिद्र्य येते, कुपोषण येते, अनारोग्य बळावते, आजारपण येते. अलक्ष्मी कुटुंबात आली तर कुटुंबातील प्रेम नाहीसे होते. कुटुंबाचे विघटन होते. अलक्ष्मी परिसरात आली की तिथे रोगराई पसरते. तेथील लोकांवर उपासमारीची वेळ येते. देशात अलक्ष्मी आली की, एकोपा संपतो, स्वार्थ बळावतो, समाजात फुट पडते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, पशु-पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होऊ लागतात. अलक्ष्मी आली की लोकांची, समाजाची आणि देशाची शक्ती क्षीण होते.
तेच ज्या घरात – स्वच्छता आहे, दिवे लावून उजेड केला आहे, जिथे सरस्वतीची आराधना केली जाते, अभ्यास केला जातो, तिथे लक्ष्मीचे आगमन होते! जिथे कुटुंबातील सदस्य एकमेकांवर प्रेम करतात तिथे लक्ष्मीचा वास असतो! त्या घराला लक्ष्मी – आरोग्य, दीर्घायुष्य, कीर्ती आणि संपत्तीचे वरदान देते. जे लोक कष्ट करतात, त्यांना लक्ष्मी धन-धान्य देते! ज्या परिसरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते. तेथील शुध्द हवा, पाण्याने, सुपीक जमिनीने – मानव आणि पशु-पक्ष्यांना उत्तम आरोग्य लाभते.
ज्या परिसरातले लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, खेळ खेळतात, गाणी म्हणतात, सामुहिक नृत्य करतात तिथे लक्ष्मी नांदते. ज्या परिसरातील लोक एकमेकांच्या मदतीला धावतात, तिथे लक्ष्मी राहते. लक्ष्मीच्या कृपेने हे लोक एकत्र येऊन लोकोपयोगी कामे करू शकतात, कोणत्याही आपत्तीशी समर्थपणे लढू शकतात. ज्या राज्यात संशोधन केले जाते तिथे लक्ष्मी विविध सुविधांचा वर्षाव करते. ज्या देशातील गट एकमेकांबरोबर प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी सुख, शांती आणि समाधानाचा वर्षाव करते!
ऋग्वेदातील श्रीसूक्तामध्ये लक्ष्मीला प्रार्थना केली आहे -
आपः॑ सृ॒जन्तु॑ स्नि॒ग्दा॒नि॒ चि॒क्ली॒त व॑स मे॒ गृहे ।
ज्या प्रमाणे पाण्याच्या ओलाव्याने, कोरड्या मातीत स्निग्धता येऊन त्यातून सृजन होते, धान्य पिकते. त्या पाण्याप्रमाणे तू माझ्या घरात, कुटुंबात राहा. ज्यामुळे आम्हात प्रेमाचा ओलावा राहील. आमच्यात एकी राहील.
श्रीसूक्ता मध्ये लक्ष्मीला आणखी एक प्रार्थना केली आहे –
क्षुत्पि॑पा॒साम॑लां ज्ये॒ष्ठाम॑ल॒क्षीं ना॑शया॒म्यहम् ।
हे लक्ष्मी, तू माझ्यावर प्रसन्न झालीस तर मी तहान आणि भूक रूपी अलक्ष्मीचा नाश करीन! हजारो वर्षांपासून मानव जगातून भूक संपावी आणि कोणी उपाशी निजू नये असे स्वप्न पाहत आहे. आधुनिक काळात सुद्धा संयुक्त राष्ट्राचे एक ध्येय आहे -
Every man, woman and child has the inalienable right to be free from hunger and malnutrition in order to develop fully and maintain their physical and mental faculties.
प्रत्येक मनुष्याला कुपोषण व उपासमारी पासून मुक्त असण्याचा अधिकार आहे, ज्या योगे तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ असेल.
जगातील तहान, भूक, दारिद्र्य दूर करून धन-धान्य देऊन तृप्त करण्याचे सामर्थ्य अष्टलक्ष्मी कडे आहे. अष्ट रूपातील लक्ष्मी आम्हाला - आनंद, धन, धान्य, समृद्धी, संतान, शौर्य, विद्या, आणि विजय देवो!
लक्ष्मी पूजनाला स्वकष्टाने मिळवलेली लक्ष्मी, वाजत गाजत येते, थाटामाटात येते. या लक्ष्मी पूजनाला घरा घरात लक्ष्मी येवो! माझ्या कुटुंबात, परिसरात, देशात आणि जगात लक्ष्मीचे आगमन होवो! ती इथे निरंतर राहो!
- दिपाली पाटवदकर