कथकचे काळानुसार बदलते रूप... 

13 Oct 2017 23:55:24
 

 
‘गीतं वाद्यं तथा नृत्यं, त्रयं संगीतमुच्यते|’ असे म्हणतात की, ’गीत, वाद्य आणि नृत्य या तिन्हीचा संगमम्हणजेच संगीत.’भारतात संगीताची परंपरा प्राचीन आहे. या संगीतामध्ये शास्त्रीय गायन, वादन तसेच नृत्याचादेखील समावेश असतो. भारताला कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टमअशा अनेक शास्त्रीय नृत्यांची परंपरा आहे. त्यातीलच एक म्हणजे उत्तर भारतातील नृत्यप्रकार कथक. कथक म्हणजे कथा, कथक म्हणजे नृत्य, कथक म्हणजे ताल, कथक म्हणजे लयबद्धता, कथक म्हणजे... एक अनुभूती...
 
 
‘कथा कहे सो कथक कहलाए...’
 
या ओळीचा अर्थ म्हणजे, कथा सांगणारा ‘कथक’ असतो. याच आशयातून जन्म झाला कथकचा. कथक हा उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्यप्रकार. अगदी प्राचीन काळात, मुगलांच्या आक्रमणाच्याही खूप आधी, कथकचा जन्म झाला आहे. त्या काळात उत्तर भारतातील मंदिरांमध्ये जे लोक नृत्य करत करत पौराणिक कथा सांगायचे, त्यांना ’कथिक’ असे संबोधले जायचे. या संकल्पनेतून कथकचा उदय झाला. राधाकृष्णाचे कथकमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे, तेही याच कारणामुळे. हे कथिक रामायण आणि महाभारताच्या, राधाकृष्णाच्या कथा, गाणी गात, नृत्य करत सांगायचे. त्यांच्या नृत्यात एक लयबद्धता असे, त्यांच्या हावभावांमध्ये कथेचा सारांश असे, त्यांच्या पदन्यासात तालाची एक झलक मिळत असे. ही कथकची सुरुवात होती आणि म्हणूनच हा काळ खूप महत्त्वाचा होता. साधारणपणे १३ व्या शतकात कथकला एक शास्त्रीय स्वरूप येण्यास सुरुवात झाली. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातदेखील यासंबंधी उल्लेख सापडतो. मात्र, अजूनही कथक हे ’कथिक’च होते. त्यांना अजूनही घराघरांमध्ये यायला वेळ होता. भरपूर वेळ...
 

 
मुगलकालीन कथक आणि कथकचे बदलते रूप
वैदिक काळात कथक मंदिरांमध्ये होता. केवळ ठराविक ’कथिक’च (पुरुष/स्त्रिया) कथक करत असत. मात्र, भारतावर मुगलांचे आक्रमण झाले आणि कथकचे स्वरूप हळूहळू बदलायला सुरुवात झाली. मंदिरांवर मुगलांनी आक्रमण केले आणि कथक मंदिरांमधून दरबारात आला. आता कथक हा पौराणिक कथा सांगण्यासाठी म्हणून किंवा देवाच्या आराधनेसाठी म्हणून केला जात नव्हता, तर राजाच्या खुशामदीसाठी कथकची सुरुवात झाली. ज्या नृत्यांगना आधी देवाच्या आराधनेसाठी नृत्य करायच्या त्यांना आता राजाला खुश करण्यासाठी नृत्य करणे भाग पडले. ज्या नृत्यांगनेच्या ओठी रामायण-महाभारतातील कथा असायच्या, त्यांच्या ओठी राजाच्या गुणांचे, रूपाचे वर्णन करणार्‍या उर्दू शायर्‍या, ठुमर्‍या रंगू लागल्या. प्रथमनमस्काराची जागा आता ’सलामी’ ने घेतली होती. पारंपरिक कथकमध्ये घालण्यात येणार्‍या घाघरा ओढणीची जागा आता अनारकली ड्रेसने घेतली, पारंपरिक करधन आणि मांगटिक्याची जागा आता छपक्याने घेतली. या काळात महिला, नर्तिकांसोबतच्या अत्याचारांमध्ये खूप वाढ झाली होती. राजाला दरबारातील नर्तकी म्हणजे जणू त्याची जागीर, मालमत्ता वाटायला लागली होती. त्यामुळे तिचे शोषण होत असल्याने कथकचे स्वरूप बदलले आणि या नृत्यकलेकडे तितक्याशा चांगल्या नजरेतून पाहण्याची दृष्टीही बदलली. म्हणनूच, कथक ही केवळ एक कला न राहता ती केवळ उपभोगाचे साधन ठरले. मात्र, तरीही काही राजांना या कलेची कदर होती आणि अशा मोजक्या राजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे या क्षेत्रात असलेले नर्तक आणि नृत्यांगनांनी हा काळ कसाबसा निभावून नेला. कथक नृत्याचा इतिहास सांगणार्‍या काही पुस्तकांमधील उल्लेखानुसार, या काळात नृत्यांगनांना त्यांच्या डोक्यावर मद्याचा पेला ठेवून (ज्याला ’जाम’ असे म्हणत असत) त्याचा तोल सांभाळत नृत्य करण्याची मागणी राजा-महाराजा, मुगल सम्राट करत असत. भारतीय कलेच्या इतिहासात मुगल काळात एकूणच ज्या सर्व कलांचा विनाश झाला, त्यात कथकही एक होतेच. मात्र, या काळात कथकच्या वेगळ्या शैलींचा विकासही झाला. यामध्ये फारसी बोल, एका पायावरचे चक्कर, चमत्कारिक कथक याची भर पडली. तसेच लखनऊ घराण्यात आढळून येणारी ’नजाकत’ या काळातच विकसित झाली, असे म्हटले जाते. चक्रदार परण, चक्रदार तुकडे यांचा वापर या काळात अधिक होऊ लागला, तशा रचना निर्माण केल्या जाऊ लागल्या. चमत्कारिक नृत्याने राजाचे मन जिंकण्याच्या उद्देशाने का होईना, अनेक दर्जेदार रचनांची निर्मिती या काळात झाली.
 
 
मुगलपश्चात कथक, घराणेशाहीचा कथक
मुगल काळानंतर हळूहळू कथकचे पुन्हा स्वरूप बदलायला लागले. कथकचा हरवलेला सन्मान, गतवैभव पुनरुज्जीवित होऊ लागले. आता कथकच्या घराणेशाहीची सुरुवात होऊ लागली होती. कथकमध्ये प्रचलित ३ घराणी आहेत. 
१.लखनऊ घराणे, २. बनारस घराणे ३. जयपूर घराणे
 
 
लखनऊ घराणे
खरेतर लखनऊ घराण्याचा जन्म मुगल काळातच ’नवाब वाजिद अली शाह’ यांच्या दरबारात झाला, असे म्हणतात. मात्र, त्याचा विकास मुगलकाळानंतर झाला. ईश्वरीप्रसाद या घराण्याचे प्रणेते असल्याचे म्हटले जाते. त्यांनी आपल्या अवगत कलेचे शिक्षण त्यांची तीन मुले अडगूजी, खडगूजी आणि तुलारामजी यांना दिले आणि या पद्धतीने या घराण्याला सुरुवात झाली. त्यानंतर बिंदादीन महाराज, कालका प्रसाद, अच्छन महाराज, शंभू महाराज, लच्छू महाराज हे सर्व या घराण्यातील प्रसिद्ध गुरू म्हणून नावारुपास आले. कथक नृत्यक्षेत्रातील प्रमुख नाव म्हणजे ’बिरजू महाराज’ जे या घराण्यातले ते विद्यमान वारसदार आहेत. लखनऊ घराण्याने कथकला ’नजाकत’ दिली, सौम्य हावभाव दिले, लखनऊ घराण्याची खासियत म्हणजे या घराण्यातील कथकचे हावभाव, सौम्यता. आजही पदन्यासापेक्षा कथकचे हस्तक हीच या घराण्याची विशेषता आहे.
 

 
बनारस घराणे
बनारसच्या जानकी प्रसाद यांनी या घराण्याची सुरुवात केली. कथकमध्ये या घराण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे तसे कारणदेखील आहे. कथकमध्ये नटवरीचे बोल खूप प्रसिद्ध आहेत. हे नटवरीचे बोल कथकला दिले ते या बनारस घराण्याने. वाराणसी येथील या घराण्यात कथकचे शुद्ध बोल म्हणजेच ’तिग्धा दिगदिग’चा वापर सर्वाधिक करण्यात येतो. बनारस घराण्यातील पदन्यासात टाचेचा वापर अधिक करण्यात येतो. या घराण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदन्यास कथक नृत्याला दिले आहेत. त्यामुळे हे घराणे देखील कथकच्या इतिहासात फार महत्त्वाचे ठरते. नृत्यातील शुद्ध आणि सात्विक भावाला या घराण्यात खूप महत्त्व आहे. 
 

 
जयपूर घराणे
असे म्हटले जाते की, ’’मुगलकाळात जर राजाश्रयामुळे सर्वाधिक शुद्ध कथक कुठे टिकून होते, तर ते राजस्थानमध्ये. राजस्थानमधील जयपूर येथे हिंदू राजांच्या राजाश्रयामुळे कथकचे स्वरूप खूप शुद्ध आणि सात्विक होते. या घराण्याची विशेषता म्हणजे, येथील पदन्यास. भानुजी यांनी या घराण्याची सुरुवात केली. पखवाजवर आधारित ताल म्हणजेच ‘रूपक’, ‘धमार’, ‘रूद्र’, ‘अष्टमंगल’ अशा सर्व तालांचा या घराण्यात अधिक प्रयोग करण्यात येतो. मृदंग पखवाज, झांझ, तबला या सगळ्याचे एकत्रित बोल असलेला प्रकार ’प्रिमलू’ या घराण्याची विशेषता आहे...
 
उदा : ’झिन झिन झिन झिन किटतक तंजे’ आदी. ‘पक्षी परण’, तसेच ’कवित्त’देखील या घराण्याची विशेषता आहे. पुण्यातील प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या नृत्यशैलीत जयपूर घराण्याचा पदन्यास, लखनऊ घराण्याची नजाकत आणि बनारस घराण्याची शुद्धता अशा तीनही गोष्टी आढळून येतात. त्यामुळे त्यांची एक वैगळी शैली जगासमोर आली आहे. जी स्वत:मध्ये परिपूर्ण आहे.
 
कथकमधील प्रमुख प्रकार
 
नृत्त : शुद्ध कथकचे बोल. कथकची सुरुवात मंगलाचरण आणि देवता वंदनेने करण्यात येते.

ठाट : एक पारंपरिक प्रदर्शन ज्यामध्ये नृत्यांगना प्रत्येक समेवर एका वेगळ्या मुद्रेत उभी राहून हस्तकांच्या सुंदर हालचाली करते.
 
आमद : आमदचा अर्थ ’आगमन’, खर्‍या अर्थाने कथकच्या बोलांचे आगमन ‘आमद’च्या माध्यमातून होते.

तोडे-तुकडे : यामध्ये कथकचे शुद्ध बोल अर्थात ‘ताथेई तत थेई, तिग्धा दिगदिग, थेई ता, क्रांधा’ आदी असतात. एका समेपासून बोल पूर्ण करून पुन्हा समेवर येणे महत्त्वाचे असते.
 
परण : यामध्ये तबला आणि पखवाज अर्थात धान तकिट, धान्न धिकीट, तडान्न धा आदी बोलांचा वापर करण्यात येतो.
 
प्रिमलु : यामध्ये तबला, पखवाज, झांझ, ताशा सर्व प्रकारच्या वाद्यांचे बोल एकत्रित करून बोल तयार करण्यात येतात. झिन झिन, थुगिन नगिन तक, तक थो आदी
 
गत : यामध्ये सुंदर चालीच्या माध्यमातून नृत्य करण्यात येते.
 
लड़ी : एका प्रकारच्या बोलांची श्रृंखला म्हणजे लडी.
 
तिहाई : एक बोल तीनदा म्हणून समेवर येणे म्हणजे तिहाई.
 
नृत्य : अभिनयाची अभिव्यक्ती म्हणजे नृत्य. यामध्ये ठुमरी किंवा एखाद्या गाण्याच्या शब्दांवर हाव भाव प्रदर्शित करण्यात येतात. यामध्ये अभिनयाला वाव असतो.
 

 
बॉलिवूडमधील कथक
 
दरम्यानच्या काळात बॉलिवूडमुळे देखील कथकला एक नवीन स्वरूप मिळाले आहे. ’पाकीजा’मधील मीनाकुमारी असो अथवा मुगल-ए-आझममधील मधुबाला, दरबारी कथकची झलक त्यांच्या या नृत्यांमधून दिसून येते. कथकच्या प्रमुख गुरू आणि सिनेजगतातील एक प्रमुख नाव सितारा देवी यांचेदेखील कथकच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे. ’नाचे मयूरी’मधील सुधा चंद्रन आजही प्रेक्षकांच्या नजरेसमोर आहे. पुढील काळात रेखाच्या ’उमराव जान’ ने कथकला एक वेगळे स्वरूप दिले. त्यानंतर माधुरी दीक्षितचे कथक, देवदासमधील तिची ठुमरी ’ढाई शामरोक लै.’आजही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. रिऍलिटी शो ’डान्स इंडिया डान्स’मुळे प्रसिद्ध शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन देखील आजच्या काळात कथक आणि नृत्याच्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. बॉलिवूडच्या चित्रपटांमधून कथकचे एक वेगळे स्वरूप जगापुढे आले आहे. 
 
 
वर्तमानातील कथक
आज कथकचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी यामध्ये घराणेशाही होती, कला आपल्याच घराण्यातील एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला दिली जायची. मात्र, आता कथकच्या शिक्षणासाठी अनेक महाविद्यालये, क्लासेस आहेत. यामध्ये मुलींना, मुलांना पारंपरिक शिक्षण देण्यात येते. त्यासाठी गांधर्व महाविद्यालय, खैरागड विश्वविद्यालय, राजा मानसिंह तोमर विश्वविद्यालय, प्रयाग विद्यापीठ अशा अनेक संस्था आहेत, ज्यांच्या माध्यमातून कथकच्या परीक्षा आयोजित करण्यात येतात. कथकमध्ये सहा वर्षांचा डिप्लोमा असतो, त्याला ’विशारद’ असे म्हणतात. त्या पुढे दोन वर्ष जे डिग्रीच्या तुलनेचे असते, त्याला ’अलंकार’ म्हणतात. त्याशिवाय कथकमध्ये बीए, एमए करणे शक्य असते. यामध्ये कथकसंबंधी लिखित परीक्षादेखील होते. तसेच रंगमंच नृत्य आणि प्रायोगिक परीक्षादेखील असते. त्यामुळे मुलींना, मुलांना कथकमधील शिक्षणाचे ’सर्टिफिकेट’ मिळते. आणि त्याचा उपयोग पुढे करिअरच्या दृष्टीने करता येऊ शकतो. कथक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. रशिया, अमेरिकेतून लोक कथक शिकण्यासाठी भारतात येत आहेत. आधी कथक ही नृत्यकला देवाच्या आराधनेसाठी होत होती, मग ती राजाच्या खुशामदीसाठी होऊ लागली, पुढे घराणे टिकावे म्हणून त्याचे रूपांतर घराणेशाहीत झाले, मात्र आता त्याचे स्वरूप बदलून लोक ते करिअर म्हणूनदेखील स्वीकारत आहेत. यामुळे एका बाजूला या कलेमुळे लोकांना रोजगार मिळतोय, कलेचे संवर्धन होते, तर कलेचे ’कमर्शिअलायझेशन’ म्हणजेच बाजारीकरणदेखील झालेले पाहायला मिळते. यामध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये लाखो रुपये देऊन कथकचे कार्यक्रमठेवणे, मोठ्या नृत्यांगनांनी त्यांच्या कथक प्रदर्शनासाठी लाखो रुपयांची मागणी करणे, बॉलिवूडच्या कार्यक्रमांमध्ये कथकचे अशुद्ध किंवा फ्यूजन स्वरूपात रुपांतरण आदी आलेच. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, एका बाजूला कथकने ही वाटचाल इतक्या समर्थपणे इथपर्यंत पोहोचविली आहे, तर दुसर्‍या बाजूला आजही काही अडचणी आहेत. मात्र, भारतीय संस्कृतीतील कथकचे योगदान आजही खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे कथक हे केवळ नृत्य नाही, तर ती एक परंपरा आहे. 
 
- निहारीका पोळ
Powered By Sangraha 9.0