गुणकारी जास्वंद

21 Sep 2016 12:23:00
जास्वंद हे मूलत: चीनचे निवासी. तेथून ते भारतात आले आणि आता जगात उष्णकटीबद्धीय प्रदेशात सर्वत्र सापडते. जास्वंदाचे फूल जर वाढले तर त्यातून गाढ (दाट) वांगी रंगाचा रस निघतो. प्राचीन काळी या रंगानेच पादत्राणे रंगविली जात, म्हणूनच बहुतेक याला ‘shoe-flower' असेही संबोधिले जात असावे. जास्वंदाचे झाड हे कुंपणावर असते. म्हणून याला ‘Fence  plant' असेही म्हणतात. सुशोभिकरण, हार-माळांमध्ये व अन्य शोभिवंत सजावटीत जास्वंदाचे फूल वापरले जाते. असे असले तरी जास्वंदीचे काही औषधी उपयोगही आहेत. त्याबद्दल थोडे जाणून घेऊयात.
 
जास्वंद म्हटले की, त्याचा सर्वसामान्य वापर केसांसाठी असल्याचे हे बहुश्रुत आहे. जास्वंदीच्या फुलांंचा लगदा करून रस काढून तेलाबरोबर उकळविले जाते. रस आटेपर्यंत उकळवून मग ते तेल केसांच्या विविध तक्रारींमध्ये वापरले जाते. जास्वंदीचा केशरंजन म्हणून गुण सांगितला आहे. अकाली केस पिकणे, यावर जास्वंदीच्या तेलाचा चांगला फायदा होतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अवेळी खाणे आणि अपूर्ण झोप हे शाळकरी मुलांच्या वयापासूनच आढळते. अशाने शरीरात पित्तवृद्धी होते. (पित्त वाढते) पित्त वाढले की केस गळणे आणि पिकण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळेस जास्वंदीच्या फुलांचा लेप हेअर पॅक म्हणून वापरावा. थंडावाही मिळतो आणि केसांमधील पांढरेपणाही कमी होतो. या बरोबरीने जीवनशैलीतही बदल करणे गरजेचे आहे. (scalp & hair related problems) प्राचीन काळी कपड्यांसाठी नैसर्गिक डाय म्हणून जास्वंदीच्या फुलांचा रस वापरत. जास्वंद वाटताना त्यातून एक चिकट द्रव निघतो. त्यामुळे रस काढणे तसे सोपे नाही. आयुर्वेदात केस गळणे आणि केस पिकणे यावर जास्वंदीची फुले गोमूत्रात वाटून त्याचा लेप लावावा, हा उपाय सांगितला आहे. विविध शिरोरोगांवर जास्वंदीच्या फुलांनी तयार केलेले तेल उपयोगी ठरते. जास्वंदीचा जसा बाह्योपचारात उपयोग आहे तसेच आभ्यंतर वापरही उपयोगी आहे.
 
संडासावाटे रक्त जात असल्यास किंवा रक्ती मूळव्याध असल्यास, रक्तस्राव थांबविण्यासाठी जास्वंदीचे फूल उपयोगी आहे. फुलाचे देठ काढून, स्वच्छ पुसून, सावलीत वाळवावे. संपूर्ण वाळले, शुष्क झाले की ते कुटून त्याचे चूर्ण करावे. हे चूर्ण बरणीत भरून ठेवावे व गरज पडेल तसे त्या-त्या प्रमाणात वापरावे. अंगावरून लाल पाणी जात असल्यास, पाळीच्या वेळेस अधिक त्रास होत असल्यास जास्वंदीचा वापर करून बघावा. आराम पडतो. यासाठी जास्वंदीच्या फुलांची कळी दूधातून घ्यावी. अंगावरून सफेद पाणी जात असल्यासही हा उपाय करून बघावा.
 
(oral contraceptive) Hibiscus flavour प्राचीन काळापासून गर्भनिरोधक म्हणून फुलांचा वापर केला जातो. याने गर्भपात होण्याचीही शक्यता आहे. तसेच म्हणून याचा अभ्यास केला गेलाय. यावरून असे लक्षात घ्यावे की, हर्बल म्हणून सुरक्षित असले तरी सगळ्यांना एकच औषध असे चालत नाही. हर्बल-टी मध्ये प्यायला जातो. तो कुणी आणि कशासाठी घ्यावा, याचा नक्की विचार करावा. कडुनिंबाप्रमाणेच जास्वंदीचाही वापर मधुमेहासाठी, प्रमेहासाठी होतो. पण म्हणून सरसकट सगळ्यांनी एकच औषधी घेऊ नये. आपली प्रकृती, आपले राहणीमान, आपल्या आजाराचे स्वरूप याबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊनच औषध चालू करावे.
 
(Epilepsy) जास्वंद मस्तिष्क बल्य आहे. म्हणून अपस्मार व अन्य मस्तिष्क दौर्बल्यजन्य आजारांमध्ये उपयोगी आहे. हृदयासाठीही पोषक आहे. हृदयरोगांमध्ये वापरावे. आयुर्वेदात कुठल्याही व्याधीवर एकच एक औषध सांगितलेले नाही. प्रकृती, ऋतू, रुग्णबल इत्यादीनुसार औषधाचा वापर, मात्रा इ. अवलंबून आहे. जास्वंदाची फुले वर सांगितल्याप्रमाणे औषधी गुणांनी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर जास्वंदीची पाने आणि मुळेही उपयोगी आहेत. पानांवरील विविध शोधांवरून हे लक्षात येते की, त्वचेच्या कॅन्सरमध्ये पानांचा वापर होतो. जास्वंदीच्या पानांचा वापर बुरशीनाशक (antifungal) म्हणून होतो. तसेच सूज असते वेळी, पाय मुरगळला असल्यास त्यावर पाने वाफवून ठेवावी. पोटीस बांधावे. याने सूजही कमी येते आणि वेदनाही कमी होतात. ताप असल्यास पानांचा वापर करावा. पानांसारखाच फुलांच्या पाकळ्यांचाही काढा करावा. याकरिता गरमपाण्यात / पाने घालून झाकून ठेवावीत. पाणी गार झाले की गाळून ते प्यायला द्यावे. याने ताप कमी होण्यास मदत होते. फुलांचा काढा प्यायल्याने छातीतील कफही कमी होतो. चिकट कफ जो सहजासहजी निघत नाही, अशा कफाच्या त्रासावरील पाकळ्यांचा काढा उपयोगी आहे. जास्वंदीची पाने विविध त्वचाविकारांवरही उपयोगी आहे. जिथे स्राव आहे, चिकटपणा आहे, सूज, लालीमा आहे अशा त्वचाविकारांवर पानांचा उपयोग चांगला होतो. शरीरात थकवा आला असल्यास तो घालविण्यासाठीही पाने उपयोगी आहेत. जास्वंदीची फुले व त्याचे चूर्ण प्रमेहावर अपस्मार (Epilepsy) वर छातीतील कफ संचितीवर आणि कुष्ठावर गुणकारी आहे. हृदयरोगावर प्रभावी आहे. केसांच्या वाढीसाठी पोषक आहे व केस रंगविण्यासाठीही त्याचा वापर होतो. याने गर्भपात घडवून येऊ शकतो आणि व्रण / जखम भरण्यास मदत होऊ शकते. याने शुक्राणू निर्मितीचे प्रमाण कमी होते. हे त्वचेसाठी ऍण्टी ऑक्सिडंट आहे आणि त्वचेवरील पुळ्या व व्रणांवर रोगप्रतिबंधकाचे कार्य करते. इतक्या विविध प्रकारे जास्वंद मनुष्याच्या आरोग्यासाठी हितकर आहे. जास्वंदीच्या झाडाचे मूळ ही औषधी आहे. मुळे वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. हे चूर्ण मासिक स्रावाच्या वेळेस होणार्‍या तक्रारींवर उपयोगी आहे. मासिक स्रावाचे प्रमाण अधिक असणे किंवा अधिक दिवस स्राव होणे, अशा तक्रारींवर जास्वंदीच्या मुळाचे चूर्ण उपयोगी आहे. ताज्या मुळाचा रस गुप्तरोगावर वर प्रभावी आहे.
 
देवाला (गणपतीला) लाल फूल वाहिले जाते. वरील गुणधर्म लाल फुलाच्या प्रजातीचेच आहे. आयुर्वेद शास्त्रात असे एक सूत्र आहे ज्याचा अर्थ असा होतो की, सृष्टीत अशी एक वस्तू नाही ज्याचा औषध म्हणून वापर होत नाही. तेव्हा निसर्गातूनच आपले आरोग्य जोपासणे हे कालातीत काळापासून सुरू आहे.
 
जास्वंदीची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. खूप थंड रस, रूक्ष प्रदेशात किंवा बर्फाळ प्रदेशात ते उगवत नाही. बाराही महिने याला फुले येतात. या तीव्र गंधही नाही किंवा फुले लगेच कोमेजूनही जात नाहीत. फुले टवटवीत फुलतात आणि दिसायला सुंदर असतात. हल्ली तेल, शॅम्पू यासारख्या विविध प्रसाधनांमध्ये व हर्बल-टी सारख्या पेयांमधून जास्वंदीचा वापर वाढलाय. तेव्हा घरच्या घरी स्वत:पुरती औषधी म्हणून तरी प्रत्येकाने जास्वंदाचे रोप लावावे. सृष्टीला हातभार लावणे हे आपले परमकर्तव्य आहे. केवळ शोभिवंत वृक्ष लावण्यापेक्षा औषधी गुणांनी युक्त व भारतीय वातावणात वाढतील असे वृक्ष आपण नक्की लावावेत.
-वैद्य किर्ती देव
Powered By Sangraha 9.0