समर्थाघरचे श्वान आणि स्त्रीवाद

14 Sep 2016 12:59:00

आजकालच्या सोशल मिडियाच्या रंगी रंगलेल्या वातावरणात क्षुल्लक गोष्टींची 'घटना' होते आणि मग त्या घटनेची 'बातमी' व्हायला कितीसा वेळ लागणार? गेले दोन-तीन दिवस इंटरनेटवर एक बातमी सारखी फिरतेय. बंगळूर मधल्या करिष्मा वालिया ह्या मुलीने लग्नासाठी म्हणून आलेल्या एका स्थळाला नकार दिला कारण ज्या मुलाशी ती लग्नाबद्दल बोलत होती त्याने तिच्या कुत्र्यासकट तिच्याशी लग्न करायची तयारी दाखवली नाही.

माझ्याही घरी कुत्रा आहे. माझ्या मुलांइतकीच माया मी त्याच्यावर करते. त्याला कुणी हाडहाड केलेलं मला खपत नाही. घरात हौसेने, लाडाने पाळलेला कुठलाही प्राणी हा घरातल्या एखादया जिव्हाळ्याच्या व्यक्तीइतकाच महत्वाचा असतो त्यामुळे त्या मुलीने लग्नाला नकार देणं हे मी पूर्णपणे समजू शकते. तिचा निर्णय तिच्या बाजूने योग्यच आहेप्रश्न तो नाहीच आहे.

लग्न करायचं की नाही हा निर्णय ही दोन व्यक्तींमधली खासगी बाब असते. ह्या मुलीने लग्नाला नकार द्यायचा आपला निर्णय सोशल मिडीया वरून जाहीर तर केलाच, पण आपल्या निर्णयाची भलावण करताना तिने तिच्या आणि त्या मुलाच्या व्होट्सएप वरच्या खासगी संभाषणाचा फोटोही टाकला, त्या मुलाला न सांगता सवरता. तोही व्यवस्थित,तिला हवा तसा क्रॉप करून. तिने टाकलेल्या फोटोवरून सकृतदर्शनी तरी असं दिसतं की त्या मुलाचीच सगळी चूक आहे. त्या संभाषणात एके ठिकाणी तो मुलगा म्हणतो की 'तुला कुत्रा एवढा आवडत असेल तर कुत्र्याशीच लग्न कर'. त्या मुलाचं तसं म्हणणं निश्चितच चुकीचं आहेच, पण त्यानंतर उपरती होऊन शेवटी तो मुलगा असंही म्हणतो की 'शेवटी हे तुझं आयुष्य आहे. त्याबद्दल निर्णय घ्यायचा तुला पूर्ण अधिकार आहे'. करिष्माने फोटो शेअर करताना नेमकं हे शेवटचं वाक्य जाणून बुजून गाळलं आहे.

करिष्मा वालियाने तो फोटो सोशल मिडीयावर टाकल्याबरोबर तो लगेच व्हायरल झाला. स्कूपव्हूप, इंडिया टुडे सारख्या न्यूज पोर्टल्सनी लगेचच त्या मुलीच्या 'धाडसाचा' गौरव करणारे लेख लिहिले. तिच्या निर्णयाचं कौतुक करणाऱ्या खूप प्रतिक्रियाही आल्या. त्या प्रतिक्रियांचा एकूण सूर असा होता की अश्या कोत्या मनोवृत्तीच्या मुलाबरोबर लग्न न करण्याचा निर्णय घेऊन करिष्मा वालियाने भलतीच स्त्रीवादी व बंडखोर भूमिका घेतली आहे. त्या मुलाची परवानगी न घेता दोघांमधलं खासगी संभाषण, तेही मुद्दामहून हवं तसं क्रॉप करून टाकणं नैतिकदृष्ट्या कितपत बरोबर आहे ह्या बद्दल मात्र कुणीही चकार शब्द काढलेला नाही.

समज हीच घटना उलट घडली असती म्हणजे पुरुषाने 'मला लग्नापेक्षा माझी कुत्री जास्त महत्वाची वाटते' ही भूमिका घेतली असती तर त्या पुरुषावर सडकून टीका झाली असती. कुणीही त्याला 'बंडखोर' वगैरे म्हणून त्याचा गौरव तर केला नसताच उलट 'पुरुषप्रधान संकुचित विचारांचा प्रतिनिधी' म्हणून त्याची हेटाळणीच केली गेली असती.

माझी एक मैत्रीण पुण्यात एका विवाहसंस्थेसाठी काम करते. तिचं म्हणणं आहे की तिच्याकडे लग्नासाठी नाव नोंदवण्यासाठी येणाऱ्या बऱ्याच मुली असं स्पष्ट सांगतात की 'आम्हाला लग्न झाल्यानंतर स्वतंत्रच रहायचंय', आणि त्या सडेतोड भूमिकेचं स्वागतच होतं, मग एखादया पुरुषाला हेही सांगायचा हक्क नाहीये का की मला पाळीव प्राणी आवडत नाहीत, तेही लग्नासारखा अत्यंत महत्वाचा निर्णय घेताना? मुळात एका संभाषणाचे सवंग प्रसिद्धीसाठी सार्वजनिकीकरण कशासाठी? तेही स्त्रीवादाच्या नावाखाली? ह्या निर्णयाचा असलाच तर प्राणीप्रेमाशी संबध आहे.फेमिनीझमशी ह्या निर्णयाचे काय देणेघेणे आहे?

सध्या 'स्त्रीवाद' हा शब्द सोशल मिडियावर इतका स्वस्त झालेला आहे की कुठल्याही स्त्रीने घेतलेला कसलाही निर्णय हा 'स्त्रीवाद' आणि 'पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध केलेली बंडखोरी' ही गोंडस लेबले लावून मार्केट केला जातोय.लग्न करणे किंवा मोडणे ही दोन व्यक्तींमधला खासगी निर्णय आहे. स्त्रीवादाच्या नावाखाली त्याचे जाहीर प्रदर्शन का,तेही पूर्णपणे एकांगी?


-शेफाली वैद्य

Powered By Sangraha 9.0