ही वेळ कोणामुळे आली?

25 Aug 2016 16:56:00

 


गेल्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून पडून देवाघरी गेलेल्या मुलाचे नाव आठवतेय का? थोडा विचार करा, आठवून बघा. नाही आठवत ना. पण गोविंदा बांधणारे राजकारणी आठवतायत? ते तर चटकन आठवतील. कारण कृष्णजन्माचा ‘इव्हेंट’ करून त्यातून त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली आहे.

साहस, समूहभावना, खांद्याला खांदा लावून ठामपणे उभा राहाण्याचा सण आज न्यायालयाच्या कचाट्यात जाऊन अडकला आहे. आठ आणि नऊ थरांची हंडी आता जेमतेमचार-पाच थरातच लागणार आहे. आभासी पोकेमॉनच्या मागे धावणार्‍या पिढील खरा थरार अनुभवायला लावणारा हा खेळ किंवा सण गेली चार-पाच वर्षे सतत चर्चेत आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने या सणाला खेळाचा दर्जा देऊ केला होता. मात्र हंडी फुटल्यावर गोविंदा आणि आयोजक पांगतात तशीच ही मंडळी पांगली होती. यात गोविंदांना दोष देण्यात अर्थ नाही. हंड्या बांधून लोकप्रियता मिळविलेल्यांची ही जबाबदारी होती, मात्र त्यांनीही हा विषय मडके फुटल्यावर सोडून दिला. आता हंडीबहाद्दर पुढारी सरकारने नीट बाजू मांडली नाही यावर काथ्याकुट करीत आहेत. खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यासाठी जे व्हायला हवे होते ते झाले नाही. २०१४ साली न्यायालये खेळाचे निकष जसे असतात तशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करीत होते. गोविंदाचे थर जिथे लावले जातात तिथे काहींना काही मॅट स्वरूपाचे लावले गेले पाहिजे, गोविंदांची नोंदणी केली पाहिजे, असे निकष न्यायालयाने सांगितले होते. मॅट किंवा कुशन लावण्याचा निकष रास्तच होता. अपेक्षा कदमनावाची महिला गोविंदा अशीच थरावरून पाठीवर कोसळली व तिच्यावर नंतरच्या थरावरील कोणीतरी पडले व नंतर तिच्या पायांमधील संवेदनाच हरपल्या. २८ वर्षांचा नागेश भोईर मानेपासून खाली लुळा आहे. २००९ साली थरावरून पडल्याने त्याच्या मणक्याला इजा झाली होती. त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या म्हातार्‍या वडिलांवर आहे. खेळाचा दर्जा देण्याची मागणी चांगलीच, पण खेळाची म्हणून शिस्त पाळली गेली नाही. महागडे डिजे, नटनट्या, परदेशातले मनोरे रचणारी मंडळी आपल्या ‘इव्हेंट’साठी हजर करणार्‍यांना मॅट लावणे फारसे जड नव्हते. परंतु, त्यांना तो त्यांच्या प्राथमिकतेचा विषय वाटला नाही.

  आपल्याकडे चांगले क्रिकेटपटू होतात, मात्र अन्य खेळातले खेळाडू फारसे चमकताना दिसत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे, क्रिकेट आणि क्रिकेटपटूंवर जेवढा पैसा खर्च केला जातो, तेवढा पैसा अन्य खेळांवर खर्च केलाच जात नाही. ऑलिम्पिकमध्येही आपण आता एक तरी मेडल मिळावे म्हणून परमेश्र्वराची करूणा भाकत आहोत ते त्याचेच प्रतिक आहे. क्रिकेटचे राजकारण करणारे काही जण गोविंदा बांधणारेसुद्धा आहेत. पण त्यांना इथे काही करावेसे वाटत नाही. कारण क्रिकेटप्रमाणे इथे परतावा नाही. त्यामुळे हा सण फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठीची उत्तमसंधी झाला. एकदा का जन्माष्टमी संपली की, मग त्यांचा गोविंदाशी आणि गोविंदाचा त्यांच्याशी काहीही संबध राहात नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा विचार करायला हवा. उंचीचे राक्षसी महत्त्व गेल्या काही वर्षांत वाढतच गेले आहे. सणाचा गोडवा जाऊन त्यात स्पर्धेची इर्षा आली. आठ थर, नऊ थर हेही ठीक आहे, पण जर खेळ म्हणून विचार करायचा झाला, तर खेळणार्‍याला जसे विविध प्रकारचे संरक्षण असते तसे गोविंदाबाबत का झाले? शिरस्त्राणे, सेफ्टीबेल्ट असा काहीसा विचार झाला. पण त्याला सर्वमान्यता आली नाही. जिवाचा खेळ हा त्यातला महत्त्वाचा भाग. मात्र, सणाच्या धुंदीत तो मागेच पडला. या सगळ्या सणाला एक काळी किनार आली ती सांस्कृतिक प्रदूषणाची. ध्वनिप्रदूषण हा तर आपल्या सणांचा अविभाज्य भाग झाला आहे. यावरचे एक ठरलेले पालुपद म्हणजे, मशिदीवरचे भोंगे का काढत नाही? ते काढलेच पाहिजे, यावर काही दुमत नाही. परंतु, ज्या संस्कृतीचा अनुनय भोंगे लावणार्‍यांनी केला आहे तिचे परिणामस्वत: त्या धर्माचे अनुयायी आणि उरलेले जग भोगत आहे. आपल्याकडे धर्माच्या तत्वज्ञानावर जग जिंकणारे शंकराचार्यही आहेत आणि धर्मातल्या त्रुटी दूर करण्यासाठी संघर्ष केलेले समाजसुधारकही आहेत. सणांमध्ये शिरलेल्या सांस्कृतिक प्रदूषणाचे काय करायचे, हा भल्याभल्यांना पडलेला प्रश्न आहे. गणेशोत्सवातही असेच प्रकार चालायचे. ज्योर्तिभास्कर जयंतराव साळगावकरांनी त्यासाठी संहिता आणली आणि गणेश मंडळांनी ती स्विकारलीसुद्धा. सार्‍याच सणांना अशा प्रकारच्या आचारसंहितेची गरज आहे. आज कृष्णाचा गोविंदा दादाचा, भाईचा किंवा अजून कुठल्यातरी पुढार्‍याचा गोविंदा झाला आहे आणि हीच मंडळी आता न्यायालयाच्या विरोधात बोलत आहेत. या राजकारणी मंडळींनीच या सणाचा चुथडा केला. दोष केवळ राजकारण्यांचा नाही. ‘यथा राजा तथा प्रजा’ अशी म्हण आहे. लोकशाहीत ही म्हण बरोबर उलटी होती. लोकांना जे हवे ते राजकारणी करीत राहातात आणि त्या बदल्यात त्यांच्या मतपेढ्या मजबूत होत राहातात.

अरुण गवळीचा ‘अखिल भारतीय सेना’ नावाचा पक्ष जोरात होता, तेव्हा त्या वर्षीच्या गोविंदा पथकांच्या अंगावर गवळीच्या बनियान दिसत होत्या. वॉर्डात नाले साफ होत नसले तरीही चालेल. त्यामुळे रोगराई पसरलेली असली, डॉक्टरांचे दवाखाने आजारी पोराबाळांच्या गर्दीने भरून ओसंडत असले तरीही चालेल; परंतु नगरसेवकाने दहीहंडी बांधली आणि स्वत:चे नाव छापलेली बनियान फुकट वाटली की हेच त्याचे प्रभाव टिकवून येण्यासाठी पुरणारे भांडवल होते. बाकी काही कामकेले नाही तरी ‘गोविंदाला बनियान दे, गणपतीला ट्रक दे, देवीला मंडप दे’ असे उद्योग करून ही मंडळी वर्षानुवर्षे निवडून येतात. सणवार, लोकांचे रोजचे जगणे यात होणारा न्यायालयांचा हस्तक्षेप हा नक्कीच वादाचा मुद्दा आहे. पण त्याची पार्श्वभूमी कोण निर्माण करते याचाही आपण विचार केला पाहिजे. बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी न्यायालयाने का बंद केली? तामिळनाडू मधील कंगायमजातीच्या बैलांबरोबर लावल्या जाणार्‍या शर्यती न्यायालयाने बंद का पाडल्या? बैलगाड्यांच्या स्पर्धाही बंद झाल्या त्या न्यायालयीन हस्तक्षेपामुळेच. या सगळ्यात काही ना काही आक्षेपार्ह गोष्टी होत्याच. लोकानुनयाखातर त्या इतकी वर्षे नाकारल्या गेल्या ऐवढेच. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या भूमिका विचार करायला लावणार्‍या नाहीत काय? सणांमधले बिभस्त प्रकार नजरेआड करता येतात मात्र ते नाकारता कसे येतील? शांततेने जगण्याच्या मूलभूत अधिकारांसाठी लोकांनी न्यायालयांचे दरवाजे ठोठविण्याची पद्धत यापुढे रुढच होत जाणार आहे. पुढल्या वर्षी महाराष्ट्रातल्या बर्‍याच महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या सगळ्या सणावारांचा उपयोग संभाव्य पुढारी करणार यात शंका नाही. आपल्याला सण हवे आहेत. सणांचे महत्त्व ओळखून लोकमान्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करायला सुरूवात केली. उत्सवाचा मूळ उद्देशच सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. लहान मुलांच्या एकलकोंडेपणाच्या चर्चा करीत असताना मानसशास्त्रज्ञ ‘सोशलायझेशन’ नावाची संज्ञा वापरतात. लोकांमध्ये मिसळणे असा त्याचा सोपा अर्थ आहे. मात्र तो बाज सांभाळला तर त्यात गोडवा आहे. मुंबईत येऊन चाकरमानी झालेल्या कोकणातील मंडळींचा हा सण लोकांना सामावून घेण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय झाला. एखाद दोन थर लावायचे. हंडीचे मडके फोडायचे आणि पारंपरिक वाद्यांवर दिलखुलास नाचायचे असे त्याचे स्वरूप होते. फुकटचे टिशर्टपासून सुरू झालेले फॅड इव्हेंट कधी झाले ते आपल्यालाही कळले नाही. आपल्या सांस्कृतिक प्रतिकांची जपणूक आपण पारंपरिक पद्धतीने करणार की, कुणाच्या तरी फायद्यासाठी त्याचे ‘इव्हेंट’ करणार याचा विचार आपल्याला कधीतरी गांर्भियाने करावा लागेल.

Powered By Sangraha 9.0