वर्ष संपण्याच्या आत या वेब सीरीज नक्की बघा

28 Dec 2016 16:49:00



वर्ष २०१६ आता संपायला आले आहे. या वर्षात बरेच काही घडून गेले. नवीन सिनेमे आले. नवीन नट नट्या आल्या. टी.व्ही चॅनल्स वर अनेक नवीन मालिकाही आल्यात. पण या वर्षातील सगळ्यात एक्सायटिंग गोष्ट म्हणजे अनेक वेब चॅनल्स आणि वेब मालिका उदयाला आल्या. जे काही टी.व्ही चॅनल वरच्या मालिकेत दाखवता येत नाही, ते या मालिकांमध्ये दाखवता येतं असं म्हणतात. मग ते हटके विषय असू देत किंवा आजच्या जनरेशनची भाषा. पण या वेगळेपणामुळेच या वेब सीरीयल्स यंगिस्तानला भावल्या आहेत. या मालिकांचं भाव विश्वच वेगळं आहे. नेहमीच्या मालिकांप्रमाणे याचा वेळही निश्चित नाही, काही भाग १५ मिनिटांचे तर काही २०. आणि लांब लचक चालणाऱ्या या मालिकाही नाहीत. ५-१० भागांहून जास्त मोठी यातील एकही मालिका नाही. बघूया २०१६ मधील काही अशाच एक्सायटिंग मालिका...

१. गर्ल इन द सिटि :

नावा वरुनच कळतं एका नवीन शहरात आलेल्या मुलीची ही कहाणी आहे. या मुलीचं नाव मीरा सेहगल. देहरादून सारख्या छोट्याशा सुंदर शहरातून मुंबईच्या गर्दीत आपलं "फॅशन डिझायनर" होण्याचं स्वप्न घेवून आलेली ही मुलगी. आर्मी बॅकराउंड असल्याने अत्यंत सुरक्षित वातावरणात वाढलेली. मुंबई ला आल्यावर सगळं जगच नवीन. त्यातून हिटलर बॉस, बिंदास मैत्रीण, ऑफिसमध्ये सततचे घोळ आणि या सगळ्याशी डील करणारी (सतत फोटो काढून हॅशटॅग वापरणारी) अत्यंत गोड निरागस आणि स्टायलिश मीरा. हटके विषय आणि हटके अभिनय बघायचा असेल तर ही मालिका आवर्जून बघावी. मराठमोळ्या मिथिला पालकर हिने या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. ही मालिका बिंदास चॅनलवर देखील आली. मात्र इंटरनेटवर त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.


२. ट्रिपलिंग :

असं म्हणतात रोडट्रिप्स या नेहमीच एक्सायटिंग असतात. पण हीच रोड ट्रिप जर आपल्या भाऊ बहिणींसोबत असेल तर? अशाच या भाऊ बहिणींच्या रोडट्रिपची कहाणी म्हणजे ट्रिपलिंग. टी.व्ही.एफ. वेब चॅनल वर ही कहाणी सुरु झाली. परदेशात सेटल झालेला, विदेशी मुलीशी लग्न करुन मात्र आता घटस्फोट घेवून घरी परत आलेला सगळ्यात मोठा भाऊ चंदन, एका पब मध्ये डीजे असलेला चितवन आणि प्रेम विवाह करणारी मात्र आता राजस्थानच्या 'रॉयल' लाईफ ला कंटाळलेली चंचल या तीन भाऊ बहिणींची ही कहाणी आहे. एक मेकांच्या खूप जवळ नसलेले, पण तरीही एकमेकांशी जोडलेल हे भाऊ बहीण आहेत. अनपेक्षिपणे ते निघतात एका रोडट्रिप वर. आणि पुढे घडतात अनेक गमती जमती. टिपिकल प्रेमकहाणी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्याचा कंटाळा आला असेल तर ही मालिका नक्की बघा. या मालिकेचं दिग्दर्शन समीर सक्सेना याने केलं आहे. तर 'परमनेंट रुममेट्स' फेम मिकी म्हणजेच सुमीत व्यास, मानवी गारगू आणि अमोल पाराशर यांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.


३. लिटिल थिंग्स :

आयुष्यात सगळ्यात जास्त काय महत्वाचं असतं? मोठ्या गोष्टी का छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद? माझ्यामते तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. हेच शिकवणारी ही नवीन मालिका 'लिटिल थिंग्स'. आकंठ प्रेमात बुडालेल्या ध्रुव आणि काव्या या जोडीची ही कहाणी. पण एक मिनिट. त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींरुन भांडणंही होतात. आणि याच छोट्या छोट्या गोष्टींचा ते आनंदही घेतात. कदाचित आजच्या शहरी तरुणांची हीच कहाणी आहे. ध्रुव आणि काव्या या दोघांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी ही मालिका एकदा तरी बघावीच.


४. कास्टिंग काऊच :

अरे अरे.. अगदी नावावर जाऊ नका.. एका काऊच वर वेगवेगळ्या कास्ट ला बोलावून गप्पा मारणारी वेब मालिका म्हणजे कास्टिंग काऊच. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, मराठी भाषेतील ही पहिलीच मालिका. दिल दोस्ती दुनियादारी मधून प्रसिद्ध झालेला अमेय वाघ, आणि निपुण धर्माधिकारी या दोघांची ही संकल्पना. यामध्ये राधिका आपटे, मिथिला पालकर, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, श्रिया पिळगांवकर, नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु अशा अनेक कलाकारांना बोलावून गप्पा मारल्या आहेत. कॉफी विथ करन, सिमि गिरेवाल यांच्या नंतर आपलं मराठमोळं कास्टिंग काऊच. या कार्यक्रमाला बरीच प्रसिद्धी मिळआली आहे.


५. पप्पू अॅण्ड पापा :

खरं तर आपल्या इथे कॉन्ट्रोव्हर्शिअल म्हणजेच वाद विवाद उत्पन्न करेल अशा विषयांवर बोलले जात नाही. त्यातून मासिकधर्म, लैंगिक शिक्षण हे असे विषय आहेत की ज्यावर सार्वजनिक पणे बोललं तर आजही काही लोकांच्या नजरा खाली जातात. याला एक टॅबू केलेलं आहे. खरं तर लहान मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाची आजच्या काळात खरच खूप गरज आहे. बस आणि व्हॅन मध्ये जाताना, शाळेत, टीव्ही वर आणि इतर अनेक ठिकाणी याबाबत त्यांच्या कानावर अनेक गोष्टी पडत असतात. त्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होणं साहजिक आहे. पण त्यांना त्यांच्या भाषेत समजावलं तर मात्र त्यांच्या शंकांचं निरसन योग्य पद्धतीनं होवू शकतं. आणि ते करणं आजच्या काळात गरजेचंही आहे. आणि तेच या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा असं या मालिकेचं नाव आहे. नाव कॉन्ट्रोव्हर्शिअल जरी असलं तरीही मुलांना त्यांच्या भाषेत अशा गोष्टी आजच्या पालकांनी कशा समजवाव्या हे यामधून दिसून येतं. तसं पाहिलं गेलं तर यातील पप्पूचं वय खूपच लहान दाखवलं आहे, ते इतकं लहान असता कामा नये. मात्र टीन एजर्स आणि एकूणच वय वर्ष १० च्या नंतरच्या मुलांशी या विषयावर संवाद साधण्यासाठी ही मालिका उपयोगी ठरेल. यामध्ये पप्पूच्या भूमिकेत कबीर साजिद, पप्पूच्या पापांच्या भूमिकेत आनंद तिवारी आणि त्यांच्या पापांच्या म्हणजेच पप्पूच्या आजोबांच्या भूमिकेत सचिन पिळगावकर दिसले आहेत. यशराज फिल्मची ही मालिका देखील इंटरनेटवर खूप गाजली आहे. मात्र ही मालिका लहान मुलांनी पालकांच्या सोबतीनेच बघावी.

Powered By Sangraha 9.0