आपला एखादा सुहृद जेव्हा जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत व्यतीत केलेल्या प्रसंगांच्या आठवणी आपल्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. जेव्हा वसंत सरवटे यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हापासून त्यांनी केलेली असंख्य ‘इलस्ट्रेशन्स’ माझ्या डोळ्यासमोर ‘स्लाईड शो’ सारखी सतत माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. ती चित्रे सुटेपणाने एक ‘कलाकृती’ म्हणून श्रेष्ठतम नसतीलही पण त्या सगळ्यांची बेरीज करून साकार होणारे वसंत सरवटे मात्र नक्कीच श्रेष्ठ होते.
वसंत सरवटे म्हटले की आजही माझ्यासारख्या असंख्य 'पु.ल.'प्रेमींना सर्वप्रथम आठवतात ती त्यांच्या पुस्तकांमधली एकापेक्षा एक अफलातून रेखाटने. खरंतर पुलंची अवघी भाषाच चित्र, ध्वनी, गंध यांनी संपृक्त आहे. त्याला कुठल्याही पार्श्वसंगीत किंवा रेखाटनांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. असे असतानाही त्यांची कित्येक पुस्तके सरवटेंनी आपल्या रेखाटनांनी अशी काही फुलवली आहेत की आता त्या चित्रांशिवाय ती पुस्तके डोळ्यासमोर येऊच शकत नाहीत. खरं म्हणजे पुलंची पुस्तके द.ग.गोडसे, दीनानाथ दलाल यांच्यासारख्या दिग्गज चित्रकारांनी किंवा शि. द. फडणीस यांच्यासारख्या त्यावेळी तुलनेने नव्या चित्रकारांनीही सुरेख सजवली, पण खऱ्या अर्थाने पुलंचे गुळपीठ वसंत सरवटेंशीच जमल्याचे प्रकर्षाने जाणवते. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे फारसे काही अवघड नसणारे. अद्वैताची माझ्या लेखी असणारी व्याख्या म्हणजे 'पुलंचे शब्दातल्या टपल्या आणि सरवटेंच्या रेखाटनांमधले चिमटे एकत्र येऊन जे काही तयार झाले आहे ते, किंवा भा. रा. भागवतांच्या भाषेतला आणि राम वाईरकरांच्या ब्रशमधला उत्साह एकमेकांत मिसळून जो प्रवाह निर्माण झालाय तो म्हणजे अद्वैत', इतकी सरळ सोपी आहे. एकवेळ पुलंच्या 'गणगोत' मधली व्ही. एन. ओक यांनी अनेक तपशीलवार चितारलेली विनोबा, बालगंधर्व किंवा ब.मो.पुरंदरेंची चित्रं आपल्या लक्षात राहिली तर ते आपण समजू शकतो पण 'बाळा नो नो रे' मधली सरला वाखणकर, 'पुलं तुम्ही स्वतःला कोण समजता' मधला थेरडा 'बोळके', 'खुर्च्या' मधले नाट्यकलेच्या भवितव्याची चिंता करणारे हिप्पीसदृश 'न-प्रेक्षक', 'विश्व.अश्व.शब्दे'मधला हिडीस प्रकाशक, 'मंगूमामा मंगूमामा' कवितेतले हवा भरेलेले पाडगावकर, ‘आवाज आवाज’ मधली 'कुक' म्हणणारी प्रेमळ आगगाडी, 'बटाट्याची चाळ' मधले ते पत्र्यावरचे मांजर, ‘ललित आत्मपरिचय कसे लिहावे’मधला विद्रोही लेखक कालिका दसनुरे वगैरे अन्य असंख्य मंडळी मजकुरात एकेका ओळीपुरती येऊनही जशीच्या तशी लक्षात राहतात. ही सरवटेंच्या प्रभावाची मोठी पावती असेल !
वसंत सरवटेंची चित्रे पाहता क्षणी सर्वात पट्कन लक्षात येतात ते म्हणजे त्यातले तपशील. खरेतर पुस्तकातली चित्रे ही मुख्यत्वे करून मजकुराला सहाय्यभूत/पूरक ठरावीत इथपतच असली तरी पुरेसे असते, त्यांनी 'पेंटिंग' इतके सविस्तर असण्याची आवश्यकता नसते पण सरवटेंची पुस्तकांमधली रेखाटने अर्कचित्र स्वरुपात येत असली तरीही त्यातले तपशील इतके लक्षणीय असतात की काहीवेळा त्या चित्रे डोळ्यासमोर ठेवून मग लेखकाने मजकूर लिहिलाय की काय अशी शंका येते, हेच सरवटेंच्या कलेचे यश म्हणायला हवे ! सुरुवातीच्या काळामध्ये खरंच असं घडल्याचे त्यांनीच लिहून ठेवले आहे. रघुनाथ तेंडुलकर यांच्या एका दीर्घकथेसाठी चित्रं काढण्याबाबत त्यांनी सरवटेंकडे विचारणा केली. कथेचा आराखडा सांगितला त्यानुसार त्यांना आधी रेखाचित्रे काढायला सांगितली. तपशील हाताशी नसल्यामुळे सरवटेंनी आपल्या आकलनानुसार ती काढल्यानंतर मग रघुनाथरावांनी त्याभोवती पात्रांच्या लकबी वगैरे तपशील भरून काढून कथा पूर्ण केली. या अनोख्या अनुभवामुळे पात्रांचे शारीरिक तपशील हाताशी नसतानाही आपली कल्पनाशक्ती वापरून पात्रं जिवंत करण्याची हातोटी त्यांना साधली.
पुलंच्या साहित्याव्यतिरिक्तदेखील विनोदी वाङ्मयाशी सरवटेंची विशेष गट्टी दिसून येते. दात पुढे डोकावणारे खट्याळ पुलं आणि अक्कडबाज मिशा, हातात हातोडा असूनही अतिशय निरागस भाव चेहऱ्यावर असणारा मिश्किल ठणठणपाळ ही सरवटेंची खऱ्या अर्थाने अजरामर रेखाटने. गंगाधर गाडगीळांच्या 'बंडू' कथा, मंगेश पाडगावकरांचा 'उदासबोध', रमेश मंत्रींचा 'जनू बांडे', वसंत सबनीसांच्या 'भारूड'इथपासून ते मुकुंद टांकसाळे यांच्या विनोदी कथांपर्यंत सर्वांना सरवटेंनी अधिकच खुमासदार केले आहे.
अर्थात हे सर्व खरे असले तरी फक्त 'व्यंगचित्रकार/अर्कचित्रकार' वसंत सरवटेंची एवढीशीच ओळख नाही. पन्नास वर्षांहून अधिक काळ विशिष्ट दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करणारे दोन भीष्माचार्य मराठीमध्ये आहेत - एक म्हणजे शि. द. फडणीस (ज्यांनी मोहिनी मासिकाचे दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आपल्या मिश्किल शैलीत सजवले ) आणि दुसरे आहेत वसंत सरवटे. 'ललित' मासिकाच्या दिवाळी अंकांची विशिष्ट विषयाला वाहिलेली त्यांची मुखपृष्ठं ही त्यामागचा विचार, त्यातले तपशील या दृष्टीने अभ्यासली जावीत अशी आहेत. ललित मासिकाचे व मॅजेस्टिक प्रकाशनाचे संपादक केशवराव कोठावळे आणि मौज प्रकाशनाचे संपादक श्री. पु. भागवत या व्यासंगी दोघांसोबत सरवटेंनी भरपूर काम केले. मुळातच जागी असलेली कलाजाणिव या दोघांच्या सहवासामुळे अधिक फुलत गेली आणि त्यांच्यातला मुखपृष्ठकार समृद्ध झाला असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच विनोदी पुस्तकांपासून ते पाडगावकरांच्या 'सलाम' सारख्या कवितासंग्रहापर्यन्त आणि श्री. दा. पानवलकरांच्या वेगळ्या वाटेच्या कथासंग्रहा पासून ते नारळीकरांच्या 'व्हायरस' सारख्या विज्ञान कादंबरीपर्यंत विलक्षण वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची मुखपृष्ठं त्यांनी कुशलतेने सजवली.
वसंत सरवटेंची 'इलस्ट्रेशन्स' रेखीव व सुबकतेच्या साचेबद्ध व्याख्येत बसणारी कधीच दिसली नाहीत आणि हीच मला त्यांची सर्वात भावणारी गोष्ट आहे. पत्राचे एखाद्या ओळीपुरतेच जे वर्णन पुस्तकात आले आहे त्याचा अर्क रेखाटनात उतरतोच पण त्याव्यतिरिक्त स्वतःच्या विचारातूनही सरवटे त्या पात्रांमध्ये तपशील भरतात, एवढेच नाही तर त्या रेखाटनांमध्ये रंग, रूप, चण वगैरेतल्या अनेक उणिवा अगदी बिनदिक्कतपणे उतरवतात. म्हणूनच मग म्हाताऱ्या ‘बोचकें’ची ची गळ्याखालची लोबंणारी त्वचा, सरला वाखणकरच्या चेहऱ्यावरची मुरमं, संभा नाभाजी कोतमिरेचे फेंगडे दात, कालिका दसनुरेच्या डोक्यावरचं आणि चेहऱ्यावरचं माजलेलं रान, बिऱ्हाड मालकाचे बनियनच्या बाहेर लोबंणारे पोट आणि हातावरचे/कानावरचे/नाकातले केस वगैरे गोष्टींमुळे ती पात्रं एकदम जिवंत होऊन आपल्या शेजार पाजारचीच होऊन जातात. काही थोर चित्रकारांची स्वर्गीय चित्रं पाहताना येणारी दडपून जाण्याची (आणि त्यामुळेच या कलेच्या दुष्प्राप्यतेची) भावना सरवटेंची इलस्ट्रेशन्स पाहताना होत नाही. माझे असे मत आहे की, कलाकार व त्यांची कला हे दोन्ही सामान्य रसिकाला जेवढे प्राप्य (रीचेबल) वाटतात तितकीच त्यांच्याकडून त्या रसिकाला स्फूर्ती मिळण्याची शक्यता अधिक वाढते.
कुठलाही कलाकार, खेळाडू, लेखक हा जितके जास्त निरीक्षण करतो तितका जास्त तो आपापल्या क्षेत्रात विस्तारात जातो. आपल्याकडे 'निरीक्षण' कमी व 'पाहणे' जास्त असते असे त्यांना प्रकर्षाने वाटायचे. पाश्चात्य व्यंगचित्रे, अर्कचित्रे याचा अभ्यास खूप मोठा असलेल्या सरवटेंनी त्यामुळेच त्यातले मर्म, विचार उलगडून दाखवण्यासाठी 'परकी चलन' हे पुस्तक लिहिले. त्यापुढेही त्यांनी चित्रविचार उलगडून दाखवणारी पुस्तके (‘व्यंगकला-चित्रकला’, ‘व्यंगचित्रे-एक संवाद’ इ.) लिहिली. पुस्तकातील रेखाचित्रांव्यतिरिक्त त्यांनी काढलेल्या अनेक अफलातून व्यंगचित्रांचे मनमुराद हसवणारे ‘खडा मारायचा झाला तर’, ‘सावधान पुढे वळण आहे’ इ. संग्रहदेखील प्रसिद्ध आहेत. त्यांचे हे काम नवे व्यंगचित्रकारच नव्हे तर नवे रसिक घडवण्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे. वसंत सरवटे यांच्या निधनामुळे चित्रकलेच्या अनेकविध शाखा चालवणारे एक विद्यापीठच कायमचे बंद झाले आहे.
जाता जाता : नुकताच वसंत सरवटेंच्या ‘व्यंगकला-चित्रकला’ या पुस्तकातील लेखाचा संपादित भाग मला वाचायला मिळाला. अजिबात चुकवू नये असा हा लेख. त्यांनी केलेल्या रेखाटनांमागचा विचार, वेगवेगळ्या प्रकृतीच्या रेषा वेगवेगळे भाव कसे व्यक्त करू शकतात याचे विवेचन अशा अतिशय वेधक गोष्टी त्यामध्ये त्यांनी मांडल्या आहेत खाली. त्याचा दुवा देत आहे.
http://www.aksharnama.com/client/article_detail/342
-प्रसाद फाटक