#ओवी Live मन आणि बुद्धी

25 Dec 2016 18:44:00


“या! या! श्रीधरपंत. आज काय आजार काढलाय?”, डॉक्टर काकांनी त्यांच्या teenage patient चे स्वागत करतांना विचारले.

श्रीधरने काही बोलायच्या आधीच राधिका म्हणाली, “डॉक्टर, अजीर्ण झालाय त्याला. अति जागरणे आणि अति खाणे अजून काय? आता तर काय कॉलेजला जातो म्हणाल्यावर काय ऐकणार आहे माझं?”

आई अजून काही उद्धार करणार, त्या आधी श्रीधर म्हणाला, “परवा रात्री birthday party होती काका. मग तिथे खूप जास्त खाण झालं. काल सकाळी मुंबईचा एक मित्र आला, मग त्याच्या बरोबर दिवसभर उन्हात हिंडलो आणि परत तेलकट, तिखट खाण झालं. आणि submission साठी रात्रीचा दिवस केला. मग काय? आज विकेट उडाली!”

“हंम्म! बर तुला दिवसभर खातांना, जागतांना काहीतरी चुकतंय असं जाणवलं नाही का?”

“कळत होतं ना काका! पण समोर इतके चविष्ट पदार्थ असतांना कुठे control करता येतं! आणि दिवसभर हिंडतांना पण लक्षात येत होतं की timepass करण्यापेक्षा submission करायला हवं. तसं केलं असतं तर आज जे कॉलेज बुडवून घरी बसायला लागलं ते झालं नसते!”, श्रीधर उद्वेगाने म्हणाला.

“बरेच केलेस! अरे मन मानेल तसं वागायच्या ऐवजी थोडं डोकं लावलं असतस तर या वैद्याची कशाला गरज पडली असती! आता ही औषधे घे. वेळेवर झोप. आणि हलका आहार घे. बरे वाटेल सकाळ पर्यंत.” डॉक्टर काका हसून म्हणाले.

“मी काय म्हणते, माझं नाही, पण किमान स्वतःची बुद्धी सांगते ते तरी ऐकल पाहिजे ना?”, राधिका म्हणाली.




ज्ञानेश्वर म्हणतात -

अर्जुना समत्व चित्ताचे | ते चि सार जाण योगाचे |
जेथ मन आणि बुद्धीचे | ऐक्य आथी || २.२७६ ||


जिथे मन आणि बुद्धीचे ऐक्य होते, तो योगी! जो आपल्या मनाचे लगाम बुद्धीच्या स्वाधीन करतो, आणि त्या प्रमाणे चालतो तो योगी! मन आणि बुद्धी जिथे एक होतात, तो नर नारायण होतो!

 -दिपाली पाटवदकर

Powered By Sangraha 9.0