परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि देशात एकच खळबळ माजली. भारतात आज पर्यंत इतका मोठा आणि धाडसी निर्णय घेण्याची शक्यता कोणीही वर्तवली नव्हती. मात्र मोदींनी हा निर्णय घेतला आणि देशातील सर्व स्तरातून या निर्णयाचं स्वागत झालं. लोकनिंदेचा विचार न करता इतका मोठा निर्णय घेणं म्हणजे छोटी बाब नाही. त्यासाठी लागते ती दूरदृष्टी आणि धाडस. या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होणंही ऐतिहासिकच आहे.
यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सामान्य माणसानं देशासाठी झळ सोसण्याची तयारी दाखवली. आपण सगळे थोड्या फार प्रमाणात स्वकेंद्रित झालो आहोत. आपलं आयुष्य हे आपल्या पुरतचं मर्यादित असतं. आणि आपली देशभक्ति दिसून येते ती केवळ १५ ऑगस्ट नाहीतर २६ जानेवारी ला. परंतु देशासाठी कुठला ही त्रास झाला तर तो मी सहन करेन असं म्हणणारा सामान्य माणूस मोदींच्या या खेळीचा हीरो झाला आहे.
आज सामान्य माणासाच्या काय भावना असतील? काल मी सकाळी दूध घ्यायला गेले होते, दुकानदार आमच्या ओळखीचेच. शंभराची नोट दिल्यावर खुशीने स्वीकारत ते बोलायला लागले. म्हणाले, "ताई सर्व सामान्य माणूस असण्याचा आज मला गर्व होतो आहे. मला काल शांत झोप लागली कारण माझ्या ईमानदारीची पहिल्यांदा किंमत झाली. नाहीतर या आधी जगात ईमानदार माणसाला मूर्ख समजायचे. पण आता खरेपणावर पुन्हा विश्वास बसला आहे हो. आता उशांमध्ये पैसे भरणारे लोक रडणार आहेत. आज गरीब आनंदी आहे आणि पैसे वाले रडतात आहेत." सामान्य दुकानदाराच्या या भावना आहेत. याहून मोठी पावती काय असेल?
पुढे दोन स्वच्छता करणाऱ्या मावश्या आपसात बोलत होत्या त्यातील एक मावशी म्हणाल्या "आपलं बरं हाय बाबा, आपल्या कड्ये या भारीच्या नोट्या कधीच नव्हत्या. आपुन खर्च करुन करनार किती. त्या येटीयम ला जायची गडबड नाय का ब्याँकेत जायची घाई नाय.." हे ऐकून खरच माझ्या मतदानाच्या अधिकाराचा मला अभिमान वाटला.
आज बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. अनेक नागरिकांना पैसे संपल्यामुळे पैसे मिळाले नाही असेही झाले. मात्र तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. आणि सरकारकडे हे सगळं करण्यासाठी इतका वेळ आहे तर मग आपण आपला वेळ का काढू शकत माही अशा प्रतिक्रिया समोर आल्या.
गेल्या काही काळापासून माध्यमांनी पैसेवाले लोक कसे सुखी आहेत आणि गरीब किती गरीब होत चालला आहे, निराश आहे असे चित्र उभे केले होते. मात्र आज सामान्य जनतेनेच त्याला प्रतिउत्तर दिले आहे.
आज पुण्यात डेक्कन जवळ कचराकुंडीत एका स्वच्छता कामगार महिलेला ५२ हजार रुपये रोख सापडले. सगळ्या नोटा हजाराच्या होत्या. सकाळी १० वाजेच्या सुमाऱ्यास ओला व सुका कचरा वेगळा करत असताना काळ्या रंगाच्या पिशवीत शांताबाई यांना ही रोख रक्कम सापडली. त्यांनी याची माहिती या भागाचे मुकादम खंडू कसबे यांना दिली. या दोघांनी मिळून हि रक्कम डेक्कन पोलीस ठाण्यात ही जमा केली. हेच म्हणणे आहे मोदींचे. खऱ्या माणसाची किंमत. या एका घटनेमुळे खऱ्या माणसाला स्वत:ची आणि त्याच्या खरेपणाची किंमत कळली. आजही देशात खरे लोक आहेत आणि सरकारला त्यांची काळजी आहे. हे या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे.
विरोधकांनाही मोदींच्या निर्णयाचे कौतुक करणे भाग पडले :
मोदींचा हा निर्णय नक्कीच धाडसी आहे. मात्र विरोधकांना देखील याचे कौतुक करणे भाग पडले. शरद पवार, नितिश कुमार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र अजूनही मिठाच्या खड्या प्रमाणे काही लोक आहेत, ज्यांच्या साठी मोदी द्वेष राष्ट्रहितापेक्षा महत्वाचा आहे. मुलायम सिंह, ममता बॅनर्जी, राहुल गांधी या सगळ्यांनी सामान्य जनतेचे कसे हाल होत आहेत असे चित्र उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण याच जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.