#ओवीLive: दिवाळी पहाट

30 Oct 2016 12:52:00

दिवाळी पहाट

“ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची, आरोग्याची व भरभराटीची जावो!”, नितीनदाने दिवाळीच्या कार्ड वरील शुभेच्छा वाचल्या.

“काय आहे रे तुमची सुखाची दिवाळी?”, नितीनदाने मुलांना विचारले. 

“भाऊबीजेची ओवाळणी!”, नितीनदाचा गालगुच्चा घेत पियू म्हणाली.

“नवीन कपडे!”, जयू म्हणाला.

“खमंग फराळ!”, दिव्यांची माळ खिडकीला बांधत बाबा म्हणाला.

“सुगंधी तेला-उटण्याची, मोती साबणाची पहाट म्हणजे सुखाची दिवाळी!”, इति जितू मामा.

“ठिपक्यांच्या रांगोळीची, पणत्यांच्या प्रकाशाची, झगमगत्या आकाश कंदिलाची – सुखी दिवाळी!”, आई म्हणाली. 

“आप्तेष्टांबरोबर साजरी केलेली दिवाळी म्हणजे सुखाची दिवाळी!”, मामी म्हणाली.  

“आजी, तू सांग की ग, सुखाची दिवाळी काय ती?”, आजीच्या मांडीवर बसत पियूने विचारले. 

लेकराच्या गालावरून हात फिरवत आजी म्हणाली, “आपण नेहेमी सुखा मागून दु:ख व दु:खामागून सुख अनुभवतो. संतांच्या भाषेत जे सुख एकदा आले की परत दु:खाचा अनुभव येत नाही ते खरे सुख. काय असते खरे सुख?

“सर्वत्र चैतन्य दिसणे, सकलांच्यात ईश्वर दिसणे – हे सुख. सर्व त्रैलोक्यात एकच एक तेज भरलेले आहे हा अनुभव म्हणजे सुख. मीच सकलांच्यात आणि सकल माझ्यात दिसणे हे सुख. ईश्वराचे आणि विश्वाचे ऐक्य कळणे हेच खरे सुख आहे.

“ज्ञानेश्वर म्हणतात, विश्वाशी समरस झालेला योगी नित्य महासुखाची दिवाळी अनुभवतो!

 

 

 

Powered By Sangraha 9.0