'फ्लॅट लिव्हिंग जनरेशन'चा वसुबारस

26 Oct 2016 15:55:00



दिवाळी सुरु झाली रे झाली की सगळ्यांमध्येच उत्साहाचा संचार होतो. मग आईमध्ये फराळ करण्याचा उत्साह असू देत, बाबांमध्ये सुट्टी काढून मुलांसोबत धमाल करण्याचा, दिवाळी अंक वाचण्याचा नाहीतर अभ्यंग स्नानाचा उत्साह असू देत. मुलांमध्ये तर विचारायला नको, नवीन कपडे, खरेदी, फटाके, आणखी काय काय. पण आमच्या 'फ्लॅट लिविंग जनरेशन' ला दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच वसुबारस्याचाही तितकाच उत्साह असतो का? आपण आजही 'त्या जुन्या' वसुबारस्याची मजा घेवूच शकतो की.



स्वप्न असल्या सारखे वरचे हे फोटो आज बघितले आणि या चिमुकलीचा मला हेवा वाटला. खेडेगांवाना कितीही मागास म्हटलं तरी संस्कृतीच्या बाबतीत ते आपल्या पेक्षा कितीतरी पुढे आहेत हे नक्की. शहरातील चार लोकांनी एखाद्या गोष्टीला टाकून दिले तरी ती जपण्यासाठी यांच्या सारखे काही लोक तयारच असतात.

आठवतं आपले आई वडील दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या बालपणीचे किस्से सांगायचे. वसु बारस्याला घराच्या गोठ्यातील गाईंची पूजा करणं, त्यांना चारा खावू घालण्याची मजा. ऐकूनच डोळ्यांसमोर चित्र उभं रहायचं. तेंव्हा वाटायचं आपल्याकडेही एक छोटसं वासरू असायला हवं. त्याला आंजारायचं गोंजारायचं तेव्हढंच एक निमित्त.

आधी घरासमोर जरा तरी गायी यायच्या. मला आठवतं माझ्या लहानपणी वसुबारस्याच्या दिवशी माझे आजोबा कितीतरी वेळ घराच्या दारासमोर उभे रहायचे गायींची वाट बघत. आणि गायी, वासरं यायची देखील. आणि आमच्या बाजूच्या घरातील चौकसे आजोबाही असायचे तिथे. मग त्यांच्या आणि आजोबांच्या गप्पा व्हायच्या. आजू बाजूच्या गोष्टी कळायच्या. आणि दिवाळीपण एकत्र साजरी केल्यासारखीही वाटायची.

पण आज फ्लॅट्सच्या सीमेंट्सच्या जंगलात, गाईच हरवल्या आहेत. शोधून देखील सापडत नाही. अशाने वसुबारस्याची पूजा करायची तरी कशी? मग आता कुणी तरी सांगेल ती चितळेंची पिशवी येते ना तिची पूजा करा. खरंतर गायी सापडल्याच नाहीत तर तसंही होईल. आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं गवत चरण्यासाठी तरी गायी यायच्या पण आता रस्ता रुंदीकरण त्याची सुंदरता हे सगळं लक्षात घेता, एकतर रस्त्याच्या बाजूला गवत नसतं. आणि असलं तरी ते खाण्यासाठी आलेल्या गाईंना ते खायची परवानगी नाही ही आठवण करुन देण्यासाठी एखादा गार्ड वगैरे असतो.

आजच्या कॉर्पोरेट जगात सुट्टी देखील केवळ लक्ष्मीपूजन आणि फारफारतर भाऊबिजेची मिळते. मग मुलांना सुट्टी असूनही पालकांना त्यांच्या पद्धतीने वसुबारस साजरा करता येत नाही. तरी देखील प्रयत्न केला तर आजही वसुबारस, त्याचं महत्व हे आमच्या आणि आमच्या नंतरच्या पीढीला नक्कीच समजावून सांगता येवू शकतं.

आमच्या नंतरच्या पीढीला तर गायी केवळ त्यांच्या सुंदर दिसणाऱ्या पुस्तकांमध्ये "काऊ" म्हणूनच माहीत आहे. (आम्हाला तर काऊ म्हटलं की, चिऊ काऊचीच गोष्ट आठवते.) मग त्यांना आपल्या संस्कृतीचं तसंच या दिवसांचं महत्व कळणार कसं?

तुम्ही कधी डेरीमिल्क ची जाहीरात बघितली आहे का हो? किंवा ते चॉकलेट तर नक्कीच खाल्ले असणार. त्यावर ती दूध देणारी गाय दिसते. आठवली का? आज आपण आपली दिवाळी हे डेरीमिल्क सेलीब्रेशन एकमेकांना देवून साजरी करतो. पण त्यावरची ती गाय कदाचित विस्मरणात गेली आहे.


ही जाहीरात बघितली आणि खरच जाणवलं आपलं ही असचं होतं ना दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी जास्त भावतात..मात्र त्या आठवणींना परत उजाळा देत आपण देखील कुणालातरी आनंत देवूच शकतो की. वसुबारस्याच्या निमित्ताने गायी वासरांना तर दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जवळच्या लोकांना.



कधीतरी दिवाळीच्या खरेदीला बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर गाय किंवा वासरु दिसलं तर मोबाईल मधून थोडं वर बघत, मुलांना ती दाखवावी. मुलांनाही त्यांच्याप्रती प्रेम, आणि आत्मियता निर्माण होईल. आणि वसुबारस्याला फ्ल्रट मध्ये गाय आणणं शक्य झालं नाही तर आपणच त्यादिवशी एखाद्या गोठ्यात किंवा डेअरीमध्ये जावून मुलांसोबत गायींचं पूजन करावं. कधी कधी मॉल्स मधल्या वास्तव्यापेक्षा या गाईंच्या शेणाचा वास आपल्या मातीशी तुटलेली नाळ परत जुळवू शकतो. अनुभवून बघायला आवडणार ना? गाय हा आपलाच प्राणी आहे, मात्र कांगारू सारखा तो संग्रहालयात बघण्याची तुमच्या मुलांची इच्छा नसेल तर नक्कीच त्यांच्या सोबत हा दिवस साजरा करा.

गाय तर एक निमित्त आहे. आणि वसुबारस ही घटना. मात्र आपल्या संस्कृतीची खरच नाळ आहे का? ती जपणे आवश्यक आहे का? ती जपायलाच हवी का? अशा शंका निर्माण झाल्यावर अस्वस्थ नक्कीच होतं. आज गाय आहे उद्या कदाचित लुप्त होणाऱ्या प्रजातींमध्ये आपले भाऊ बहीण असतील, आपले आई वडील असतील आणि कदाचित आपणही स्वत: स्वत:ला शोधण्यासाठी धडपडत असू. ते होण्याच्या आत एकदा या दिवाळीच्या निमित्ताने वसुबारस्याचा अनुभव घेवून बघूयात कदाचित आपल्या या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील.

Powered By Sangraha 9.0