#ओवीLive - भांडी घासा तणाव घालवा!

23 Oct 2016 09:34:00

भांडी घासा तणाव घालवा!

“आई, हा Florida University चा शोध निबंध बघ काय आहे – मन लावून भांडी घासल्याने stress कमी होतो. उत्साह वाढतो. आणि आनंदी वृत्ती वाढते.”, प्रिया आईला एका नवीन प्रयोगाबद्दल सांगत होती. “फक्त भांडी घासाण्याने नाही तर, कुठलेही साधे किरकोळ वाटणारे काम मन लावून केले की हेच फायदे मिळतात. केर काढणे, घर आवरणे, furniture पुसणे, कपाट लावणे, गाडी पुसणे, बाथरूम घासणे, भाजी आणणे, फिरायला जाणे ... काही पण. रोजची फालतू वाटणारी कामे मन लावून केल्याने anxiety पळून जाते, असे हा paper सांगतो.”

“गधडे, इतकी वर्ष मी काय हे कानडीत सांगितल का तुला? घसा खरवडून हेच तर सांगितलं की ग! तू मन लावून थोडं काम केलं असतंस ना, तर तुझाच काय, माझा पण stress कमी झाला असता!”, आईने मागच्या अनेक वर्षातला त्रागा बोलून दाखवला.

“तसं नाही ग आई! आता कसं हे प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे ना ते सांगते. ते काय म्हणतात की हातातल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्या. जसं भांडी घासातांना पाण्याचा स्पर्श अनुभवा. साबणाचा वास घ्या. भांड्याचा आकार feel करा. भांडे घासून झाले की नीट वाळायला ठेवा. वगैरे. असं केल्याने मनाला आनंद मिळतो!”, प्रिया म्हणाली.

“अक्का, हे आपण मुलांना सांगून सांगून दाताच्या कण्या झाल्या नाही?”, आई म्हणाली.

“हो ग हो! मी पण घरी असं बोलून बोलून थकले! ते असो. प्रिया आधी तुला ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिले आहे ते सांगते. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ठरलेल्या वेळी ठरलेले नित्यकर्म करणे ही आपली जबाबदारी तर आहेच, पण तो आपला अधिकार सुद्धा आहे. जसं डोळे आपोआप पाहतात किंवा दिवा लावला की प्रकाश पडतो, हे जितके सहज आहे, तितके नित्यकर्म करणे हे स्वाभाविक आहे.

“काही जणांना असे वाटते की, काय गरज आहे उगीच झीजायाची? त्यापेक्षा सरळ सगळ्या कामाला गडी लावून आपण स्वस्थ बसावं! पण जो माणूस नित्यकर्म करत नाही त्याचे जीवन कंटाळवाणे होते. निरुत्साही होते.

“भोजनाने जसे शरीर तृप्त होते, तसं नित्य – नैमित्तिक कर्म करून मन तृप्त होते. मात्र ते कर्म फळाची अपेक्षा न करता, भक्ती भावाने, लक्ष देऊन करावे. नित्यकर्म मनुष्याला सात्विक आनंद देते. मनाची शक्ती देते. आणि हा आनंदच त्या कामाच्या फलापेक्षा मोठे बक्षीस आहे!” 



 

Powered By Sangraha 9.0