भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

    09-Apr-2025   
Total Views |

who is tahawwur rana 26/11 terrorist attack connection
 
Tahawwur Rana Extradition : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रत्यार्पणावर तातडीने स्थगिती मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच त्याला भारतात आणण्यात येणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. परंतु हा तहव्वूर राणा नेमका आहे तरी कोण ? मुंबई हल्ल्यात त्याची भूमिका काय होती? आणखी कोणत्या प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली? याचा सविस्तर आढावा...
 
तारीख, २६ नोव्हेंबर २००८. १६ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला. हा हल्ला म्हणजे मुंबईकरांच्या काळजावर असलेली भळभळती जखम. या हल्ल्यात कित्येक निष्पाप जीवांचा नाहक बळी गेला होता. हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांपैकी ९ जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळालं तर या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं गेलं, त्याला नोव्हेंबर २०१२ मध्ये फाशी देण्यात आली. हे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबा अर्थात एलईटी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले जातं. त्यावेळी पाकिस्तानी-अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडलीविरोधात भारतीय यंत्रणांकडून तपास सुरु होता, या तपासात एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव होतं – तहव्वूर हुसैन राणा. शिकागो येथे कडेकोट बंदोबस्तात चार आठवडे चाललेल्या खटल्यादरम्यान राणाबाबतचे अनेक तपशील समोर आले. यादरम्यान त्याच्या बालपणीचा जवळचा मित्र हेडली याचीही पार्श्वभूमीही समोर आली.पण या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेडली तहव्वूर राणाविरुद्ध सरकारी साक्षीदार झाला. हेडलीने मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाबाबत तपशीलवार साक्ष दिली. तसंच, त्याचा आणि राणाचा सहभाग नेमका किती होता, हेही स्पष्ट केले.
 
तहव्वूर राणा हा मूळ जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला. राणाची पत्नीही डॉक्टर होती. पती-पत्नी दोघेही १९९७ मध्ये कॅनडात गेले आणि २००१ मध्ये कॅनडाचे नागरिक बनले. २००९ मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्षे राणाने अमेरिकेतील शिकागो इथे इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी सुरु केली होती. याचबरोबर इतर काही व्यवसायही सुरू केले होते. शिकागोत स्थायिक झाल्यावर तहव्वूर राणाची त्याची बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली पुन्हा भेट झाली. ज्यावेळी हेडलीने मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली, तेव्हा २००६ ते २००८ या काळात त्याला अनेकदा रेकी करण्यासाठी मुंबईत यावे लागले होते. यावेळी त्यांच्या वारंवार मुंबईत येण्याच्या हेतूविषयी कुणालाही शंका येऊ नये, यासाठी त्याने राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरु होत असल्याचे चित्र निर्माण केले. त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभारण्यात आले होते. त्याच कामासंदर्भात तो मुंबईत येत असल्याचे दाखवले जात होते. मुंबईत तो संवेदनशील ठिकाणांची रेकी करायचा. रेकी केल्यानंतर ती माहिती तो स्वतः पाकिस्तानात कॅाल करुन सांगणं टाळायचा. त्याऐवजी तो राणाशी संपर्क साधून सर्व माहिती द्यायचा आणि पुढे राणाकडून ती माहिती पाकिस्तानी हस्तकांपर्यंत पोहोचवली जायची.
 
डेव्हिड हेडली २००६ ते २००८ या काळात आठ वेळा मंबईत आला होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्लातील ठिकाणांची त्याने त्यावेळीच पाहणी केल्याचा आरोप आहे. हल्ल्यापूर्वी हेडलीऐवजी राणा मुंबईत आला होता. राणा अमेरिकेहून प्रथम दुबईला गेला. तेथून १२ नोव्हेंबर २००८ रोजी तो विमानाने मुंबईत आला. तो पवईतील एका आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. या पाच दिवसांत राणाने काय केले हे त्याच्या चौकशीतून स्पष्ट होईल हल्ला होण्यापूर्वी पाच दिवस आधी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी त्याने मुंबई सोडली. मुंबईतून तो दुबईला गेला. तेथून २४ नोव्हेबर रोजी तो चीनमध्ये गेला. तेथे दोन दिवस राहिल्यानंतर प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवशीच म्हणजे २६ नोव्हेंबर, २००८ रोजी त्याने अमेरिकेतील शिकागो गाठले. राणा शिकागोला पोहोचेपर्यंत २६ नोव्हेंबरच्या रात्री १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला.
 
FBI या अमेरिकन तपास यंत्रणेने ऑक्टोबर २००९ मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांना शिकागो विमानतळावर जेरबंद केलं होतं. डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स-पोस्टेनच्या कार्यालयांवर हल्ला करण्यासाठी हे दोघे डेन्मार्कच्या दिशेने जाणारं विमान पकडण्यासाठी जात होते, असा दावा त्यावेळी एफबीआयने केला होता. २००५ मध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे चित्रण करणारी १२ व्यंगचित्र प्रकाशित केले होते, त्याचाच बदला घेण्यासाठी राणाने डेव्हिड हेडलीच्या सहकार्याने या हल्ल्याचा कट रचला होता. या दोघांच्या चौकशीदरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची पहिल्यांदा माहिती समोर आली. अशाप्रकारे राणाला दोन वेगवेगळ्या कटात सहभागी असल्याबद्दल १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई हल्ल्याचा कट रचण्याबरोबरच डॅनिश वृत्तपत्रावरील हल्ल्याची योजना आखण्यात मदत केल्याबद्दलही राणा दोषी आढळला होता. राणाने हेडलीला कोपनहेगनमध्ये 'फर्स्ट वर्ल्ड' कार्यालयाची शाखा सुरू करण्यास परवानगी दिली. ऑक्टोबर २००९ मध्ये अटकेनंतरच्या निवेदनात राणाने कबूल केले की, हेडलीने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला होता. २००२ ते २००५ दरम्यान पाकिस्तानमधील एलईटीच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाच वेगवेगळ्या प्रसंगी सहभागी झाल्याची कबुलीही स्वतः हेडलीनेही दिली होती. “हेडलीने साक्ष दिली की, भारतात कुठे कुठे हल्ला करता येईल, याची राणाशी सल्लामसलत करून चाचपणी केली.२००५ मध्ये मुंबई आणि कोपनहेगन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना एलईटीनच रचली होती. हे दोघांच्याही कोर्टातील जबाबावरून स्पष्ट झालं. या दोन्ही योजनांमध्ये राणाही सहभागी होता.
 
भारताच्या तपास संस्थेने एनआयएने त्यांच्या ४०५ पानांच्या आरोपपत्रात राणाला मुख्य आरोपींमध्ये समाविष्ट केले होते. आरोपपत्रात म्हटले आहे की राणाने लष्कर-ए-तैयबा आणि आयएसआयच्या सहकार्याने हल्ला करण्याचा कट रचला होता. त्याने हेडलीला बनावट कागदपत्रे आणि पैसे दिले जेणेकरून तो मुंबईत लक्ष्य शोधू शकेल. राणाला हेडली कोणाला भेटत आहे आणि तो काय योजना आखत आहे हे माहित होते. हल्ल्याच्या संपूर्ण नियोजनात त्याने सहकार्य केले होते. २००९ मध्ये हेडलीला अमेरिकेतही अटक करण्यात आली होती. २०१३ मध्ये त्याला ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तो अमेरिकन नागरिक आहे आणि भारतालाही त्याचे प्रत्यार्पण हवे आहे. हेडलीने मुंबईतील अनेक ठिकाणांची रेकी केली होती - ताज हॉटेल, सीएसटी, नरिमन हाऊस. राणाने त्याच्या फर्मद्वारे हेडलीला संरक्षण दिले. आरोपपत्रात हे स्पष्ट आहे की राणाने दहशतवाद्यांना त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि लक्ष्य निवडण्यात मदत केली. तो हल्ल्याचा ब्लूप्रिंट तयार करण्यात सहभागी होता. या संपूर्ण हल्ल्याची माहिती राणाला होती. तसेच पाकिस्तानातील कोणत्या व्यक्तींच्या तो संपर्कात होता हेही त्याच्या चौकशीतून भारतीय यंत्रणांना समजेल. त्यामुळे या प्रकरणात तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण भारतीय यंत्रणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अशातच दिल्लीतील न्यायालयाने तहव्वुर राणा याच्यावरील सर्व खटल्याच्या नोंदी मुंबई न्यायालयाकडून मागवल्या आहेत. भारतात एकीकडे राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असतानाच पटियाला हाऊस न्यायालयाने राणावरील न्यायालयीन खटल्याच्या नोंदी मागवल्या आहेत. या हल्ल्यासंबंधित अनेक खटले दोन्ही राज्यांमध्ये सुनावणीसाठी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागलेले आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\