ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

    10-Apr-2025
Total Views |
 
Eknath Shinde
 
सोलापूर : ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे फेवरेट ब्रदर आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सांगोला येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही. काही लोक बंगल्यावर बसून फेसबुकशी खेळत बसतात. FB म्हणजे फुकट बाबूराव. मीसुद्धा FB आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर आहे. खुर्च्या बदलल्या तरी मनं आणि इरादे बदलले नाहीत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक झाली असे म्हणणार नाही. विरोधकांनी कितीही सांगितले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. थोडीफार कसरत होईल पण आम्ही सगळी आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. महायूतीचे सरकार वचनाला जागणारे आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत इंटरनॅशनल लीडर!  
 
टायगर अभी जिंदा है!
 
"सांगोल्याच्या लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटते. सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना यावेळी यश आले नसले तरी तेच तुमच्या हृदयातील नेते आहेत हे मला माहिती आहे. कार्यकर्ता काम करणारा असतो त्याला हार जीत याची पर्वा नसते. अनेकदा काम करून यश मिळत नसते. पण त्यामुळे निराश न होता काम करत राहायचे. एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट जोमाने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. टायगर अभी जिंदा है. बापूंना वाऱ्यावर सोडणार नाही. बापू मोकळ्या मनाचा माणूस असून ते स्पष्टवक्ते आहेत. सांगोला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले," असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "शहाजीबापू पाटील अडचणीच्या वेळी धावून जातात. आम्ही उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखे उभे होते. त्यावेळी सगळेच तणावात होते. पण बापू विनोद करून सगळ्यांना हसवायचे. काय झाडी, काय डोंगर या बापूंच्या डायलॉगमुळे अख्ख्या गुवाहाटीतील पर्यटन व्यवसाय वाढून चौपट झाला आहे. काही बिल्डदेखील त्यांच्या जाहीरातीत बापूंचा डायलॉग लावतात," अशी टोलेबाजी त्यांनी केली.