पोप यांची ‘होप’ ‘रँडम हाऊस’तर्फे बाजारात

Total Views |

review of the book hope by pope francis
 
 
मोठ्या अधिकार पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी, तसेच त्यांनी घेतलेल्या असंख्य निर्णयांमागील सुरस कथा वाचण्याची आवड अनेकांना असते. सध्याच्या पोप फ्रान्सिस यांचेही ‘होप’ हे पुस्तक बाजारात आले आहे. या पुस्तकाचा घेतलेला आढावा...
 
पोप महाराज यांचे बहुतेक दिवाळे वाजले असून, त्यांची ‘होप’ नावाची काहीतरी स्थावर-जंगम मालमत्ता लिलावात फुंकण्यासाठी बाजारात आली असावी, असे हा मथळा वाचून तुम्हाला वाटले असेल. पण, तसे काही नाही. कॅथलिक ख्रिश्चन संप्रदायाच्या गादीवरचे विद्यमान सर्वोच्च प्रमुख पोप फ्रान्सिस, हे आर्थिकदृष्ट्या चांगले टकाटक स्थितीत आहेत. ‘होप’ हे त्यांचे आत्मचरित्र किंवा आत्मचरित्रपर आठवणींचे पुस्तक असून, अगदी नुकतेच म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये ते बाजारात आले आहे. ‘रँडम हाऊस’ या प्रख्यात अमेरिकन प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले आहे.
 
पोप फ्रान्सिस हे पोप पदावर असणारे २६६वे पुरुष आहेत. येशू ख्रिस्ताचे बारा अंतरंग शिष्य होते. त्यातल्या सायमन पीटर याने, येशूच्या स्वर्गारोहणानंतर ‘चर्च’ या संस्थेची स्थापना केली आणि तो स्वतःच तिचा प्रमुख बनला. ही घटना इसवी सन ३० यावर्षी घडली, असे मानले जाते. त्यामुळे सायमन पीटर उर्फ सेंट पीटर यालाच पहिला पोप मानतात. त्याच्यापासून आज पोप फ्रान्सिस यांच्यापर्यंत कोण कोण व्यक्ती पोप पदावर येऊन गेल्या, याची नोंद कॅथलिक चर्चकडे आहे. त्या नोंदीनुसार, विद्यमान पोप फ्रान्सिस हे २६६वे पोप किंवा रोमचे बिशप (पोपना ‘रोमचे बिशप’ असेही म्हणतात) आहेत. म्हणजे पोप या पदाला किंवा एकंदर कॅथलिक ख्रिश्चन संप्रदायाला, इ. स. ३० ते इ. स. २०२५ असा दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एवढ्या प्रदीर्घ काळात, एखाद्या पोपने स्वतःचे चरित्र किंवा आठवणी लिहून प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
इंग्रजी साहित्यात आत्मचरित्र-ऑटोबायोग्राफी आणि आत्मचरित्रात्मक आठवणी-मेम्वॉर (स्पेलिंगनुसार उच्चार मेमॉयर) असे दोन प्रकार आहेत. आत्मचरित्र हे जन्म, बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कर्तृत्व, घडामोडी असे कालानुक्रमे असावे, असे अपेक्षित असते. तर आठवणी या जशा आठवतील, तशा शब्दांकित केलेल्या असतात. पोप महाराजांचे ‘होप’ हे पुस्तक, आठवणी या सदरात मोडते. या आठवणी लिहिण्यासाठी, पोप महाराजांनी कार्लो मुसो या इटालियन पत्रकाराला सहलेखक म्हणून बरोबर घेतले आहे.
 
तुम्हाला आठवत असेल की, २०१३ साली तत्कालिन पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी ‘चर्च’ संस्थेतील असंख्य भानगडींना कंटाळून राजीनामा दिला होता. त्यानंतर जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ हे दक्षिण अमेरिकन कार्डिनला, नवे पोप म्हणून निवडून आले आणि त्यांनी पोप फ्रान्सिस या नावाने पदभार स्वीकारला. कॅथलिक संप्रदायातल्या अनेक उपपंथांपैकी, ‘जेसुईट’ या उपपंथातून पोप पदावर जाणारे ते पहिलेच होत. त्याचप्रमाणे, ज्यांचा जन्म युरोप खंडाच्या बाहेर झाला आहे, जे अमेरिका खंड, त्यातूनही दक्षिण अमेरिका खंडातल्या तुलनेने दुर्बळ अशा अर्जेंटिना या देशाचे नागरिक असूनही, पोप पदावर जाणारे पहिलेच. असे बर्‍याच बाबतीत पहिलेच असल्यामुळे, त्यांच्या कारकिर्दीबद्दल सर्वच एक उत्सुकता होती. त्याचप्रमाणे, ‘चर्च’ संस्थेतील आर्थिक भ्रष्टाचार आणि लैंगिक दुराचार यांना कंटाळून, पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिला होता. त्या बाबतीत आता पोप फ्रान्सिस काय उपाययोजना करतात, याबद्दलही उत्सुकता होती.
 
पोप फ्रान्सिसना पदभार स्वीकारून, आता दशकभराचा काळ उलटून गेला आहे. ते आठवणींचे पुस्तक लिहीत आहेत, असे म्हटल्यावर तर खूपच कुतूहल निर्माण झाले होते. गेल्या दहा-अकरा वर्षांत पोप फ्रान्सिस यांनी जाहीरपणे काय केले आहे? तर त्यांनी कॅनडामधल्या मूळ निवासींची मिशनर्‍यांनी कत्तल केली आणि बाटवाबाटवी केली, याबद्दल जाहीरपणे क्षमा मागितली. अमेरिकेत फार बोकाळलेल्या समलिंगी विवाहांना, त्यांनी ठाम विरोध केला. पण, त्याचवेळी समलिंगी संबंध ठेवणार्‍या व्यक्तींना बहिष्कृत न ठरवता, एक माणूस म्हणून, आशीर्वाद दिले.
 
‘तुम्ही हिंदू लोक, तुमचा धर्म, तुमची संस्कृती हे सगळे जुनाट आणि मागास आहे. कारण, तुमच्या धर्मात विषमता आहे. आमच्या धर्मात बघा, सगळे कसे समान आहेत. म्हणून आमच्या येशूच्या धर्मात या. आकाशातल्या बापाच्या कळपात सामील व्हा,’ अशा आशयाची भंपक प्रवचने पांढर्‍या पामघोळ झग्यातले पाद्री, गेली किमान २०० वर्षे आम्हाला देत आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगभर पसरलेल्या ‘रोमन कॅथलिक चर्च’ संस्थेच्या अनेक डिपार्टमेंट्समध्ये २०१३ सालीसुद्धा, महिलांना पूर्ण सभासदत्वाचा हक्क नव्हता. त्यांना अर्ध सभासद मानले जात असे. वर्तमान २१व्या शतकातसुद्धा हे महिलांना कमी लेखतात आणि आम्हाला जिभा लांब करून, विषमतेवर प्रवचने देतात! यंव रे गब्रू!
 
तर २०१३ साली पोप बनलेल्या फ्रान्सिसनी, महिलांना चर्चच्या सर्व विभागांमध्ये पूर्ण सभासदत्वाचा अधिकार दिला. भांडवलवाद, त्यातून निघालेला चंगळवाद, अतिविकसितता आणि त्यातून उभे राहिलेले हवामान बदलाचे संकट यांवर त्यांनी, नापसंती दर्शक टीका केली. देहांताच्या शिक्षेला त्यांनी विरोध केला आणि जगभरच्या सर्व राष्ट्रांनी देहांताची शिक्षा रद्दच करावी, असे आवाहन केले.
 
२०११ साली इजिप्त आणि लीबिया या देशांमध्ये, यशस्वी क्रांती झाली. तर सीरियामध्ये यादवी युद्ध सुरू झाले. त्यामुळे या आणि इतरही आफ्रिकन देशांमधून, फार मोठ्या प्रमाणावर निर्वासित लोक युरोप खंडात येऊ लागले. भूमध्य समुद्रातून चोरट्या जलवाहतुकीद्वारे युरोपात येणारे हे निर्वासित, मुख्यतः मुसलमान होते. मुसलमानांच्या शिरजोरी करण्याच्या मूळ स्वभावानुसार, हे निर्वासित युरोपीय देशांमध्ये नानाप्रकारे तंटे-बखेडे करू लागले. पण, पोप फ्रान्सिस यांनी २०१३ सालानंतरच्या काळात, या निर्वासितांना सांभाळून घेण्याचा सल्ला ‘युरोपीय कॅथलिक चर्च’ संस्थेला, म्हणजेच एक प्रकारे युरोपीय सरकारांना दिला.
 
एकीकडे ‘कॅथलिक चर्च’ ही जगभरातली एक अत्यंत शक्तिशाली, अत्यंत श्रीमंत, अत्यंत प्रभावशाली संस्था आहे. पण, दुसरीकडे हा भलामोठा डोलारा, दिवसेंदिवस पोकळ होत चालला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढत्या झपाट्यासमोर, लोकांच्या मनातली धर्मावरची श्रद्धाच नष्ट होत चालली आहे. तर, दुसरीकडे इहवादी जीवनशैलीमुळे जो भावनिक, मानसिक रितेपणा लोकांच्या भावजीवनात निर्माण झाला आहे, त्याला भरून काढण्यात पाद्री अयशस्वी ठरत आहेत. त्यागमय जीवनाच्या नुसत्या गप्पा मारून चालत नाही, ते प्रत्यक्ष जगून दाखवावे लागते आणि इथे तर मोठेमोठे कार्डिनल्स, बिशप्स यांच्या विकृत लैंगिक जीवनाच्या नवनवीन कथा, रोज बाहेर येत आहेत.
 
या सर्वांवर उपाय म्हणून पोप महाराजांनी जगभरच्या चर्च संस्था, यात कॅथलिक चर्च बरोबरच ऑर्थोडॉक्स चर्च, प्रोटेस्टंट अँग्लिकन चर्च, सीरियन चर्च अशा सर्व मिळून, ३६४ उच्च प्रतिनिधींची एक भव्य बैठक आयोजित केली होती. ऑक्टोबर २०२४ साली ती बैठक संपली. या बैठकीत काय ठरले ते ठराविक सांकेतिक, धर्मशास्त्रीय, किचकट, कंटाळवाण्या भाषेत प्रसिद्ध करण्यात आले. सर्वसामान्य माणसाला कळेल असे एवढेच होते की, परस्पर सहकार्य वाढवा, संघटन वाढवा, तिसर्‍या सहस्रकात आपल्याला प्रभू येशूचे मोठे कार्य करायचे आहे, ते तडीला नेण्यास सिद्ध व्हा. पण, म्हणजे नेमके काय करा? प्रभू येशू जाणे आणि पाद्री जाणे!
 
तर, सर्वसामान्य वाचकाला अशी मोठी उत्सुकता होती की, २००० वर्षांत प्रथमच एका पीठाधीन पोप महाराजांनी आठवणींचे पुस्तक लिहिले आहे; आपल्याला गेल्या १०-११ वर्षांतील त्यांच्या गतिविधींबद्दल, निर्णयांबद्दल, हालचाली, गाठीभेठी, प्रवास यांबद्दल खुद्द त्यांच्याकडून, काहीतरी आतल्या गोटातल्या गोष्टी समजतील. महिलांना पूर्ण सभासदत्वाचा हक्क देणे आणि चर्चच्या एकंदर कार्यात त्यांचा सहभाग वाढवणे, हा मोठा निर्णय होता. या निर्णयावर पोहोचताना, स्वत: पोप आणि त्यांचे सल्लागार मंडळ कसा विचार करत होते? याबद्दल समजून घ्यायला सगळ्यांनाच आवडले असते. मुसलमान निर्वासित आणि त्यांची निमकहराम शिरजोरी वाढतच जाणार, हा अनुभव असतानासुद्धा पोपनी त्यांना सांभाळून का घेतले? हा कुतूहलाचा विषय आहे.
 
पण, पोपमहाराजांनी आपल्या ‘होप’मध्ये, याबद्दल काहीही लिहिलेले नाही. आपले आजोबा मूळचे इटालियन, पण अर्जेंटिनात स्थलांतरित झाले. ऐनवेळी त्यांनी ठरलेली बोट न पकडता, दुसरीच बोट पकडली आणि ते सुदैवी ठरले. कारण,ती पहिली बोट बुडाली. त्याचप्रमाणे, मला माझी आजी, फुटबॉलचा खेळ, नम्रता हा गुण आणि फुटपाथवरच्या गाडीवरचा पिझ्झा फार आवडतो; आता पोप झाल्यामुळे फुटपाथवर उभे राहून पिझ्झा खाता येत नाही आणि माझ्या राजेशाही निवासस्थानात ऑर्डर करून मागवलेल्या पिझ्झ्याला ‘ती’ चव येत नाही, असल्या काहीतरीच गोष्टी सांगून त्यांनी वाचकांना कंटाळा आणलेला आहे. पाश्चिमात्य समीक्षकांच्या मते या ‘होप’ मधून वाचकाला एवढेच कळते की, पोप महाराज फार प्रेमळ आहेत, सज्जन आहेत, पण जाम बोअर आहेत.
 
वाचक एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे आत्मचरित्र, चरित्र किंवा आठवणींचे पुस्तक का वाचतो; तर प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, संघर्ष करत ती व्यक्ती मोठी झालेली असते किंवा अधिकारपदावर आल्यावर त्या व्यक्तीने, कठीण परिस्थिती योग्य रीतीने हाताळून यश मिळवलेले असते. तो संघर्ष, तो झगडा, तो योग्य निर्णय, ते ताणतणाव हेच तर वाचनीय असतात, अन्यथा, मी सकाळी उठून दात घासले ते रात्री पोट साफ ठेवणारे औषध खाऊन झोपलो, असले तपशील कुणी लिहिले, तर ते कोण वाचणार? असो. कसेही म्हणजे कदाचित ‘होपलेस’आहे, असे समीक्षकांना वाटले, तरी अखेर ते पोप महाराजांच्या आठवणींचे पुस्तक आहे. तेव्हा लाखो सश्रद्ध कॅथलिक लोक ते घेणार हे नक्कीच. प्रकाशक ‘रँडम हाऊस’साठी ‘होप’ भरपूर खपणार.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.