सायबेरियातून आला मुंबईच्या मुक्कामी; 'या' पक्ष्याची महाराष्ट्रातून पहिली छायाचित्रित नोंद

    04-Mar-2025   
Total Views |
 siberian thrush from maharashtra
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सायबेरियन कस्तुर या पक्ष्याची महाराष्ट्रामधून प्रथमच छायाचित्रित नोंद करण्यात आली आहे (siberian thrush from maharashtra). महत्त्वाचे म्हणजे ही नोंद मुंबईसारख्या गजबजेल्या प्रदेशातून झाली आहे (siberian thrush from maharashtra). शहरातील एका संवेदनशील नागरी वसाहतीमध्ये या पक्ष्याने सध्या मुक्काम ठोकला आहे. (siberian thrush from maharashtra)
 
 
कस्तुर कुळातील पक्षी हे त्यांच्या वैविध्यपूर्ण आवाजासाठी ओळखले जातात. याच कुळातील मात्र सायबेरियामध्ये प्रजनन करणारा सायबेरियन कस्तुर पक्षी मुंबईत आढळून आला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका संवदेशनील नागरी वसाहतीमध्ये सध्या हा पक्षी वास्तव्यास आहे. याठिकाणी राहणारे पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकार अल्पेश फुलारे यांना या पक्ष्याचे सर्वप्रथम दर्शन झाले असून या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद आहे. १ मार्च रोजी हा पक्षी आम्हाला पहिल्यांदा इमारतीखाली ठेवलेल्या पाण्याच्या पाॅटवर पाणी पिताना दिसल्याची माहिती फुलारे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यानंतर तो दिवसभर त्या पाण्याच्या पाॅटवर आणि समोर असणाऱ्या झाडावर येऊन बसत असल्याचे निरीक्षण फुलारे यांनी टिपले. या पक्ष्याने मुक्काम ठोकलेला प्रदेश हा जंगलसदृश्य आहे. त्यामुळे त्याला या भागात अनुरुप निवारा मिळाला आहे. हा पक्षी मादी जातीचा आहे. यापूर्वी १९७० च्या दशकात या पक्ष्याची महाबळश्वेर परिसरातून नोंद करण्यात आली होती. मात्र, त्याचा कोणताही छायाचित्रित पुरावा उपलब्ध नाही.
 
 
सायबेरियन कुस्तर हे पक्षी सायबेरियामधील टायगामध्ये प्रजनन करतात. ते स्थलांतरी पक्षी आहेत. त्यामुळे हिवाळ्यात हे पक्षी आग्नेय आशियात स्थलांतर करतात. हे पक्षी लपून-छपून अधिवास करतात. ते सर्वभक्षी असून विविध कीटक, गांडूळ आणि फळे खातात. यामधील नर कस्तुर हे गडद निळ्या राखाडी रंगाचे असतात. त्याच्या डोळ्याच्या वर पांढरा पट्टा असतो. खालचे पोट आणि बाजूचा भाग हा पांढरा असतो. तर मादी ही तपकिरी रंगाची असते.
 
 
 
१ मार्च नंतर सायबरेयिन पक्ष्याची मादी ही सातत्याने दिसत आहे. प्रथमदर्शनी हा पक्षी नवीन वाटल्याने आम्ही त्याची छायाचित्र टिपून तज्ञांच्या मदतीने त्याची ओळख पटवली. सध्या ही मादी पक्षी पाण्याच्या पाॅटवर किंवा झाडांवर बसलेली आम्हाला दिसून येत आहे. - अल्पेश फुलारे, पक्षीनिरीक्षक

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.