
ठाणे: ( Ganga Aarti at Upvan Lake thane )‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य (25वे) महोत्सवी वर्ष आहे. न्यासच्यावतीने नववर्षानिमित्त दि. ३० मार्च रोजी काढण्यात येणार्या स्वागतयात्रेत यंदा संस्कृतीचा महाकुंभ अवतरणार आहे.
त्याचीच पूर्वतयारी म्हणून शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी उपवन तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगाआरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता आली.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नगरसेविका परिषा सरनाईक, ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष टीजेएसबीचे शरद गांगल, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉ. अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पुण्याचे संदीप वैद्य आदींसह शेकडोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी “केवळ २५ वर्ष आहे म्हणून नव्हे, तर दरवर्षी अशी गंगाआरती उपवन तलाव येथे व्हावी. त्याचबरोबर घोडबंदर परिसर आणि ठामपा हद्दीतही गंगाआरती व्हावी,” अशी अपेक्षा माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.