
मुंबई, दि.१५ : विशेष प्रतिनिधी ५० लोकांची क्षमता असलेले ॲॅम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी सोयीसुविधांसह जेटी असणार आहे. रेडिओ क्लब येथील प्रवासी जेटी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.१४ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
दरवर्षी लाखो पर्यटकांची गेट वे ऑफ इंडियाला भेट
दरम्यान, मुंबई मधील गेटवे ऑफ इंडिया हे महत्वाचे पर्यटनस्थळ असून याभागातून दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लक्ष इतकी प्रवासी आणि पर्यटन वाहतुक होते. गेटवे येथील अस्तित्वातील जेट्टी सुविधा प्रवाशांकरिता अपुरी पडत असून काही वेळेस प्रवाशांना विशेषतः वृध्द व्यक्ती, स्त्रिया आणि लहान मुले यांना खूप अडचणी निर्माण होतात, प्रवाशांच्या सोयीकरीता गेटवे ऑफ इंडिया येथे जेट्टी बांधणे व त्यालगत सुविधा निर्माण करणे प्रस्तावित होते. परंतु त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने नौसेनेने आक्षेप घेऊन प्रस्तावित जेट्टी रेडिओ क्लब नजीक बांधण्यात यावी, अशा सूचना केल्या. तसेच,मेरिटाईम बोर्डाने या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या. यानंतर आता मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी भूमिपूजन केले.
अशी असणार जेट्टी
रेडिओ क्लब येथे पर्यटन जेट्टी, टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा निर्माण करणेबाबत या कामाचे रु.२२९.२८ कोटी इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास सागरमाला प्रकल्पांतर्गत या शासन निर्णयान्वये नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. शिपिंग मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांची भागीदारी असणार आहे. मुंबई मधील गेटवे ऑफ इंडिया हे महत्वाचे पर्यटनस्थळ असून तेथून एलिफंटा, मांडवा, जेएनपीटी, हार्बर क्रूझींग याकरिता अस्तित्वातील ५ जेट्टीचा वापर करुन जलप्रवासी वाहतूक करण्यात येते. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने आता रेडिओ क्लब नजीक जेट्टी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. याठिकाणी टर्मिनल इमारत ८० मीटर बाय ८० मीटर, ३५० लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी, अग्नीसुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, गार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी भुगर्भ चाचणी करण्यात आली आहे.