ग्रीसच्या अर्थव्यवस्थेचा सागरीसेतू

Total Views |

greece
 
ग्रीस म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो प्राचीन इतिहास, लोकशाही, ऑलिम्पिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी. यासोबतच तेथील राज्यशास्त्र विषयातील तज्ज्ञ, गणिततज्ज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध. ग्रीस हा विकसित देश म्हणून ओळखला जात असून, १९८१ सालापासून युरोपीय महासंघांचा तो प्रमुख सभासद आहे. अशा या विकसित देशातील पायाभूत सुविधा, येथील अर्थव्यवस्था गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यापैकीच महत्त्वाचा आणि आकर्षक, कोरिंथ आखाताच्या पलीकडे असलेल्या पश्चिम बंदरावरील शहर पात्रा आणि पश्चिम ग्रीकच्या मुख्य भूमीला जोडणारा २ हजार, ८८० मीटर लांबीचा ‘रिओ-अँटिरियो’ हा सागरी सेतू आहे.
 
हा पूल जगातील सर्वात लांब झुलत्या पुलांपैकी एक. या आकर्षक आणि लक्षवेधी पुलाने, दोन दशकात ग्रीसमधील आर्थिक चित्रच पालटून टाकले. पेलोपोनीजला मध्य ग्रीसशी जोडणार्‍या रिओ-अँटिरियो पुलाचे उद्दिष्ट, प्रवासी आणि मालवाहतूक खूप सोपी करणे होते. दि. १२ ऑगस्ट २००४ रोजी अथेन्स ऑलिम्पिकच्या निमित्ताने आणि ग्रीससाठी एका नवीन युगाची सुरुवात म्हणून, या पुलाचे झालेले उद्घाटन ही एक ऐतिहासिक घटना होती. या पुलाचे उद्घाटन हा एक भव्य सोहळा होता; कारण या पुलावरून अधिकृतपणे प्रवास करणारे पहिले नागरिक दुसरे-तिसरे कोणी नसून, २००४ सालच्या ऑलिम्पिकचे मशालवाहक होते. या पुलाचे अधिकृत नाव ’चारिलाओस ट्रिकौपिस ब्रिज’ आहे, जे एकोणिसाव्या शतकातील ग्रीसच्या पंतप्रधानांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. जे पेलोपोनीजला मध्य ग्रीसशी जोडणार्‍या अशा स्पॅनची, कल्पना करणारे पहिले व्यक्ती होते. दुर्दैवाने, त्यावेळी राज्याच्या आर्थिक क्षमतेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पाला परवानगी नव्हती. या मार्गात, पूर्वी फक्त फेरीने किंवा करिंथच्या इस्थमसद्वारे पोहोचता येत असे.
 
रिओ-अँटिरियो पूल हा त्याच्या स्थानामुळे आणि प्रदेशाच्या भूगर्भशास्त्रामुळे येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या, विशिष्ट अभियांत्रिकी शैलींमुळे ग्रीसमधील अभियांत्रिकी उत्कृष्ट नमुना मानला जातो. या अडचणींमध्ये विशेषतः खोल पाणी, पुलाच्या तळाखाली एकेकाळी अस्थिर असलेली जमीन, भूकंपीय क्रियाकलाप, त्सुनामीची शक्यता आणि प्लेट टेक्टोनिक्समुळे, कोरिंथच्या आखाताचा विस्तार यांचा समावेश होता. प्रत्येक घाटाखाली जमिनीत २०० पोकळ स्टील पाईप टाकून, समुद्रतळ प्रथम मजबूत आणि स्थिर करण्यात आले. घाटाचे पाय स्वतः समुद्रतळात ढकलले गेले नाहीत; ते एका समतल पृष्ठभागावर काळजीपूर्वक समतल केलेल्या रेतीच्या थरावर आहेत. भूकंपाच्या वेळी घाट समुद्राच्या तळाच्या बाजूने हलू शकतात, अशावेळी रेतीचा थर ती कंपने शोषून घेतो. कोणत्याही हालचाली शोषून घेण्यासाठी डिझाईन केलेले विशेष जॅक आणि डॅम्पर वापरून, पुलाचे डेकिंगदेखील पायलॉनशी जोडलेले आहे.
 
पश्चिम ग्रीस आणि पेलोपोनीजमधील ‘ऑब्झर्व्हेटरी ऑफ रोड नेटवर्क्स’ने केलेल्या अभ्यासानुसार, या सुंदर शुभ्र केबल-स्टे पुलाच्या बांधकामामुळे, देशाला प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. ऑगस्ट २०२४ सालापर्यंतही, रक्कम जवळपास ४०० दशलक्ष युरोपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, २०१७ ते २०३२ सालच्या या कालावधीत, पुलाच्या बांधकामामुळे या भागात एकूण एक अब्ज युरोपेक्षा जास्त निधी येईल. या पुलामुळे पर्यटकांचा ओघदेखील सुधारला आहे, जो विशेषतः उत्तरेकडून पात्रास बंदरातून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत दिसून येतो. आयोनियन समुद्रातील बेटे आणि मध्य ग्रीसमधील प्रदेशांकडे जाणारे प्रवासी, आता देशाच्या मध्यवर्ती भागातून सहज आणि जलद गतीने या मार्गाने ये-जा करू शकत आहेत. या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, या पुलाच्या उत्तरेकडील भागातील मालमत्तेच्या किमतींवर आधीच सकारात्मक परिणाम झाला आहे, ज्यामुळे जमिनीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अविकसित असलेल्या क्षेत्राला, अतिरिक्त मूल्य मिळाले आहे. ज्यामुळे गुंतवणूक आकर्षित झाली आहे. आज २१ वर्षांनंतर एका देशाच्या अर्थकारणाला उभारी देण्यात सागरी सेतू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.