तंबाखू आणि युनान

Total Views |

article on tobacco production in yunnan
 
व्यसन मग ते कोणतेही असो वाईटच. त्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असल्यास ते जीवावरच बेतते, हा आजवरचा अनुभव. असे असले, तरीही जगभरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांची संख्या कमी नाही. जशी सेवन करणार्‍यांची संख्या कमी नाही, तशीच तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादकांचीही संख्या कमी नाही, यात अनेक देशांची सरकारेदेखील सामील. कारण, महसूल..!
 
‘फिलिप मॉरिस’ही अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यात रिचमंड या शहरात असलेली कंपनी आहे. ती जगातली सर्वात मोठी सिगरेट उत्पादक कंपनी आहे. तिचे अनेक ब्रॅण्ड्स आहेत. या सर्वांवर ‘फिलिप मॉरिस, रिचमंड, व्हर्जिनिया’ हे चार शब्द असतातच. संपूर्ण जगभरात दिवसाच्या २४ तासांत, प्रत्येक मिनिटाला कुणी ना कुणी व्यक्ती सिगरेट फुंकतच असते आणि ती सिगरेट ‘फिलिप मॉरिस’चीच असते.
 
सन १४९२ साली, ख्रिस्तोफर कोलंबस युरोपातून अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेत गेला. तिथल्या ‘टोबॅगो’ नावाच्या बेटावर त्याने पाहिले की, स्थानिक रहिवासी एका झाडाची पाने गुंडाळी करून, तोंडात धरून पेटवतायत. त्यांचा धूर तोंडात खेचतायत आणि मग तोच धूर बाहेर सोडतायत. इतर काही लोक तीच पाने चघळतायत. कोलंबसाने आणि त्याच्या सहकारी खलाशांनी अर्थातच हा काय प्रकार आहे, म्हणून चौकशी केली. तेव्हा त्यांनाही ती पाने देण्यात आली. ती चघळून आणि पेटवून धूर ओढून पाहिल्यावर त्यांना एकदम तरतरी, किंचित गुंगी आल्यासारखे वाटले. तेवढ्यात आणखी एक जण, एक चूर्ण घेऊन आला. ही त्याच झाडाची पाने वाळवून त्यांची केलेली पूड आहे; ही चिमटीने नाकात कोंबायची, असे त्याने सांगितले. तसे केल्यावर कोलंबस आणि त्याचे सहकारी, भयंकर शिंकत सुटले. पण, मग त्यांना भलतीच तरतरी आली.
 
अशा प्रकारे कोलंबसाला अमेरिकेबरोबरच तंबाखू या झाडाचा आणि त्याच्या बिडी, जर्दा, तपकीर इत्यादी पदार्थांचा शोध लागला. कोलंबसाने ते युरोपात नेले. तिथून पोर्तुगीज खलाशांनी ते आशियात, म्हणजे मुख्यत: भारतात आणि चीनमध्ये नेले. आशियाई देशांमध्ये त्याचे गुडगुडी, हुक्का, चिलीम, बिडी इत्यादी प्रकार बनले. तर युरोपात आणि युरोपीय लोकांनी वसवलेल्या उत्तर अमेरिकेत त्याचे सिगार, पाईप असे प्रकार बनले. उत्तर अमेरिका म्हणजे कॅनडा, युनायटेड स्टेटस् आणि क्यूबा. क्यूबाचा ‘हॅवाना सिगार’ आजही जगभरात प्रसिद्ध आहे.
 
तंबाखू सेवन हे कोणात्याही स्वरूपात वाईटच. पण, ते जास्तच घातक करण्याचे उद्योग अमेरिकेने केले. भलेदांडगे सिगार उर्फ चिरुट आणि पाईप खिशात बाळगायला अडचणीचे, म्हणून अमेरिकनांनी एक विशिष्ट प्रकारचा कागद, त्याला कडेला गोंद आणि सोबत तंबाखूची पूड अशी पॅकिंग्ज काढली. खिशात बाळगायला एकदम सोपी. तल्लफ आली, की ती पूड त्या कागदाच्या चिटोर्‍यावर ओतायची, गुंडाळी करायची नि जिभेने कडा ओली करून चिकटवायची. सिगारच्या या छोट्या आवृत्तीला त्यांनी नाव दिले ‘सिगरेट’. मोठा तो पट्टा; छोटी ती पट्टी, मोठा तो गाडा; छोटी ती गाडी, याच चालीवर मोठा तो सिगार आणि छोटी ती सिगरेट. पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैनिक युरोपच्या रणभूमीवर लढायला गेले, ते खिशात सिगरेटी घेऊनच. पहिल्या महायुद्धाने जगाला मशीनगन हे अतिवेगवान आणि अतिसंहारक शस्त्र दिले, असे म्हटले जाते. ते खरेच आहे. पण, त्याच युद्धामुळे सिगरेट या माणसाला हळूहळू ठार करणार्‍या अतिघातक, विषारी शस्त्राचाही जगभर प्रसार झाला, हे मात्र विसरले जाते. विडी, सिगार यापेक्षा सिगरेट जास्त विषारी कारण, तिच्यासाठी वापरला जाणारा विशिष्ट कागद. या कागदाचा धूर तंबाखूपेक्षाही जास्त विषारी असतो.
 
आज सिगरेट उत्पादनात अमेरिकेच्या ‘फिलिप मॉरिस’ खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर, चीनच्या युनान प्रांतातली ‘होंगटा’ही कंपनी आहे. होंगटा या चिनी शब्दाचा अर्थ लाल रंगाचा पॅगोडा. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातले रिचमंड शहर जसे ‘फिलिप मॉरिस’मुळे जगभर प्रसिद्ध आहे, तसेच, चीनच्या युनान प्रांतातले युक्सी हे शहर ‘होंगटा’ सिगरेटमुळे प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज खलाशी आणि व्यापारी यांच्याबरोबर इ. स. १६००च्या सुमारास, तंबाखू चीनमध्ये पोचली. मोठी आश्चर्याची आणि कौतुकाची गोष्ट अशी की, सन १६४३ मध्ये मिंग सम्राट चाँगझेन याच्या दरबारातला एक विद्वान पंडित फँग यिझी याने सम्राटाला सांगितले की, धूम्रपान हे घातक असून त्यामुळे फुफ्फुसे खलास होतात. चाँगझेन हा मोठा प्रजाहितदक्ष राजा असला पाहिजे, कारण फँग यिझीने असे मत दिल्यावर, त्याने चीनमध्ये तंबाखू सेवनावर कडक बंदी घातली. माणसाने आपल्या परीने चांगले निर्णय घेतले, तरी काळ विपरीत असेल तर काय घडते पाहा. धूम्रपान करणार्‍या माणसाचे मुंडके उडवण्यात येईल, इतकी कडक बंदी घालणारा सम्राट चाँगझेन यानंतर अल्पकाळातच मरण पावला. त्याच्याबरोबरच तंबाखू बंदीही वाहून गेली.
 
आणि आज युनान प्रांतासह संपूर्ण चीन, तंबाखू आणि सिगरेट उत्पादनात अमेरिकेखालोखाल आहे. दरवर्षी चीनमधले सिगरेट उत्पादन वाढतेच आहे. २०२४ या वर्षात चीनने २० अब्ज, ४० कोटी एवढ्या सिगरेटी निर्माण केल्या. हा आकडा २०२३ सालापेक्षा तीन टक्के जास्त आहे. म्हणजे २०२४ सालच्या एकंदर जागतिक उत्पादनातला, दोन पंचमांश एवढा वाटा एकट्या चीनचा आहे.
अमेरिकेत सिगरेट उत्पादक कंपन्यांची जबरदस्त लॉबी आहे. एकेकाळी हॉलिवूडच्या मोठमोठ्या नटांना हाताशी धरून, त्यांनी आपले ब्रॅण्ड्स लोकप्रिय केले. आपल्याला आठवत असेल, तर भारतातही हाच प्रयोग झाला. अशोककुमार, देव आनंद आणि प्राण या नटांची लोकप्रियता अफाट होती. त्यात ते सिगरेट कशी शिलगावतात, त्या स्टाईलची नक्कल करण्याचा फार मोठा वाटा होता. प्राणसारखी चेहर्‍यावर दुष्ट भाव खेळवत तोंडातून विविध प्रकारे धूम्रवलये काढायची, अशी महत्त्वाकांक्षा अनेक जण शाळकरी वयापासून बाळगून असत.
 
१९७५ नंतर अमेरिकेतल्या या सिगरेट लॉबीवरचा दबाव वाढत गेला. कारण, धूम्रपानामुळे फार माणसे मेली. धूम्रपान हे आरोग्यास घातक आहे, असा इशारा प्रथमच सिगरेट पाकिटांवर आला. मग तो अधिक मोठ्या नि ठळक अक्षरात आला. मग रेल्वे, बस, कार्यालये इत्यादी ठिकाणी धूम्रपानाला बंदी आली नि ती अधिकाधिक कडक होत गेली. यावर उपाय म्हणून, सिगरेट कंपन्यांनीही डबल फिल्टर, कमी टार, कमी निकोटिनयुक्त अशा सिगरेटी काढल्या. एकंदरीत सिगरेट फुंकण्याचे प्रमाण खरोखरच कमी झालेय की नाही, देव जाणे; पण कुठेही भकाभका धूर सोडून इतरांना वायुप्रदूषण करण्याचे प्रमाण कमी झाल्यासारखे निदान भासतय तरी. मुख्य म्हणजे सिगरेट फुंकणे हे काहीतरी मोठ्या मर्दपणाचे काम आहे, ही भावना निश्चितपणे कमी झाली आहे. सातत्याने धूम्रपानाविरुद्ध प्रचार करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा हा विजयच म्हटला पाहिजे. पूर्वी राजकीय नेते, लेखक-साहित्यिक यांची चित्रे हमखास सिगरेट फुंकत असलेली प्रसिद्ध व्हायची. आता ती तशी होत नाहीत. चित्रपटांमध्येही धूम्रपानाच्या दृश्यांवर भर नसतो.
 
पण, चीनमध्ये यातले काहीही अस्तित्वात नाही. ‘होंगटा’ सिगारेट कंपनी असलेल्या युक्सी शहरात तर एक सिगरेट म्युझियमच आहे. तिथे विशेष म्हणजे, माओपासून सर्व मोठ्या चिनी नेत्यांची सिगरेट फुंकत असलेली भव्य छायाचित्रे आहेत. चीनमध्ये आजही साम्यवादी सरकार आहे. ते माओ त्से तुंग किंवा नव्या उच्चारानुसार, माओ झेडाँग याने १९४९ साली साम्यवादी क्रांती करून सत्तेवर आणले. १९७६ साली माओ मेला. नंतर सत्तेवर आलेल्या डेंग झियाओ पिंगने, कुंचबत पडलेल्या चिनी अर्थव्यवस्थेला मोठी गती दिली. आज चीन महासत्ता बनला आहे, ते निर्विवादपणे डेंगच्या कर्तबगारीमुळे. त्यामुळे वर्तमान चीन सरकारच्या दृष्टीने, माओ आणि डेंग हे महानायक आहेत.
 
चीनमध्ये सिगरेट उत्पादन सुरू केले ते ‘ब्रिटिश-अमेरिकन टोबॅको’ या पाश्चिमात्य कंपनीने. माओने या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे आज ती कंपनी काय किंवा ‘होंगाटा’ही सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी काय, अखेर सरकारी मालकीच्याच आहेत. शिवाय माओ आणि डेंग हे दोघेही अखंड सिगरेटी फुंकत असायचे. त्यामुळे चीनमधल्या सिगरेट कंपन्या जाहिरातींमध्ये, माओ आणि डेंग सिगरेट फुंकताना आवर्जून दाखवतात आणि वर सांगतात की पाहा, अखंड सिगरेटी फुंकत राहूनही माओ ८२ वर्षे जगला आणि डेंग तर ९२ वर्षे जगला. याचा परिणाम म्हणजे, सिगरेट किंवा एकंदरीत तंबाखू आरोग्याला घातक वगैरे आहे, असे चिन्यांना वाटत नाही. एकंदर चिनी लोकसंख्येतले ५० टक्क्यांहून अधिक लोक सिगरेट, जर्दा, तपकीर यापैकी, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तंबाखू सेवन करतात. काही म्हणजे बरेच उत्तम पुरुष असेही आहेत की, जे या तिन्ही मार्गांनी तंबाखूला न्याय देतात.
 
युरोप-अमेरिकेत स्त्रिया सिगरेट ओढतात. पण, सिगार किंवा पाईप ओढत नाहीत. जर्दा चघळणे किंवा तपकीर ओढणे हे तर तिथे स्त्रियाच काय, पण पुरुषही करत नाहीत. कारण, स्वच्छतेच्या कल्पना! कल्पना करून पाहा; पश्चिमेतली एखादी सुबक बाई नि सुटाबुटातला बुवा, एकमेकांना जर्द्याची चिमूट देत आहेत किंवा प्रेमळपणे तपकिरीची चिमूट नाकात (एकमेकांच्या) कोंबतायत. छ्यां, छ्यां करून शिंकून प्रेम वृद्धिंगत करत आहेत. छे, असे दृश्य डोळ्यांसमोर येतच नाही. भारतात, विशेषत: मुंबई-दिल्लीसारख्या शहरात अशी फॅशन आहे की, कार्यालयातून दुपारच्या जेवणानंतर एक चक्कर मारायला बाहेर पडायचे आणि सिगरेट फुंकायची किंवा कडक जर्दावाले पान खायचे किंवा तळहातावर घासून घासून चढवलेली माव्याची गोळी गालात धरायची. हल्ली मुंबईच्या फोर्ट, नरिमन पॉईंटसारख्या कॉर्पोरेट भागातल्या नोकरी करणार्‍या फाजिल पुढारलेल्या बायकाही, दुपारी बाहेर पडून सिगरेटी फुंकतात. पण, एकंदर समाज त्यांच्याकडे फाजिल आणि वाह्यात म्हणूनच पाहतो.
 
 
चीनमध्ये असे नाही. बायका सर्रासपणे सिगरेट, जर्दा आणि तपकीर ओढतात. ग्रामीण भागात तर हे प्रमाण जास्तच आहे. पूर्वेकडच्या देशांमध्ये, वर्षभर वेगवेगळे सण-उत्सव चालूच असतात. या सणांच्या निमित्ताने लोक एकमेकांना फराळाच्या वस्तू देतात. तसेच, चीनमध्ये फराळ-खाऊ यांच्यासोबत, उत्तमपैकी सिगरेटी भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. उंची सिगरेटच्या एका पाकिटाला सुमारे २५ डॉलर्स पडतात. २०२४ साली सिगरेटवरच्या महसुलापोटी चीन सरकारला, १ हजार, १९० कोटी डॉलर्स एवढे प्रचंड उत्पन्न मिळाले.
 
याचा अर्थ दुष्पपरिणाम नाहीत, असे नव्हे. सिगरेट किंवा एकंदर तंबाखू सेवनामुळे, चीनमध्ये दरवर्षी सरासरी दहा लाख लोक मरण पावतात. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू विरोधी करारावर सही केल्यामुळे, चीन सरकारला सिगरेट पाकिटावर धोक्याचा इशारा छापणे बंधनकारक झाले आहे. पण, काही सिगरेट उत्पादक इतके डोकेबाज आहेत की, ते हा इशारा बारीक अक्षरात छापतात आणि ‘ऑर्गेनिक’ अशी अक्षरे मोठ्या छापात टाकतात. आता तंबाखू जर ऑर्गेनिक असेल, तर उद्या जहाल विषालासुद्धा ऑर्गेनिक म्हणायला हरकत नाही. पण, अशा रितीने कायद्यातून पळवाट काढली जाते आणि त्यात खुद्द सरकारही सामील असते. कारण, तंबाखूतून मिळणारा प्रचंड महसूल. लोक मेले तरी बेहत्तर, पण पैसा मिळाला पाहिजे. यालाच म्हणतात आसुरी संपत्ती!

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.