वसई-विरार क्षेत्र झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी योजनांना गती

झोपू योजनांची माहिती देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन

    01-Mar-2025
Total Views |

vasai virar



वसई-विरार, दि.२८ : प्रतिनिधी 
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून तेथील हा भाग झोपडपट्टीमुक्त व्हावा याकरिता वसई-विरार महानगपालिका परिसरात मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून गुरुवार, दि.२८ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याकरिता वसई-विरार महानगपालिका परिसरात मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना, धोरण, उद्दीष्ट, झोपडीधारकांना होणारा लाभ या सर्व बाबी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम वसई-विरार महानगरपालिका मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांमध्ये योजनेबाबत असलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञांमार्फत योजनेबाबतची सविस्तर प्रक्रिया/माहिती देऊन योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील झोपडीधारक/सामान्य नागरिक/विकासक/वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आमदार विलास तरे, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे-पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे पराग सोमण आणि महानगरपालिका आयुक्त अनिल पवार कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी सामान्य नागरिकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची माहिती देण्यात आली.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र "झोपडपट्टी मुक्त" करण्यासाठी झो.पु.प्राधिकरणामार्फत योजनाना लवकरात लवकर मान्यता देऊन, योजना मार्गी लावून झोपडीधारकांना त्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यात येईल असे आश्वासन एसआरए ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दिले. तसेच वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील विकासक व वास्तुविशारद यांना देखील झोपु योजनेत सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आले व त्यांना देखील योजना परवानगी मिळण्याकरिता अडचण येणार नाही असेही सोमण यांनी सांगितले.