...म्हणून अरविंद केजरीवाल पराभूत! अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
08-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : मद्यविक्रीचे दुकान काढून त्यात केलेल्या भ्रष्टाचारामुळे अरविंद केजरीवालांचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पराभवाच्या छायेत आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, "निवडणूक लढत असताना उमेदाराचे आचार, विचार शुद्ध असायला हवे. त्याचे जीवन निष्कलंक असले पाहिजे. उमेदवारामध्ये हे गुण असल्यास मतदारांमध्ये विश्वास निर्माण होतो. मी वारंवार सांगत होतो परंतू, त्यांना अरविंद केजरीवाल यांना ते पटले नाही. शेवटी मद्यविक्रीसंदर्भात त्यांचे नाव आले. पैसे, धन, दौलत यात ते वाहवत गेले आणि त्यामुळे बदनाम झाले. अरविंद केजरीवाल चारित्र्याबद्दल बोलतात आणि दुसरीकडे, मद्यविक्री घोटाळा करतात, असे लोकांना वाटले. मी त्यांना सांगत असूनही त्यांनी ऐकले नाही. याचाच परिणाम म्हणून आज ते निवडणूकीत पराभूत झाले," असे ते म्हणाले.
"राजकारणात आरोप, प्रत्यारोप होत असतात. पण ज्यावेळी आरोप होतात तेव्हा ते कसे चुकीचे आहेत हे जनतेला दाखवून देणे गरजेचे आहे. ते सिद्ध करावे लागतात. जर आरोप चुकीचे ठरले तर कुणीच कुणाचे काहीही बिघडवू शकत नाही. सत्य हे कायम सत्यच असते आणि खोटे हे खोटेच असते. त्यामुळे कायम सत्याच्या मार्गाने गेले पाहिजे," असेही ते म्हणाले.
"दिल्लीत पहिल्यांदा झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी पक्ष काढण्याचे ठरवले होते. पण मी सुरुवातीपासूनच कोणत्याही पक्षात न जाण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी आजपर्यंत कुठल्याही पक्षापासून दूर आहे. त्यांनी पक्ष काढला. नवीन पक्ष असल्याने लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पुढे मद्यविक्रीचे दुकान काढून त्यात केलेला घोटाळा समोर आला. त्यामुळे त्यांची प्रतिमा धुळीस मिळाली. निरपेक्ष भावनेने जनतेची सेवा करणे हीच देवाची पूजा असते. पण ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ते चुकीच्या मार्गावर गेले," असेही अण्णा हजारे म्हणाले.