मुंबई : स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया कडून २०२४ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एमएसएमई म्हणजेच सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राच्या कामगिरीचा आढावा प्रकाशित करण्यात आला आहे. यात एमएसएमई क्षेत्राच्या धोरणकर्त्यांकडून अपेक्षा, या क्षेत्राला होणारा सद्यस्थितीतील पतपुरवठा, या क्षेत्रातून होणारी रोजगार निर्मिती यांसारख्या सगळ्याच गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. याच बरोबर इझ ऑफ डुइंग बिझनेस बद्दलही चर्चा करण्यात आली आहे. या अहवालासाठी देशभरातून १२०० एमएसएमईंशी चर्चा करण्यात आली.
या अहवालात काही ठळक बाबी नमुद करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळात निर्मिती क्षेत्राची वाढ सर्वात समाधानकारक झाली. सिडबीकडून या क्षेत्राला आत्मविश्वास निर्देशांकात ६०.३३ अंश इतके गुण देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील विक्री, फायदेशीरपणा, या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा कौशल्यविकास, त्यांना मिळणारे अर्थसहाय्य, त्यांच्या एकूणच व्यवसायाची स्थिती या सगळ्याबद्दल या अहवालात माहिती आली आहे. यातून या क्षेत्रात येणाऱ्या भविष्यकालीन व्यवसायवृध्दीसाठी असलेल्या योजना याबाबतही निरीक्षणे नोंदवली गेली आहे. रोजगारांच्या बाबतीत विचार केला असता यापातळीवर फार काही फरक पडलेला नाही. कामगार तसेच त्यांच्याकडे असलेली कौशल्ये यांच्याबद्दलही फार काही फरक पडलेला नाही असे या अहवालात सांगितले आहे.
सिडबी ही १९९० पासून भारतातील सर्वच थरांतील नागरिकांच्या जीवनमानाचा अभ्यास करत आहे. या थरांतील लोकांचे राहणीमान, त्यांच्या एकूणच आर्थिक प्रगतीची माहिती यांसारख्या सर्व गोष्टींचा एमएसएमई क्षेत्रांवर झालेला परिणाम यांसारख्या गोष्टींचा अभ्यास दर तीन महिन्यांनी प्रकाशित करते. अशा प्रकारचा अभ्यास करणारी सिडबी ही एक महत्वाची संस्था आहे.