हेल्मेटने डोक्यावर वार करत जिहादींकडून हिंदू युवकाची हत्या

दोन्ही आरोपी "इज्तेमा"वरून आल्याचा स्थानिकांचा दावा

    07-Feb-2025
Total Views |

Kharghar Attack News

नवी मुंबई : (Kharghar Helmet Attack News)
दोन अज्ञात इसमांकडून एका हिंदू युवकास हेल्मेटच्या साहाय्याने जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या खारघर परिसरात घडली. रविवारी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. सदर घटना उत्सव चौकात घडल्याचे मिळालेल्या एफआयआर मधून माहित झाले. शिवकुमार रोशनलाल शर्मा (४५) असे हिंदू युवकाचे नाव असून डोक्याल्या जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपी खारघर येथे आयोजित 'इज्तेमा'वरून आले असून, त्या जिहादींनीच शिवकुमार यांच्यावर हल्ला केल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या जबाबात म्हटले की, बेलपाडा ते उत्सव चौक रस्त्यावर २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीस ओव्हरटेक करत कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे मारहाणीत झाले. शिवकुमार शर्मा यास ठार मारण्याची धमकी देत एकाने त्यांना पकडून धरले तर दुसऱ्याने हेल्मेटच्या साहाय्याने शिवकुमार यांच्या डोक्यावर वारंवार हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले.

जखमी अवस्थेत शिवकुमार शर्मा स्वतःच्या दुचाकीवरुन खारघर पोलिस ठाण्यात झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. पोलिसांना मोबाईलमधील मारहाणीचा व्हिडिओ दाखवत असतानाच शिवकुमार शर्मा पोलीस ठाण्यात बेशुद्ध झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या मेडीसीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

अशी माहिती आहे की, दोन्ही आरोपी अंदाजे २२ व २५ वर्षांचे असून यातील एकाने हिरव्या रंगाचा तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा झब्बा घातला होता. या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची १५ वेगवेगळी पथकं सक्रीय असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी दिली.


Nitesh Rane
 
जिहाद्यांचे लाड केले जाणार नाहीत
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी महागजाजन चेंबर्स लिमिटेड येथे शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वस्त केले की, हिंदुत्ववादी सरकारच्या काळात जिहाद्यांचे लाड केले जाणार नाहीत. शिवकुमार यांना लवकरच न्याय मिळेल व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. इज्तेमावर बंदी आणण्याबाबत एक पत्रही नितेश राणेंनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

इज्तेमामधील भाषणांची सखोल चौकशी व्हावी.
इज्तेमासाठी आयोजकांकडून पोलीस प्रशासनाला ३० हजार संख्या उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात लाखोंची संख्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जमवली गेली. यामागचा उद्देश काय होता? याच कार्यक्रमादरम्यान शिवकुमार शर्मा यांना इज्तेमासाठी असलेल्या धर्मांध मुस्लिम जिहादींनी हातावरील हिंदू धर्मीय टॅटू व गाडीवरील भगवान महादेव शंकराचे चित्र पाहून त्यांच्या डोक्यात हेल्मेटने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे या संदर्भातील आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, इज्तेमा कार्यक्रमाच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करावा, इज्तेमामध्ये झालेल्या सर्व भाषणांची सखोल चौकशी व्हावी.

- स्वरुप पाटील, जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद