मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Janajati people Pavitra Snan) जनजाती भागातून महाकुंभासाठी आलेल्या हजारो भाविकांनी नुकतेच त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याचे निदर्शनास आले. एका भव्य मिरवणुकीनंतर त्यांनी पवित्र स्नान केले. दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमतर्फे जनजाती समागम स्वरूपात महाकुंभ परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
'वनवासी कल्याण आश्रम' आयोजित युवाकुंभानंतर हजारो जनजाती बांधन भव्य मिरवणुकीतून संगम काठाकडे निघाले. स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी भगवा झेंडा दाखवून मिरवणुकीला रवाना केले. तेव्हा भाविक भगवान शंकर, श्री राम, श्री कृष्ण आणि भारत मातेचा जयघोष करीत संगम तीरावर पोहोचले.
नागालँड, मिझोराम ते अंदमान आणि केरळ तसेच हिमाचलपर्यंत हजारो जनजाती भाविक त्यांच्या पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जनजाती भारताचे विहंगम दृश्य महाकुंभात पाहायला मिळाले. १० हजारांहून अधिक जनजाती समाजाचा सहभाग भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुकीत एक आकर्षक आणि संस्मरणीय देखावा होता.