विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२५- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे उद्घाटन

    07-Feb-2025
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२५ - खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  वाघनखे हे स्वराज्याचे शस्त्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे इथे नवनवे उद्योग आकाराला येत रोजगार निर्मिती होत आहे. पर्यटन, उद्योग, दळण-वळण अशा अनेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून येत्या काळात ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ या आयोजनामुळे विदर्भात उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येईल. पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे. राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहेत."
 
"नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे. यात विदर्भासाठी ५ लाख कोटींच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू उद्योग समुहाने ३ लाख कोटींची गुंतवणूक करार केले आहेत. गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौरऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत. हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार आहेत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भाच्या विकासाला गती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
 
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, "राज्याच्या एकूण खनिज संपत्तीच्या ७५ टक्के खनिज तर एकूण वनक्षेत्राच्या ८० टक्के वन विदर्भात आहे. ही जमेची बाब आहे. याठिकाणी पर्यटन व उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने याला गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी दोन दशकांपासून कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले. याठिकाणी उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक आणत येथील नक्षलवाद, गरिबी, बेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात झाली आहे. ॲडव्हांटेज विदर्भच्या आयोजनातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग वाढीसाठी पुरक वातावरण निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच येत्या ४ वर्षात याला गती देण्याचे नियोजन आहे," असे त्यांनी सांगितले.