'खेलंदाजी'कार द्वारकानाथ संझगिरींचं वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
06-Feb-2025
Total Views | 86
मुंबई : ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनावर क्रीडा विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, क्रिकेट आणि संगीत अशा दोन्ही क्षेत्रात संझगिरी यांनी अतिशय लीलया मुशाफिरी केली. दरम्यान, द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वाची मोठी हानी झाली असून उत्तम क्रीडा समीक्षणास रसिक मुकणार आहेत. विशेष म्हणजे पेशाने सिव्हिल इंजीनियर असणारे संझगिरी एकेकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. क्रिकेटबाबत असणाऱ्या रुचीमुळे क्रीडा विश्वात त्यांच्या रुपाने क्रिकेट समीक्षक प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या समीक्षणातून १९८३ पासून कपिल देव ते एमएस धोनीपर्यंतचा काळ स्तंभ लेखनातून चितारला. मराठी वृत्तपत्रात क्रीडाविषयक स्तंभलेखनासोबतच परदेशी दौरे, चित्रपटातील गाणी अशा विविध विषयांवर संझगिरींनी तीन डझनांहून अधिक पुस्तके लिहिली. खेलंदाजी, बोलंदाजी, क्रिकेट कॉकटेल, भटकेगिरीसारख्या प्रवासवर्णनासह मराठी क्रिकेटरसिकांनी द्वारकानाथ संझगिरींच्या लिखाणाला नेहमीच दिलखुलास पसंती दिली.