वनविभागाच्या कक्षेत राहूनही वन्यजीव आणि समाजमन यांचा सारासार विचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्याविषयी...
मानव-वन्यजीव संघर्ष आणि कठीण परिस्थिती अडकलेल्या बिबट्यांना वाचवण्यामध्ये, या माणसाचा हातखंडा. संगमनेर आणि रत्नागिरीतील त्यांचे बिबट्या बचावाचे कार्य, खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. गेल्या २५ वर्षांच्या सेवेत यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने, १५० हून अधिक वन्यजीव बिबट्या व इतर यांना जीवदान दिले आहे. जीवाची बाजी लावून, बिबट्या बचावाचे काम करण्यासाठी ते सुपरिचित आहेतच. मात्र, हे सर्व सहकार्यांच्या जोरावरच असल्याची जाण असलेले रत्नागिरीचे ’लेपर्ड मॅन’ म्हणजे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश गणपती सुतार!
सुतार यांचा जन्म दि. १ जून १९७६ रोजी, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी या गावात झाला. पश्चिम डोंगररांगेला लागून असलेल्या गावच्या दक्षिण बाजूस दूधगंगेचा उजवा कालवा, तर उत्तरेस बारमाही वाहात असलेली दूधगंगा नदी, त्यामुळे शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात आहे. घनदाट जंगलाने वेढलेलेच गाव असल्याने, सुतार यांचा वेळ हा निसर्गासोबतच जात असे. पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, त्यांचे मन फार काहीसे निसर्गात रमले नाही. घरच्या परिस्थितीमुळे सुतार यांच्या आई कायमच शेतीच्या कामाला जात. वडील बांधकाम किंवा कुळांची कामे करत असल्याने, त्यांचा घरी राबता कमी असे. त्यामुळे सुतार यांच्यासह त्यांच्या दोन भावंडांचा सांभाळ त्यांच्या आईनेच जास्त केला. शिकून नोकरी मिळवून घराचा गाडा हाकण्याच उद्देशानेच, सुतार यांनी शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण हे राधानगरीमध्येच झाले. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ‘बीए’, ‘बीएड’चे शिक्षण पूर्ण केले. आतापुढे शिक्षकी पेशामध्येच नोकरी करायचे ठरवून, त्यांनी ‘एमए’चे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आईचे कष्ट, वडिलांचा प्रामाणिकपणा आणि मोठा भाऊ तसेच त्यांचे फॅमिली डॉक्टर आनंदा भाऊ गोजारे यांच्यामुळे, सुतारांचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र, याचदरम्यान आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. जून २००१ रोजी सुतार यांनी, जिल्हा निवड मंडळाची परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांची वनविभागाच्या वनपाल या पदासाठी निवड झाली. घरची परिस्थिती आणि नोकरीची गरज पाहता, त्यांनी शिक्षकी पेशाचे स्वप्न सोडून वनविभागाची पायरी चढण्याचे निश्चित केले. दि. १ जून २००१ पासून ते या विभागात रुजू झाले.
पाल येथील वन प्रशिक्षण केंद्रात वर्षभर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ,सुतार यांनी कामाला सुरुवात केली. त्यांची पहिली नियुक्ती ही २००२ साली सागरेश्वर अभयारण्यात, वनपाल म्हणून झाली. पुढे २००२ ते २०१५ या कालावधीत सावंतवाडी, महाबळेश्वर आणि तासगाव या जिल्ह्यात, वनपाल म्हणून त्यांनी काम केले. २०१५ नंतर खर्या अर्थाने त्यांचा संबंध, हा बिबट्यांसोबत आला. २०१५ साली त्यांना पद्दोन्नती मिळाली. संगमनेरमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून ते रुजू झाले. हा संपूर्ण पट्टा ऊसाची शेती असणारा. त्यामुळे याठिकाणी ऊसाच्या शेतात अधिवास करणार्या बिबट्यांची संख्या अधिक. सुतार यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात संगमनेर वनपरिक्षेत्रामधून, विहरीत पडलेल्या आणि मानव-बिबट्या संघर्षात अडकलेल्या सुमारे ७५ बिबट्यांचा बचाव केला. मानव-बिबट्या संघर्षांच्या अनेक संवेदनशील घटनांना त्यांनी तोंड दिले आहे. मात्र, गावकर्यांशी सुतार यांचे उत्तम संबंध असल्यामुळे, संघर्षाची झळ वनविभागाला फारशी सहन करावी लागली नाही. उन्हाळ्यात जलस्रोत आटल्यावर, पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागते. पर्यायाने ते मानवी वस्तीत शिरतात. त्यांना जंगलात पाणी मिळाल्यास संभाव्य धोका टळू शकतो. ही बाब लक्षात घेऊन सुतार यांनी, त्यांच्या वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये स्वखर्चाने टँकरचे पाणी टाकले.
२०१९ साली त्यांची बदली, सांगली सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून झाली. या पदावर काम करत असताना सुतार यांनी, देशी झाडांच्या लागवडीवर अधिक भर दिला. त्यासाठी देशी झाडांची रोपवाटिका तयार केली. या रोपवाटिकेत पक्ष्यांसाठी आवश्यक असणार्या, फायकस वृक्षांच्या अनेक प्रजातींची लागवड करण्यात आली. एकूण ६५ प्रकाराची रोपे त्यांनी, या रोपवाटिकेमध्ये तयार करुन घेतली. विशेष म्हणजे, सांगलीकरांच्या मागणीस्तव चार प्रकारचे पामही तयार करण्यात आले. याच ठिकाणी त्यांनी सहा महिने वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगली प्रादेशिक या पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला. या काळात त्यांनी उपचाराच्या नावाने, डांबून ठेवलेल्या ४० वन्य पशु-पक्षी यांची सुटका केली. मे २०२२ साली त्यांची बदली वनपरिक्षेत्र अधिकारी, रत्नागिरी प्रादेशिक या पदावर झाली. तेव्हापासून त्यांनी, रत्नागिरी वन परिक्षेत्रातून बिबट्या बचावाचा धडाकाच सुरू ठेवला आहे.
रत्नागिरी वनपरिक्षेत्रामधून सुतार यांनी, आपल्या सहकर्मचार्यांच्या बळावर ५० हून अधिक बिबट्यांचा बचाव केला आहे. यामध्ये प्रामुख्याने विहिरीत पडलेल्या आणि फासकीत अडकलेल्या बिबट्यांचा समावेश आहे. दुर्मीळ ब्लॅक पँथर म्हणजेच, काळ्या बिबट्याच्या बचावाचे कामही रत्नागिरी वन परिक्षेत्रातील कर्मचार्यांनी खुबीने केले आहे. याशिवाय, विहिरीत पडलेले गवे, रानडुक्कर यांचेही बचावकार्य केले आहे. संगमनेर आणि रत्नागिरीतील बिबट्यांच्या वर्तनातील, काही सूक्ष्म निरीक्षणेही सुतार यांनी टिपली आहेत. ऊसाच्या शेतातील बिबटे हे अधिक रागिष्ट म्हणजेच हल्लेखोर असून, कोकण-सह्याद्री पट्ट्यातील बिबटे हे तुलनेत सौम्य आणि माणसांपासून चार हात दूर राहणे पसंत करत असल्याचे निरीक्षण, त्यांनी टिपले आहे. आपल्या या कामात तानाजी पाटील (लेखापाल), अनिकेत चौगुले (लिपिक), सुप्रिया काळे (वनरक्षक), न्हाून गावडे (वनपाल), प्रभू साबणे (वनरक्षक), शर्वरी कदम (वनरक्षक), तौफिक मुल्ला (वनपाल), अरुण माळी (वनरक्षक), सहयोग कराडे (वनरक्षक), आकाश कडूकर (वनरक्षक), सुरज तेली (वनरक्षक), रणजित पाटील (वनरक्षक), गणपती जलने (वनरक्षक), मिताली कुबल (वनरक्षक), सारीक फकीर (वनपाल), नमिता कांबळे (वनरक्षक), श्रावणी पवार (वनरक्षक), जयराम बावधने (वनपाल), विक्रम कुंभार (वनरक्षक), हरिश्चंद्र गुरव (वनमजूर), संजय गोसावी (वनमजूर) या सहकार्यांची मोलाची साथ मिळाल्याची जाण सुतार यांना आहे. अशी जाण ठेवणारे फार मोजकेच अधिकारी वनविभागात आहेत. त्यामुळे सुतार यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!