कोल्हापूरमधून विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध; झाडांच्या सालींमध्ये राहणारा 'ज्ञानदेवाय' विंचू

    06-Feb-2025   
Total Views |
new species of scorpion



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूरमधून विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of scorpion). जिल्ह्यातील पट्टणकोडोली परिसरात ही प्रजात आढळून आली आहे (new species of scorpion). 'आयसोमेट्रस' कुळातील या प्रजातीचे नामकरण डाॅ.डी.वाय. पाटील यांच्या नावावरुन 'आयसोमेट्रस ज्ञानदेवाय', असे करण्यात आले आहे. (new species of scorpion)
 
 
विंचू हे प्रामुख्याने खडकांमध्ये किंवा झाडांवर अधिवास करणारे असतात. 'आयसोमेट्रस' या कुळातील विंचू हे प्रामुख्याने वृक्षवासी आहेत. याच कुळातील नव्या प्रजातीचा हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथून शोध लावण्यात आला आहे. या संशोधन मोहीमेत सांगोला येथील महेश बंडगर आणि क्रांती बंडगर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओमकार यादव आणि सौरभ कीनिंगे, दहिवडी कॉलेजचे डॉ. अमृत भोसले, 'डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस'चे देवेंद्र भोसले आणि कोल्हापुरातील आशुतोष सूर्यवंशी यांचा सहभाग आहे. सदरचा शोधनिबंध दि. ३० ऑक्टोबर रोजी "जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी" या आतंरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित करण्यात आला.
 
 
या प्रजातीचे नामकरण डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावावरुन 'आयसोमेट्रस ज्ञानदेवाय' असे करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी भारतील शिक्षणव्यवस्थेमधे दिलेल्या अमूल्य योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव या प्रजातीस देण्यात आले आहे. पट्टणकोडोली परिसरातील नारळाच्या झाडांवर ही प्रजाती प्रथमतः महेश बंडगर, आशुतोष सूर्यवंशी आणि देवेंद्र भोसले यांना आढळून आली. पुढे डॉ. ओमकार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रजातीच्या रचनाशास्त्राचा आणि जनुकीय संचाचा सखोल अभ्यास करण्यात आला. यातून सदरची प्रजाती कूळातील इतर प्रजातींहून वेगळी असल्याचे सिद्ध झाले. आकार, पृष्टभागावरील आणि शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरुन ही प्रजाती कूळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते. ही प्रजात निशाचर असून ती ५३ मिमी आकाराची आहे.
 
 
 
आयसोमेट्रस कुळातील विंचू त्यांच्या झाडांच्या खोडांवरील वावरासाठी ओळखले जातात. 'आयसोमेट्रस ज्ञानदेवाय' ही प्रजाती शेताच्या बांधावरील झाडांवर आढळून आली. या विंचवांचा रंग झाडांच्या खोडांशी मिळताजुळता आहे त्यामुळे हे विंचू सहजासहजी दिसून येत नाहीत. तसेच हे विंचू निशाचर आहेत. दिवसा ते झाडांच्या सालींखाली विश्रांती घेतात. या सगळ्या त्यांच्या व्यक्तित्वामुळे त्यांचे अस्तित्व सहज लक्षात येत नाही. - डॉ. ओमकार यादव, संशोधक

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.