खारेपाटणमध्ये दिसली दुर्मीळ 'युरेशियन ग्रिफाॅन' गिधाडे

    05-Feb-2025   
Total Views |
eurasian griffon vulture




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सीमेवर वसलेल्या खारेपाटण गावात दुर्मीळ युरेशियन ग्रिफाॅन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे (eurasian griffon vulture). गावातील मच्छी मार्केट परिसरात रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी ही गिधाडे आढळून आली (eurasian griffon vulture). स्थलांतरी असणारी ही गिधाडे हिवाळ्यात युरोपमधून भारतात स्थलांतर करुन येतात. (eurasian griffon vulture)
 
 
कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावामध्ये रविवारी स्थानिकांना दोन गिधाड दिसली. येथील मच्छी मार्केट परिसरात कुक्कुटपालनातील कचरा आणि मासळीचे उरलेले अवयव उघड्यावर टाकले जातात. याठिकाणी दोन गिधाडे उतरल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्यांनी लागलीच याची माहिती स्थानिक छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांना दिली. जामसांडेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यातील एका गिधाडाचे छायाचित्र टिपले. त्यानंतर हे गिधाड डोंगराच्या दिशेने उडत गेल्याचे जामसांडेकर यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले. सद्यपरिस्थितीत कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते.
 
 
कोकणातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. याठिकाणी प्रामुख्याने पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करुन येणाऱ्या हिमालयीन ग्रिफाॅन, युरेशियन ग्रिफाॅन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, खारेपाटणमध्ये दिसलेले गिधाड हे युरेशियन ग्रिफाॅन प्रजातीचे निमवस्यक आहे. युरेशियन ग्रिफाॅन गिधाड ही हिवाळ्यात युरोपमधून भारतात स्थलांतर करतात. ही गिधाडे प्रामुख्याने मध्य भारतापर्यंतच्या प्रदेशात स्थलांतर करतात. त्याखालच्या प्रदेशांमध्ये क्वचितच दिसतात. खारेपाटणमध्ये आढळलेले गिधाडही स्थलांतरादरम्यानच याठिकाणी आली असावीत. पश्चिम घाट आणि कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करुन येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.