“ओ भाई, इंडिया कसा जिंकला, तर त्यांच्या एका एका खेळाडूसोबत दोन दोन पंडित होते. एकूण २२ पंडित होते. त्यांनी जादूटोणा केला. बताओ तभी तो जादूटोणा करून ‘इंडिया’ जिंकला. पंडितांना घेऊन पाकिस्तानमध्ये आले असते, तर त्यांचे बिंग फुटले असते. म्हणून तर इंडियाच्या क्रिकेटर्सनी पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला.” समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झालेला पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा हा व्हिडिओ पाहून भयंकर करमणूक झाली. १९४७ साली भारतापासून फुटून पाकिस्तानने काय मिळवले? तर २०२५ साली हे असे अगाध अज्ञान वाटणारी पाकिस्तानची जाहिल पिढी!
असो. भारतासमोर पाकिस्तानला नेहमीच मात खावी लागली. मात्र, प्रत्येक पराभवाबाबत पाकिस्तानी माध्यमांत चित्र असते, ‘गिरे तो भी टांग उपर.’ स्वत:च्या देशात अराजक माजले असताना, पाकिस्तान संयुक्त राष्ट्राकडे सातत्याने काश्मीरचा राग आलापतच असतो. नुकतेच जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र परिषदेच्या ५८व्या सत्राच्या सातव्या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरबाबत हेच म्हटले. यावर जागतिक व्यासपीठावर भारताचे स्थायी अधिकारी क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानबाबत म्हटले की, “पाकिस्तानची वर्तणूक अमानवी आहे. पाकिस्तान त्यांच्याच देशातली शासन व्यवस्था चालवण्यास असमर्थ आहे. याउलट लोकशाही, प्रगती आणि आपल्या लोकांसाठी सन्मान सुनिश्चित करण्यासाठी भारत सक्षम आहे.” त्यागी यांच्या विधानापुढे पाकिस्तानी प्रतिनिधींचे तोंड बंद झाले.
कारण, अस्थिर देश कसा असू शकतो, तर तो पाकिस्तानसारखाच, हे वास्तव! भिकीस्तान झालेल्या पाकिस्तानने मागे पैसे मिळावेत, म्हणून सौदीच्या राजकुमाराला देशात दुर्मीळ पशुपक्ष्यांची शिकार करण्यासाठी पायघड्या घातल्या. आता या देशाने पैसे कमावण्यासाठी नवा क्रूर मार्ग अवलंबला आहे. ग्वादर बंदरात पाकिस्तानने गाढवांचा चक्क कत्तलखाना सुरू केला. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक गाढव आहेत. (भारतविरोधी दहशतवादी मानसिकता असलेल्या पाकिस्तानमधील धर्मांधांना ‘गाढव’ म्हणत नाही, तर खरीखुरी गाढवच बरं का!) त्यांची आणि इतर देशांतील गाढवांची या कत्तलखान्यात कत्तल करून पाकिस्तान रसातळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्याचा प्रयत्न करत आहे.
गाढवांच्या कत्तली का? तर गाढवाच्या चामड्यातील द्रव्यापासून ‘एजियो’ मिळवण्यासाठी. ‘एजियो’ला ‘कोला कोरी असिनी’ किंवा ‘डंकी हाईड ग्लू’पण म्हणतात. चीनच्या असंख्य पारंपरिक औषधांमध्ये ‘एजियो’चा वापर केला जातो. ‘एजियो’ हे यौनवर्धक, पौरुष शक्ती आणि ताकद वाढवते, असे चीन्यांचे म्हणणे आणि मानणेही. चीनच्या अनेक औषधांमध्ये, सौंदर्य उत्पादनांमध्ये आणि चहापासून अनेक खाद्यपदार्थांमध्ये या ‘एजियो’चा वापर होतो. पुरातन काळापासून या औषधनिर्मितीसाठी चिन्यांनी त्यांच्या देशातल्या गाढवांच्या कत्तली केल्या. परिणामी, चीनमध्ये गाढवांची संख्या घटली. मग चीनने आफ्रिकी देशांकडे गाढव खरेदीसाठी मोर्चा वळवला. गेल्या दहा वर्षांत आफ्रिका खंडातील गाढवही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील काही देशांनी पुढे १५ वर्षे तरी गाढवांच्या कत्तलींवर बंदी आणली. मग गाढवाचे चामडे, मांस मिळवण्यासाठी चीनने हक्काच्या मांडलिकाला म्हणजे पाकिस्तानला तयार केले.
पाकिस्तान गाढवाच्या कत्तली करून चीनला त्यांचे चामडे, मांस पाठवण्यास तयारही झाला. पण, इस्लामिक कायद्यानुसार गाढवाचे मांस निषिद्ध. इस्लाममध्ये परंपरेनुसार, गाढवाला ‘पवित्र पाक’ मानले जाते. तरीही पाकिस्तानने गाढवांचा कत्तलखाना ग्वादर बंदरात सुरू केला. इस्लामविरोधात जाऊन ‘पाक’ गाढवांच्या कत्तली करणारा हा कत्तलखाना नकोच, यासाठी ग्वादरमध्ये आंदोलन भडकले. त्यासाठी त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे, त्यांनी बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्लेसुद्धा घडवून आणले. अर्थात, चीनचा अंकित असलेला पाकिस्तान गाढवांच्या कत्तली थांबवणार नाहीच. पण, आपल्याला काय? ‘गाढवांच्या जिवावर जगणारा देश’ अशी ही पाकची नवी ओळख!