आज, दि. 27 फेब्रुवारी - मराठी भाषा गौरव दिन. यानिमित्ताने मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा, तिच्या अभिजाततेचा आणि शासकीय कामकाजातील तिच्या स्थानाचा आढावा घेणे देखील आवश्यक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य केवळ राष्ट्रभक्तीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी भाषाशुद्धीकरणाची चळवळ उभी केली. इंग्रजी भाषेतील शब्दांना त्यांनी समर्थ आणि समर्पक मराठी पर्याय दिले. ‘नंबर’ ऐवजी ‘क्रमांक’, ‘बजेट’ ऐवजी ‘अर्थसंकल्प’, ‘डायरेक्टर’ ऐवजी ‘दिग्दर्शक’, ‘मेयर’ ऐवजी ‘महापौर’ असे असंख्य शब्द त्यांनी रूढ केले. आजही प्रशासनात आणि समाजात हे शब्द सहज वापरले जातात, ही जमेची बाजू आहे.
शासकीय मराठी : अडचणी आणि उपाय
स्वातंत्र्यानंतर मराठी ही शासकीय भाषा म्हणून स्वीकारली गेली असली, तरी तिचा प्रभावी वापर संपूर्णपणे रूढ झालेला नाही. इंग्रजी शब्दप्रयोग अजूनही सरकारी लिखाणात आणि संभाषणात सहजगत्या घुसखोरी करताना दिसतात. उदाहरणार्थ, मीटिंग, डिपार्टमेंट, ऑफिस, अटेन्डन्स, सर्क्युलर असे शब्द सहज वापरले जातात, जे बैठक, विभाग, कार्यालय, हजेरी, परिपत्रक असे सहजपणे मराठीत बदलता येऊ शकतात.
शासकीय मराठी प्रभावी करण्यासाठी पुढील उपाय आवश्यक आहेत :
१.) शुद्ध आणि सुगम शासकीय मराठीसाठी आग्रह
सरकारी विभागांमध्ये लिखित आणि तोंडी संवादात शुद्ध व प्रभावी मराठीचा वापर अनिवार्य असला पाहिजे. शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करावे, जेणेकरून ते सहज आणि योग्य प्रकारे मराठीचा वापर करतील.
२.) पारिभाषिक शब्दसंपत्तीचा सातत्याने विकास
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी संकल्पनांसाठी मराठी शब्द रूढ केले, तशीच प्रक्रिया सातत्याने सुरू राहिली पाहिजे. कंट्रोलऐवजी नियंत्रण, गाईडलाईन्सऐवजी मार्गदर्शक तत्त्वे असे शब्द प्रचलित करण्यासाठी शासकीय आदेश, प्रशिक्षण आणि माध्यमांतून त्यांचा अधिकाधिक वापर व्हावा.
३.) मुदत संपलेले साहित्य डिजिटायझेशनद्वारे खुले करणे
मराठीत मोठ्या प्रमाणात ज्ञानसंपत्ती आहे, मात्र ती संगणकीय स्वरूपात सहज उपलब्ध नाही. कॉपीराईटची मुदत संपलेले ग्रंथ, कोश, अहवाल आणि संशोधन डिजिटायझेशनद्वारे सर्वसामान्यांसाठी खुले करणे आवश्यक आहे.
४.) प्रशासनात डिजिटल मराठीचा अधिक वापर
आज डिजिटल क्रांतीच्या युगात शासकीय व्यवहार संगणकीय माध्यमांतून होत आहेत. सरकारी संकेतस्थळे, मोबाइल अॅप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुवाद यंत्रणेत मराठीचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शुद्ध आणि परिणामकारक शासकीय मराठीचे एक उदाहरण
कधीकधी भाषांतर करताना चुकीच्या प्रयोगांची शक्यता असते. उदाहरणार्थ - 'मुख्यमंत्री बयान देंगे' याचे मराठीत अनेकदा 'मुख्यमंत्री निवेदन देणार' असे भाषांतर केले जाते, जे चुकीचे आहे. याऐवजी मुख्यमंत्री निवेदन 'करणार' असे म्हणणे योग्य ठरेल. अशा चुका टाळण्यासाठी भाषेची जाण आवश्यक आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत.ते आणखी कोणाला निवेदन देणार? ते (सभागृहात)निवेदन करणार , असे म्हटले जावे. पीठासीन अधिकारी हा शब्दप्रयोग विधानमंडळ कामकाज, संसदीय कार्यप्रणाली यासंदर्भात नेहेमी केला जातो. यात पीठासीन मधील पी नेहेमी दीर्घ असायला हवा. अनेकदा पी र्हस्व लिहून दळण पिठ केले जाते लोकशातील उच्चासनाला! अर्थ किंवा संकल्पनाच बदलून जातात अशा चुकांमुळे...हे टाळायला हवे.
मराठीचा अभिमान बाळगणे ही प्रत्येकाची जबाबदारी
मराठी भाषा ही केवळ शासकीय कामकाजापुरती मर्यादित न राहता, ती लोकव्यवहारात अधिक समृद्ध आणि सर्वव्यापी व्हावी, यासाठी समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. भाषा टिकते ती तिच्या सततच्या वापराने आणि नवकल्पनांनी.या मराठी भाषा गौरव दिनी, आपण सर्वांनी शुद्ध, प्रभावी आणि व्यापक शासकीय मराठीचा अंगीकार करण्याचा संकल्प करूया!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
निलेश मदाने
लेखक विधान भवन, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.