अलीकडच्या काळात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. एक प्रकाशक म्हणून माझ्यासाठीसुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये सकस साहित्यनिर्मिती होते. हे साहित्य वाचणारा चांगला वाचकवर्ग मराठीच्या नशिबी आहे. येणार्या काळात आपल्या अभिजात मराठीचा वाचकवर्ग वाढेल, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
मराठी भाषेबरोबरच बोलीभाषेचा विकास हीसुद्धा एक महत्त्वाची बाब असून, वाचक, लेखक यांच्यासहित समाजातील सगळ्या घटकांनी काम करणे आवश्यक आहे. भाषा ही प्रवाही असते. त्यामुळे भाषेत होणारे बदल हे नेहमीच संथ गतीने होत असतात. या भाषेचा वाचकवर्ग कालांतराने कसा घडत जातो, यावर त्या भाषेचे साहित्य विकसित होणे, ते लोकांपर्यंत पोहोचणे हे अवलंबून असते. आपल्या मराठी भाषेत वाचन करणारा, साहित्याची निर्मिती करणारा वर्ग विकसित झाला. परंतु, यापुढे हा वाचकवर्ग टिकून राहील, या वाचकवर्गाचा विकास होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
‘कोविड’च्या काळात पुस्तकविक्रीच्या एकूण व्यवसायावर परिणाम झाला होता. डिजिटल माध्यमे मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे याचा परिणाम पुस्तकविक्रीवर होईल का, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली. परंतु, त्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा वाचकाने पुस्तके विकत घेणे सुरू केले. दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात असलेल्या ‘मॅजेस्टिक बुक डेपो’ येथे तरुणांचा वर्ग पुस्तकखरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. नाटक, एकांकिका स्पर्धा यांच्या निमित्ताने मुले-मुली पुस्तकांच्या दुकानात येतात, पुस्तके चाळतात, विकत घेतात. त्यामुळे आजचे युवक वाचत नाहीत, ही गोष्ट खोटी आहे. पुस्तक वाचण्याआधी आपण पुस्तकांच्या जगात शिरले पाहिजे. पुस्तकांचे मुखपृष्ठ, ब्लर्ब(मलपृष्ठावरील माहिती) वाचली पाहिजे. ते वाचताना मनात साहजिकपणे कुतूहल निर्माण होते आणि मग वाचनाची गोडी आपोआप लागते.
आजच्या घडीला प्रकाशन व्यवसायातील माझा अनुभव असा आहे की, प्रेरणादायी पुस्तके किंवा मनाला उभारी देणारी पुस्तके जास्त प्रमाणात विकली जातात. यानंतर लोकांना इतिहास वाचायला, समजून घ्यायला आवडतो म्हणून ऐतिहासिक पुस्तके, चरित्रात्मक कादंबर्या यांचे वाचन लोक अधिक करतात. नुकताच ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कादंबरीच्या अनेक प्रती विकल्या गेल्या. गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी, व. पु. काळे अशा लेखकांचा एक स्वतंत्र वाचकवर्ग आहे. हा वाचकवर्ग इतर लोकांना पुस्तक वाचण्यासाठी, विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देतो, ही सकारात्मक बाब म्हणायला हवी. आपल्याकडे काहीजण न वाचताच शेरेबाजी करतात की, ‘अमूक एक लेखक वाईट आहे.’ बरं, वाईट ठरवण्यासाठी आधी त्या लेखकाचे साहित्य वाचले गेले पाहिजे. चांगल्या साहित्याचा शोध निरंतर सुरू राहतो. पण, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली गेली पाहिजेत. आपल्याकडे विविध ठिकाणी साहित्य संमेलने भरवली जातात. विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून ही संमेलने फायद्याची असतात का, याचा विचार करायला हवा. प्रदर्शनाचे आयोजक जसे पाहुण्यांसाठी, वाचकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देतात, त्याचप्रकारे पुस्तकविक्रेत्यांसाठीसुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पुस्तकांची देखरेख, वाहतुकीचा खर्च, प्रदर्शनांमध्ये पुस्तकांची होणारी विक्री या सगळ्याचा आर्थिक ताळेबंद मांडणे आवश्यक आहे. आज ‘मॅजेस्टिक गप्पा’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विविध वयोगटांतील माणसे वाचन संस्कृतीशी एकरूप होतात. एकाचवेळेला वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांना ऐकण्याची व विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी त्यांना उपलब्ध होते. या कार्यक्रमादरम्यान, पुस्तकांचा झालेला विक्रमी खप एक प्रकाशक म्हणून माझ्यासाठी आशादायी चित्र उभे करते. विपुल प्रमाणात साहित्य निर्माण करणारे आणि ते वाचणारे आपली भाषा जतन करतील, यात शंका नाही.
अशोक कोठावळे
(लेखक ‘मॅजेस्टिक प्रकाशन’चे प्रकाशक आहेत.)