'ज्ञानभाषा' म्हणून मराठीचे भविष्य उज्वल!

    27-Feb-2025
Total Views |

marathi 1

राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्यादेखील उंचावते आहे. आर्थिक परिस्थिती नसताना पालक आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, भाषेत उदरनिर्वाहाची असणारी क्षमता, भाषेमुळे मिळणारी प्रतिष्ठा या गोष्टी कारणीभूत आहेत. नोकरी मिळण्याची क्षमता एखाद्या भाषेच्या अंगी कशी येते, याचा शोध घेऊन मराठीला त्यादिशेने पावले टाकण्याची गरज आहे.

मराठीला ‘ज्ञानभाषा’ बनण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, हे पाहणे गरजेचे आहे. जगातील जे जे सर्वोत्तम आहे, असे साहित्य आपल्या भाषेत आणण्याची गरज आहे. मराठीतील उत्तम साहित्य जगातील विविध भाषेत अनुवादित होण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर आपले ज्ञानमय स्थान निर्माण करणार्‍या इंग्रजी भाषा आणि साहित्यासाठी ब्रिटिश जे प्रयत्न करतात, ते प्रयत्न आपण करत नाही. आपल्याकडे भाषिक विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होत नाहीत. जगाच्या पाठीवर सर्वाधिक शब्दकोश हे इंग्रजी भाषेत तयार होतात. दरवर्षी त्या शब्दकोशात नवनवीन शब्दांची भर पडत जाते. मराठी भाषा समृद्धतेच्या दृष्टीने फारसे प्रयत्न होत नाहीत. जगात विविध क्षेत्रात क्रांती होते आहे. नवनवीन संशोधने होत आहेत. अशावेळी इंग्रजी, लॅटिन भाषेत येणारे शब्द आपल्याकडे अभ्यासक्रमात आहेत, तसे उपयोगात आणण्याकडे आपला कल आहे. त्या शब्दांना पर्यायी शब्द देण्याचा प्रयत्न नियमितपणे होत नाही. यासाठी स्वतंत्र संस्थात्मक स्वरूपाच्या संस्थाची गरज आहे. सातत्याने भाषेच्या संदर्भाने काम करण्याची व्यवस्थेची गरज आहे.

कोणत्याही भाषेचा विकास करताना त्या भाषेच्या काही बोली असतात. त्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने जगाच्या पाठीवर बोलीभाषांचा वेगाने र्‍हास होतो आहे. अशावेळी तो र्‍हास म्हणजे मूळ भाषेलाही धक्का आहे. बोलीभाषा जगल्या, वाढल्या तर त्या भाषा ज्या भाषेशी नाते सांगणार्‍या आहेत, ती भाषादेखील विकसित होण्यास मदत होत असते. त्यामुळे बोलीभाषा जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
 
त्याचबरोबर मराठी माध्यमातून शिकल्याने कौशल्य विकास, ज्ञानाची नवनिर्मिती आणि संवर्धन होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ज्ञानाचा अधिकाधिक व्यवहार मराठी भाषेत झाला, ती ‘ज्ञानभाषा’ बनली गेली, तर निश्चित मराठी भाषेचे उपयोजन वाढण्याची शक्यता अधिक आहे. आपल्याकडे मराठी लोकव्यवहारात कायम राहण्याबरोबर मराठी माध्यमात शिकणे, मराठी विषय पदवीपर्यंत असेल, तर त्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी काही जागा राखीव ठेवणे, त्यांना अंशतः का होईना, पण आर्थिक लाभ होईल त्यादृष्टीने धोरण घेण्याची गरज आहे. कायदा केल्याने सर्व भाषेचे प्रश्न सुटतात, असे कधीच घडत नाही. त्यामुळे मराठी भाषेचे अध्ययन, अध्यापन, उपयोजनेची प्रक्रिया अधिकाधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्याची गरज आहे.

मराठी भाषेचे उपयोजन अधिकाधिक करण्यासाठी आपल्याला मराठी भाषेत अधिकाधिक उत्तम साहित्य, ज्ञानवाटा निर्माण कराव्या लागतील. त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठी ‘ज्ञानभाषा’ बनली, तरच तीचे बोट धरून चालण्याची गरज निर्माण होईल. मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा, गुणवत्ता, सुविधा, तेथील शिक्षण प्रक्रियेचा प्रभाव वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळा यांच्या सुविधांचा विचार केला, तर दोन्ही शाळांच्या सुविधांमध्ये कितीतरी फरक आहे. त्यामुळे त्या सुविधा समान पातळीवर येण्याच्यादृष्टीने धोरण घेण्याची गरज आहे. मुळात किमान प्राथमिक स्तरापर्यंत असणारे शिक्षण मातृभाषेत असावे. त्यासाठी सक्तीचे धोरण घ्यावे. प्राथमिक स्तरापर्यंत सर्व शाळा या सरकारी असण्याची गरज आहे.

भाषा जतन आणि समृद्ध करण्याच्या प्रक्रियेत ग्रंथालय समृद्ध करण्याची गरज आहे. आपल्या राज्यात तालुक्याच्या गावी पुस्तक विक्रीचे दुकान नाही, अशी दोन तृतीयांश तालुके आहेत. 25 ते 28 जिल्हा स्तरावरदेखील समृद्ध पुस्तक विक्रीच्या दुकानांची सुविधा नाही. त्यामुळे शाळा तेथे ग्रंथालय आणि महसुली गाव ते तेथे सार्वजनिक ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मराठी भाषेतील पुस्तक लेखन, प्रकाशनासाठी शासनाने प्रोत्साहनात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. पुस्तकांच्या वाढत्या किमती लक्षात घेता, पुस्तके आणि निर्मिती प्रक्रियेवरील असणारा कर कमी करण्याची गरज आहे. वर्तमानपत्रे नियतकालिके निर्मिती, त्यासाठीचा कच्चामाल यांच्यावरील कर बंद करायला हवा. हा व्यवहार जितका स्वस्त होईल, तितक्या मोठ्या प्रमाणावर साहित्य स्वस्त होईल. साहित्य स्वस्त झाले, तर अधिकाधिक लोकांच्या हाती जाईल. त्यातून भाषिक व्यवहार उंचावेल. त्यातूनही भाषेच्या विकासाला गती मिळू शकेल. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीप्रमाणे तालुका, जिल्हा स्तरावरदेखील संमेलनाला सरकारने किमान काही मदत करावी. त्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावरदेखील स्नेहसंमेलनासारखे मराठी भाषेच्या उत्सवाचे नियोजन करण्याची आज नितांत गरज आहे. या मार्गांचा आपण अवलंब केला, तरच मराठीचे भविष्य उज्ज्वल राहील, असे वाटते.
संदीप वाकचौरे
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ